मुद्दा – योग आणि क्रिकेट

>> सुरेंद्र भावे

माझा आणि योगासनांचा संबंध खूप वर्षांपासूनचा होता, पण साधारण 1989-90 च्या सुमारास डॉ. संप्रसाद विनोदांशी माझा संपर्क आला आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने योगासने, ध्यान या संकल्पना अजून चांगल्या प्रकारे समजू लागल्या. त्यांच्याकडून मला योग, शवासन-ध्यान याबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याचे चांगले परिणाम माझ्या खेळात दिसू लागल्यानंतर मला असं वाटून गेलं की, याआधीच मी जर शांती मंदिरमध्ये आलो असतो तर क्रिकेट खेळताना कितीतरी जास्त चांगल्या प्रमाणात त्याचे परिणाम मिळाले असते.

1995 मध्ये राजू भालेकर हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते आणि मी कर्णधार होतो. भालेकर आणि मी दोघेही ‘शांती मंदिर’मधील अभिजात योग साधनेचा सराव करत होतो. त्याचे चांगले परिणाम स्वतः अनुभवत होतो. त्यामुळे रणजी क्रिकेट संघातील खेळाडूंना योग साधनेचे प्रशिक्षण दिले तर त्यांनाही खेळताना चांगले परिणाम मिळतील, असं वाटल्यामुळे आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन समोर त्यांच्यासाठी एक खास प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो मंजूरही झाला.

त्यानंतर शांती मंदिर येथे महाराष्ट्र रणजी संघाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन सुरू झाले. डॉ. संप्रसाद विनोद यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ताणविरहीत एकाग्रता, सहजता, खेळाचं सखोल ज्ञान करून घेणं, आनंदासाठी खेळणं, स्वतःपुरते न बघता संपूर्ण संघाचा खेळ उंचावण्यावर भर देणं, आपला खेळ नीट समजून घेऊन खेळण्याकडे लक्ष ठेवणं, सर्व खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असणं, आपल्या क्षमतेनुसार खेळणं, अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

या शिबिरानंतर लगेच चेन्नई येथील बुचीबाबू टुर्नांमेंट या एका प्रतिष्ठत टुर्नामेंटसाठी महाराष्ट्र संघ गेला होता. त्या वेळी योग साधनेचे आणि शवासन-ध्यानाचे खूप चांगले परिणाम मिळाले. त्या वेळी खेळाडूंच्या लक्षात येत गेलं की, आधीपेक्षा त्यांचा खेळ उंचावतो आहे. खेळताना येणारा दबाव ते अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकले. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मोठय़ा नावात किंवा आधीच्या खेळीमध्ये अडकून न पडता वर्तमानात राहून ते खेळत गेले.

मला नेहमीच डॉ. संप्रसाद विनोद (बाबा) यांच्या सहज वागण्या-बोलण्यातून प्रेरणा मिळत आली आहे. अभिजात योग साधनेत हाच सहजतेचा प्रवास मी अनुभवत आलो आहे. आता माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात कठीण प्रसंग आले तरी सहजतेने आणि माझ्या क्षमतेनुसार निर्णय घेतले जातात असं लक्षात येतं. त्यामुळे सध्या मी देत असलेले क्रिकेटचे प्रशिक्षण हे केवळ व्यावसायिक हेतूने न देता सर्वसमावेशक दृष्टीने देऊ लागलो आहे. त्यामुळे मला आणि माझ्याकडे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खेळाडूंनादेखील खूप समाधान मिळत आहे. अशा समाधानातून आणि डॉ. संप्रसाद विनोद यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून माझा खेळाबद्दलचा सर्वसमावेशक दृष्टिकोन सगळ्यांपर्यंत पोचवायचा माझा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. त्यात मला यश मिळावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.

शांती मंदिरमधील कार्याचा 50 वर्षांचा प्रवास, बाबांची पंचाहत्तरी आणि माझा शांती मंदिराशी आलेला 25 वर्षांचा जवळचा संबंध मला फार मोलाचा वाटतो. सहज प्रवासाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे बाबांना आणि त्यांच्या योग परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

(माजी कर्णधार, महाराष्ट्र रणजी क्रिकेट टीम, माजी सदस्य, बीसीसीआय निवड समिती)