
>> रमेश कुर्जेकर
केवळ ‘सबका साथ सबका विकास, सबका प्रयास सबका विश्वास’ ही राणाभीमदेवी थाटाने घोषणा देण्याऐवजी आदिवासी भागात राज्यकर्त्यांनी कंबर कसून काम करण्याची गरज आहे ही जाणीव आम्हाला आदिवासी भागात फिरताना मनोमन होत होती. मनात एक संकल्पना निर्माण झाली होती आणि अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय येथून 1972 साली जुन्या अकरावी या माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ग्रुपमधील मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने ठरविलेल्या दिवशी आदिवासी आश्रमशाळांना भेटी द्यायचा योग आला. आज वयाच्या सत्तरीत असलेलो आम्ही सर्व काहीशा उत्सुकतेने आणि कसं असेल या आदिवासी पाड्यांवरील जीवन आणि शाळा, एक वेगळाच अनुभव अनुभवण्यासाठी निघालो होतो.
शाळेत प्रवेश करताच शाळेच्या संचालक आणि शिक्षकांनी सुहास्य वदनाने स्वागत केले. चहापाणी देऊन मुलांना आमची ओळख करून दिली. आमच्या भेटीचा उद्देश त्यांना सांगितला. त्या छोट्या मुलांनीही आमचे स्वागतपर स्तवन करून आणि स्वतः रानफुलांनी तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन आमचे स्वागत केले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एकंदरीत सहा आश्रमशाळांना आम्ही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे तेथील शिक्षक आणि छोट्या विद्यार्थ्यांनी आमचं स्वागत केलं.
वयाच्या सत्तरीतील आमच्या टीमला पाहून तेथील शिक्षक आणि संचालक यांनाही आमच्याबद्दल फार कौतुक वाटलं. आजचा सुटाबुटातला गळ्याला टाय लावलेल्या शहरी बाल विद्यार्थ्यांपेक्षा येथला हा आदिवासी बाल विद्यार्थी मनाला आपलासा वाटत होता, भावला होता. बेंच वा टेबलखुर्च्या नसतानाही वर्गात खाली रांगेत शिस्तीने गलका न करता बसणे, शिक्षकांची आज्ञा पाळणे येथे कसोशीने जाणवत होतं. वर्गातील भिंतीवर सुंदर सुविचार सभोवती लिहिलेले दिसत होते. ‘विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस आहे’ हा एका वर्गातील भिंतीवरील सुविचार मला फार आवडला !
प्रत्येक शाळेत गेल्यानंतर त्या चिमुकल्या मुलांच्या नजरा औत्सुक्याने आमच्या हातातील गाठोड्यांवर पडत होत्या आणि जशी गाठोड्यातील दप्तरं व शालेय वस्तू त्यांना मिळत होती त्या ते कोणताही गलका वा झुंबड न करता घेत होते. त्यात त्यांचा तो निरागस चेहरा आनंदाने, उत्सुकतेने हर्षित होत होता. हातात पडलेल्या वस्तू पाहून ती चिमुकली मुले त्या न्याहाळण्यात इतकी हरखून गेली की, आम्हालाही विसरून गेली. मी मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानी निरागस भाव कॅमेऱ्यात टिपत बसलो.
येथील शाळांमधील शिक्षक-शिक्षिकांचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल. आदिवासी, अशिक्षित, अडाणी अशा सभोवतालच्या समाजातील त्यांच्या मुलांवर सर्व प्रकारचे संस्कार करून, अंगी शिस्त बाणवून, त्यांना शिक्षणाची गोडी लावून शिक्षित करणे एवढे सहजसोपे नाही हे तेथील अल्पशा वास्तव्याने आढळून आले. करमणुकीचे खेळ, हस्तकला, रांगोळ्यांसारखे कलात्मक शिक्षण त्यांना देणे खरंच कौतुकास्पद आहे.
येथे दुपारच्या जेवणाला विद्यार्थ्यांना मिळणारे अन्न निव्वळ वरणभात एवढ्यावरच समाधान मानून खावे लागते. त्यासाठीही लागणाऱ्या चिमूटभर मीठ आणि जिऱ्याचा पैन्पैचा हिशोब सरकारला द्यावा लागतो. मात्र देशातील संपत्ती लुबाडून पळणाऱ्या वृत्तीचा कोणी हिशोब ठेवत नाहीत, ही विदारक वस्तुस्थिती येथे दिसून आली. येथील एका वर्गावर गोड रसाळ पपई देऊन तेथील शिक्षकांनी आमचं आगळंवेगळं आदरातिथ्य केलं. हे आदरातिथ्य आम्हाला फारच भावलं. कोणताही बडेजावपणा नाही. केवळ प्रेमळ भावनेने, आदराने केलेला अल्पोपाहार. असा हा ‘आदिवासी आश्रमशाळा’ अनुभव घेऊन समाधानाने सर्व शिक्षक-शिक्षिकांचा आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन आम्ही परतलो. अर्थात आदिवासी भागात विकासाची गंगा केंव्हा पोहोचेल हाच विचार आमच्या भेडसावत होता!
(लेखक प्रसिद्ध चित्रकार आहेत.)