मुद्दा – अशांत मणिपूर ‘शांत’ व्हावा

>> अनंत बोरसे

वर्षाच्या  सुरुवातीलाच ईशान्य भारतातून चांगली बातमी आली, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना नववर्षात सुबुद्धी सुचली. मणिपूरमधील जनतेची माफी मागितली हे चांगले संकेत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून मणिपूरमधील हिंसाचाराने धुसमुसत आहे. आजवर जवळपास 250 जणांचे जीव गेले आहेत आणि करोडो रुपयांची हानी झाली आहे. मणिपूरमधील हिंसाचारासाठी कारण ठरले ते तेथील हायकोर्टाने मोठ्या प्रमाणावर असलेल्या मैतेई समाजाला इतर जातींप्रमाणे एसटीचा दर्जा देता येईल का? यासंबंधी अभ्यास करण्याचे आदेश मणिपूर सरकारला दिले आणि यावरून कुकी, नागा या आदिवासी आणि एसटी जातींच्या लोकांमधून मोठी प्रतिक्रिया आली आणि त्याची परिणती मैतेई विरुद्ध इतर जाती यांच्या संघर्षात झाली.

मणिपूर तसेच ईशान्य भारतातील सातही राज्ये ही अतिशय संवेदनशील भूभाग आहे. देशाच्या दृष्टीने हा भाग अशांत राहणे ही देशासाठी चिंतेची बाब आहे. आरक्षणाच्या मुद्दय़ावरून स्थानिक मैतेयी आणि कुकी या दोन जमातींमधे संघर्षाची ठिणगी पडली. वेळीच वातावरण शांत करण्याऐवजी तेथील राज्य सरकारने एका समाजाची बाजू घेत आगीत तेल ओतले. मणिपूरमधील एका सेवानिवृत्त सैनिकाच्या पत्नीची काही समाजकंटकांनी भरदिवसा नग्नावस्थेत धिंड काढली आणि तिच्यावर माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करत ठार केले याची चित्रफीत जगासमोर आल्याने ‘मणिपूर फाईल्स’चे वास्तव किती भयानक आहे याचे चित्रण देशाने पाहिले. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार. मात्र तरीदेखील मणिपूर आजही धगधगत आहे. गृहमंत्री अमित शहा हे अधूनमधून काही तरी प्रयत्न करताना दिसतात. राहुल गांधी हेदेखील मणिपूरमध्ये जाऊन आले होते. सुप्रीम कोर्टानेदेखील मणिपूर हिंसाचाराची गांभीर्याने दखल घेत सरकार काही करणार नसेल तर आम्ही पावले उचलू, असा इशारा दिला होता. मणिपूर हे ईशान्य भारतातील संवेदनशील राज्य आहे. ईशान्य भारत कायमच धुसमुसत असतो. यात जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ईशान्य भागात कायमच अशांतता आणि हिंसाचार होत आला आहे.

देश आज कठीण परिस्थितीतून जात आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, विद्वेष, आर्थिक संकट अशी अनेक आव्हाने उभी ठाकली असताना ईशान्य भारत आणि विशेषतः अशांत मणिपूर ही देशासाठी चिंतेची बाब आहे. हिंसाचाराची फार मोठी किंमत देशाने आजवर चुकवली आहे हे लक्षात घेऊन राजकारण, श्रेयवाद, तु-तु-मै-मै या पलीकडे जाऊन सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास करून मणिपूर शांत करायला हवा आणि तेच देशाच्या हिताचे आहे. चला नववर्षात का होईना, देर आये दुरुस्त आये. किमान आता तरी मणिपूर शांत होण्यासाठी प्रामाणिक इच्छाशक्ती आणि मानसिकता ठेवणे आवश्यक आहे.