>> पद्माकर उखळीकर
सरते वर्ष ‘कही खुशी कही गम’ असे गेले असले तरी सरत्या वर्षात सर्वाधिक पिळला गेला तो सर्वसामान्य माणूस. कारण असे की, सरकारच्या धोरणांमुळे महागाई एवढी वाढली की, सर्वसामान्यांना जगणं सहजशक्य तर सोडून द्या, पण कसरत करूनही दैनंदिन गरजा पूर्ण करणं शक्य नव्हतं. त्यामुळे गेली दहा वर्षे लक्षात राहावीत आणि तितकंच गेलेलं वर्ष राहावं असं 2024 होतं. आत पुन्हा नव्याने सुरुवात होईल यात काही संदेह नाही, पण हेही वर्ष महागाईने सर्वसामान्यांना छळणार याची दाट शक्यता. गेल्या वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. पुन्हा एनडीए सत्तेत आली. त्यामुळे आता पुढील पाच वर्षे किंवा येणाऱ्या वर्षात महागाई कमी होण्याची कल्पना करणं म्हणजे मूर्खपणा.
जागतिक अर्थव्यवस्थेनुसार महागाईत वाढ होणं समजू शकतो, पण ती दुपटीने तिपटीने वाढत असेल तर भारत जगाची तिसरी अर्थव्यवस्था यासाठीच होणार असेल तर ती सर्वसामान्यांसाठी नक्कीच नाही. शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार यांनी उभा केलेला भारत भांडवलदारांनी गिळंकृत करावा, असा सवाल उपस्थित होतो. सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देऊ शकेल अशी धोरणं सरकार दरबारी आखली जाण्याची शक्यता फार धूसर. कारण कधी या सरकारात तर शक्य नाही. त्यामुळे सरते वर्ष काय किंवा समोरचे वर्ष काय, सारखेच. याचा फरक जाणवेल तो खिशाचा भार कमी झाला तर. कारण जिथं जिथं जाल तिथं तिथं एकच चर्चा दिसून येईल ती म्हणजे गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नव्हता तर खाद्यतेलाचे भाव, डाळीचे भाव गगनाला भिडले होते, पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव नव्हता. ही चर्चा प्रत्येक वर्षी ऐकायला मिळते. त्यामुळे सरते वर्ष आणि पुढचं भविष्य सारखं असं प्रत्येक क्षेत्रातील माणसाला वाटतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
देशाची अर्थव्यवस्था काही मूठभर उद्योगपतींसाठी अमुक-तमुक स्थानावर नेण्याची कसरत इथल्या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना करावी लागत आहे. सरकार तशी धोरणं आखत असताना त्याचा फटका मात्र देशातील आम जनतेला बसतो आणि तो सोसावा लागतो हे खरं तर लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या धोरणांमुळे. देशाच्या अर्थकारणाच्या चाव्या जनतेने दिल्या असल्याने ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊसतोड, वीटभट्टी, बांधकाम कामगार यांच्या जीवनात नवीन वर्ष किंवा सरते वर्ष यांची कल्पना नसते. केवळ त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीच वेळ मिळत नाही, तर त्यातून ते गेल्या वर्षात तूरडाळ दोनशे रुपये किलो होती. या वर्षी 80 रुपये किलो झाली. असा फरक होईल तेव्हा ते वर्ष सर्वात आठवणीत राहील. त्याला सरत्या वर्षात अमुक मंत्री झाला, भारत क्रिकेटमध्ये या वर्षात अव्वल, अर्थव्यवस्था आघाडीवर, शेअर बाजार तेजीत, भारत चंद्रावर संशोधन करतोय याच्याशी काहीएक देणे नसते. कारण त्याच्या गरजाच त्याला त्यातून डोकं वर काढू देत नाहीत. त्याला यातून उसंत मिळणारी धोरणं जर सरकार दरबारी आखली तर त्याला येणारे-जाणारे वर्ष स्मरणात राहील. तर या गरजा पूर्ण होत नसताना कामाच्या ठिकाणी सहिष्णू वातावरण निर्माण केले तरी त्यांच्या जीवनात राहणीमान उंचावण्यास मदत होईल. मात्र दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडलेला सर्वसामान्य माणूस घरी येईपर्यंत भरवसा राहत नाही. कारण जातीय दंगली, दहशत यांनी देश पोखरून निघालाय.
सध्या तंत्रज्ञान झपाटय़ाने विकसित होत असल्याने एआय तंत्रज्ञानाचा डीपफेक व्हिडीओ समोर आला आणि एआय तंत्रज्ञान जास्त चर्चेत आले. कारणही तसेच म्हणावे लागेल. ‘पुष्पा 2’ चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आणि त्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ या दोन्ही घटना सरत्या वर्षातील. त्यामुळे हे वर्ष यासाठीही स्मरणात राहील. सरत्या वर्षात अनेक महिलांनी कर्तृत्व सिद्ध केले. सरते वर्ष सर्वसामान्यांना दिलासा देईल असे नक्कीच नव्हते तर पुढचे वर्ष दिलासा देईल याची कल्पना करणं म्हणजे गैर! त्यामुळे सरते काय, पुढचे काय… सर्वसामान्यांना सारखेच एवढं मात्र नक्की!