>> ज्ञानेश्वर भि. गावडे
साधारणतः 1960 च्या दशकात मुंबईत सार्वजनिक दूध वितरण व्यवस्थेमार्फत काचेच्या बाटल्यांतून आरेचे दूध पुरविले जात होते, पण या बाटल्यांमधील दुधामुळे विषबाधा झाल्याचे प्रकार वारंवार घडू लागले. त्यामुळे नागरिकांनी तत्कालीन शिक्षण मंत्री दिनकरराव देसाई यांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा मंत्री महोदयांनी देशातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ, विदुषी डॉ. कमला सोहोनी यांना याचे कारण शोधण्याची विनंती केली. त्याप्रमाणे त्यांनी काचेच्या बाटल्यांतून दूध कसे दूषित होते याचा कसून शोध घेतला. त्यांना रिकाम्या झालेल्या बाटल्या ग्राहक नीट धूत नसल्याचे आढळून आले होते. त्याशिवाय आरेच्या सीलबंद बाटल्यांतील दुधात अळ्या सापडल्या होत्या.
ग्राहकांनी त्या नीट न धुतल्यामुळे नव्या दुधात माशा, किडे, शिवाय त्यांची अंडीही सापडू लागली होती. परत आलेल्या बाटल्या कितीही वेळा धुतल्या तरी त्यात कमलाबाईंना खाद्यपदार्थांतील मेटालिक यलो हे प्रकृतीला अपायकारक असलेले खनिज द्रव स्वरूपात आढळून आले होते. परिणामी बाटल्यांमधून दूध पुरवठा करणे मुंबईत बंद करण्यात आले. तेव्हापासून मुंबईकरांना बाटल्यांच्या ऐवजी पॉलिथिनच्या पिशव्यांतून दूध मिळत आहे. या गोष्टीला पाव शतकाचा काळ लोटून गेला असला तरी जुन्या मुंबईकरांना त्या बाटल्या अजूनही स्मरणात असाव्यात.
सांगायचा मतितार्थ इतकाच की, त्यावेळी जनतेचा मोठा आक्रोश लक्षात घेऊन तत्कालीन मंत्र्यांनी तो आक्रोश बंद केला. त्याशिवाय तो इतिहासजमाही केला. आज बाटल्यांऐवजी त्या एका घटनेमुळे पॉलिथिनच्या पिशव्यांतून दूध वितरण हे फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण देशात होत आहे. बाटलीच्या दुधातून विषबाधा होतेय. यातून जनआक्रोश होतो म्हणून त्यावेळच्या सरकारने योग्य पावले उचलली. आज मात्र देशात जनतेचा निरनिराळ्या कारणांवरून जनआक्रोश चालूच आहे, पण कोण लक्षात घेतो हा आक्रोश?