मुद्दा – असंही जगून बघू या…

>> अंजुषा पाटील

आपण  सहजपणे एखाद्याला मदत करून जातो, तर कधी कुणीतरी आपल्याला मदत करतात. जीवन जगत असताना अनेक प्रसंग, घटना, गमती जमती, विनोद आपण बघत असतो. ते सहज, निरामय असं जगणं असतं. आपण काही ठरवत नाही, तेही जगणं असतं.

कधी कधी मदत करूनही काही लोक आपल्याला दोष देतात, स्नेहसंबंध बिघडवतात. काळाची वाळू हातातून सुटली म्हणून काय झालं? असंही एकदा जगून बघू या. कोणती गोष्ट जास्त मनावर न घेता  सकारात्मक विचाराने  विधायक कृतीने आपण पुढे जायला हवे. असंच जगून बघायला पाहिजे.

गाता गाता  जाईन मी 

जाता जाता गाईन मी 

गेल्यावरही या गगनातील 

गीतामधुनी राहीन मी 

माझे जगणे होते गाणे 

कधी मनाचे, कधी जनाचे 

कधी घनास्तव  कधी बनाचे

कधी घनाशय कधी निराशय 

केवळ नाद  तराणे 

माझे जगणे  होते गाणे 

कविवर्य कुसुमाग्रज यांची ही कविता. कवीने जीवनाला गाण्याची उपमा दिली आहे. जीवनात घडत असणाऱ्या प्रसंगाचा, अडचणीच्या चढउताराबद्दल  कवीने मत मांडले आहे. अशा गाण्यांच्या आधारावर  माणूस आपले जीवन सुखकर करून घेऊ शकतो.

जे काही दैनंदिन सुरू आहे तेच माणूस करत जातो, पण काही वेगळं करण्याची ही ओढ माणसाला अस्वस्थ करते. आकर्षक गोष्टीच्या मागे माणसाचं मन धावत असते. तरीही हे जीवन असेच निरंतर अविरत सुरू राहावं असं वाटत असतं.

‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ असं म्हणत दिवसामागून दिवस जात असतात. आपण थोडा विचार केला तर या दिवसाचं आपल्याला  मोल समजून घेता येईल. 84 लक्ष योनी भोगून मनुष्यजन्म प्राप्त होतो. या मनुष्यजन्माचे सार्थक करायचे असेल तर माणसाने माणसासारखे वागले पाहिजे. भुकेलेल्यांना अन्न, गरजूंना मदत  आणि सर्वांभूती प्रेम करताना पाहिजे, तर माणूस सहजपणे  चांगलं पारदर्शक निरामय जीवन जगू शकतो.

लहान बालक निर्मळ मनाने हसत असते. हळूहळू ते घरातील सर्वांना ओळखते. त्यांच्यापाशीच ते जाते. परक्या, नवीन चेहऱ्याच्या माणसाकडे ते बाळ जात नाही. तेव्हापासून त्याला समजतं की, आपला आणि परका कोण? हळूहळू ते बाळ मोठा झाला की, खरंखोटं हे आपण त्याला शिकवतो. ते बालक मोठय़ांकडे पाहून पाहून अनुकरण करू लागते. हे माझं ते माझं यातून मोह, लोभ असे षडरिपू जन्माला येतात. त्यातून दुःखाची निर्मिती होते आणि जीवन हळूहळू बेचव होऊ लागते.

चांगले जीवन जगणं हे आपल्या हातात आहे. इतकं चांगलं जीवन आपण सहजपणे बुद्धीच्या जोरावर जगू शकतो. भौतिक सुखाला बोलतो आणि चांगलं सुखी, समाधानी जीवन सोडून सुखाचा शोध घेत आयुष्यभर भटकत राहतो. कधी शरीराने तर कधी मनाने. पण सुखाचा शोध लागतो का? सुखाचा सदरा कोणाला मिळाला आहे का? आजपर्यंत याचे उत्तर कुणालाही सापडलेले नाही.

समर्थ रामदास म्हणतात, सुखसुखा म्हणता दुःख ठाकुनी आले. सुखाच्या मागे धावल्यानंतर दुःख पाठी लागते. त्या परमेश्वराला साक्षी ठेवून  प्रत्येक कृती करू या. असेही जगून बघू या. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार तो आहे याची जाणीव ठेवून  जगणं सहज शक्य आहे. मनातले वाईट विचार, गैरसमज, राग, लोभ, द्वेष मनातून काढू या. मन प्रसन्न ठेवून जगायचा प्रयत्न केला तर माणसाला कोणताच आजारही होणार नाही.

असंही साधंसोपं जीवन जगून बघू या. कधी कधी आपलं चुकत नसताना समोरची व्यक्ती आपल्याशी चांगले संबंध ठेवत नाही. तेव्हा आपल्यालाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ येते आणि मनातल्या मनात म्हणायचे, असंही जगून बघू या. एखाद्या व्यक्तीच्या आपण जास्त जवळ जातो, त्या व्यक्तीला मदत करतो आणि मग कधी कधी वाईट अनुभवसुद्धा येतात. त्या अनुभवातून शहाणे होऊन असंही जगून बघू या असा प्रयोग करता येतो. प्रसंगावधान, थोडी सावधानता  बाळगूनच या जगात वागावे लागते. तरीही असंही जगून बघायला काय हरकत आहे!