मुद्दा- वाढते वायू प्रदूषण

>> प्रदीप शंकर मोरे 

 जागतिक  पातळीवरील ‘लँसेट प्लॅनेटरी हेल्थ’ या वैद्यकीय नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालातील निष्कर्षानुसार, वायू प्रदूषणामुळे दरवर्षी भारतातील दहा शहरांमध्ये एकूण मृत्यूंपैकी सात टक्क्यांहून अधिक अकाली मृत्यू होतात. वर्षाला 33 हजार मृत्यू इतके मोठे हे प्रमाण आहे.

भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी ही ती प्रमुख शहरे असून वायू प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये दरवर्षी 12 हजार मृत्यू होतात. त्यानंतर मुंबई (5 हजार 91 मृत्यू) आणि कोलकाता (4हजार 678 मृत्यू) या शहरांचा क्रमांक लागतो, तर शिमलामध्ये दरवर्षी वायू प्रदूषणाला बळी पडणाऱ्यांची संख्या 59 मृत्यू इतकी आहे. या शहरांत हवेतील वायू प्रदूषण करणाऱ्या सूक्ष्म कणांचे प्रमाण पीएम 2.5 पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

एकीकडे मोठय़ा प्रमाणात विकासाची कामे सुरू असताना त्यासाठी जंगलावर कुऱ्हाड पडत असल्यामुळे या शहरांमधील हरित पट्टा दिवसेंदिवस कमी कमी होत चालला आहे. परिणामी येथील प्रदूषणही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त जंगलतोड थांबविणे, वाहतुकीसाठी अक्षय ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे अशा विविध उपायांची गरज आहे.