आपल्या परसातला (बॅकयार्डमधला) नैसर्गिक उपग्रह म्हणून आपण 1969 पासून चंद्राकडे पाहायला लागलो. कारण त्या वर्षी 20 जुलै रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पदार्पण केले. तोपर्यंतचा चंद्र जगातल्या सर्व संस्कृतींमधल्या, काव्याचा, प्रेमाच्या गोड व हळव्या गीतांचा विषय होता. त्यात आपल्याकडे त्याच्या वैज्ञानिक आविष्कारांनी घडणाऱ्या नैसर्गिक कलांवर आधारित चांद्रमास किंवा चंद्रावर आधारित कॅलेंडर (किंवा कालदर्शिका) तयार झाली. आपले सगळे (एका मकरसंक्रांतीचा अपवाद वगळता) सगळे सण चंद्राच्या तिथीवर अवलंबून आहेत. चांद्र-सौर महिन्यांची सांगड पृथ्वीच्या सौरभ्रमणाशी घालण्यासाठी तीन वर्षांनी एकदा चंद्राचा अधिक महिनाही आला. कारण सौरमास आणि वर्ष यांचे गणित 365 दिवसांचे. चांद्रमास अवघ्या साडेसत्तावीस दिवसांचा. त्यामुळे पृथ्वीची सूर्यपरिक्रमा पूर्ण होताना चांद्रवर्ष मागे पडते. मग दर तीन वर्षांनी ही कालगती सौर वर्षांबरोबरीची करावी लागते.
तसे केले नाही आणि सणवार चांद्रमासानुसार तसेच सुरू ठेवले तर केव्हातरी होळीचा सण भरपावसात येईल. अशी गडबड होऊ शकते हे आपल्या पूर्वजांनी ओळखले. त्यांनी ‘अधिक मासा’ची सोय करून ही तफावत भरून काढली. यातील संस्कृत शब्द मास म्हणजे महिना हे लक्षात घ्यायला हवे. तर चंद्र असा आपल्या रोजच्या जिव्हाळ्याचा विषय. इतकी वर्षे संशोधन झाले तरी चंद्र विज्ञानालाही संपूर्ण कळलाय असे नाही. सगळे काही संपूर्णपणे समजलंय असं वैज्ञानिक विचारधारा कधीच म्हणत नाही. कोणतेही नवे संशोधन त्या त्या काळात ‘आजचं’ असतं. ‘उद्या’ त्यात नवी माहिती, नवा अभ्यास आणि पुराव्यानिशी सिद्ध झालेल्या सिद्धांतांनुसार बदल होऊ शकतो व वैज्ञानिक विचार ते मोकळेपणाने मान्य करतो. याचे एक उदाहरण म्हणजे टॉलेमी यांचा विश्वाचे केंद्रस्थान पृथ्वी आहे हे मत कोपर्निकस यांच्या विश्वकेंद्र सूर्यच आहे या विचारानंतर मागे पडले. कालांतराने विश्वाचे नव्हेच, पण आपल्या दीर्घिकेचेही केंद्रस्थान ना पृथ्वी, ना सूर्य, तर एक विराट कृष्णविवर आहे हे सिद्ध झाले. याचा अर्थ टॉलेमी, कोपर्निकस यांना कळत नव्हते असा उथळपणे समजच योग्य नव्हे. उलट त्यांच्या मतांमधून विश्वकेंद्राच्या विचाराला चालना मिळाली हे त्यांचे योगदान किंवा देणे महत्त्वाचे ठरते.
हे सर्व सविस्तर मांडण्याचे कारण असे की, संशोधनात ज्या गोष्टी आपल्याला सामोऱ्या येतात त्यांना आपल्या मतांपेक्षा किंवा धारणांपेक्षा अधिक महत्त्व असते. म्हणूनच आपला चंद्र, पृथ्वी, सूर्य, इतर ग्रह-तारे, दीर्घिका आणि विश्व याविषयी नवनव्या संशोधनाने आपण प्रगती करतो व चकितही होतो. आपल्याला जे विश्व दिसते तो एकूण विश्वाचा केवळ चार टक्के भाग आहे याचे ज्ञान हीसुद्धा अशीच विस्मयकारी गोष्ट.
मग आता चंद्राची चकित करणारी कहाणी कोणती? आहे ना. आपल्या बोलण्यात नेहमी येते की, अहोरात्र कष्ट करणारी अनेक माणसे असतात. इंग्लिशमध्ये ‘ट्वेन्टी फोर बाय सेव्हेन’ म्हणजे 24 तासांचे, सप्ताहाचे सातही दिवस कार्यरत असल्याचे बोलले जाते. अर्थात ती वर्कोहोलिक असल्याचे सांगण्याची एक पद्धत आहे. पण ‘ट्वेन्टी फोर’ऐवजी आपली ‘अहोरात्र’ (अहो म्हणजे दिवसाचा प्रकाशित भाग 12 तास आणि 12 तासांचा काळोखी भाग म्हणजे रात्र असं ‘अहोरात्र’). आता या 24 तासांच्या संपूर्ण दिनकालाचे रूपांतर 25 तासांत झाले तर? तर आपण ‘ट्वेन्टी फाइव्ह बाय सेव्हन असे काम करतो’ म्हणावे लागेल, पण त्याच वेळी सप्ताहाचे (आठवड्याचे) सात तास वाढल्याने तेही ‘गणित’ सुधारावे लागेल. सरासरी 30 दिवसांत 30 तास वाढले तर वर्षही एका महिन्याने वाढेल आणि एकूणच कॅलेन्डरवर परिणाम होईल.
पण हे का घडेल. त्याची साक्ष चंद्र देईल. दरवर्षी आपला चंद्र पृथ्वीपासून 3.8 सेंटिमीटर दूर जातोय. त्याचा हा दुरावा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीवर परिणाम करेल. परिणामी पृथ्वीचा वेग मंदावेल आणि दिवसाची वेळ 25 तासांची होईल. हे केवळ आताच घडतंय का? बिलकुल नाही. पृथ्वीवर माणसाचीच काय सजीवाचीही वस्ती नव्हती त्या काळात म्हणजे 1 अब्ज 40 कोटी वर्षांपूर्वी चंद्र पृथ्वीच्या जवळ होता. पृथ्वी तिच्या अक्षाभोवती (स्वतःभोवती) अधिक वेगाने फिरत होती आणि दिवस केवळ 18 तासांचा होता हे गणिती अभ्यासातून लक्षात आलेय.
चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना परिभ्रमण ऊर्जा कोनीय संवेग म्हणून मिळते. त्यातून चंद्रालाही गतीचा लाभ होतो. यात बदल होऊन पृथ्वी-चंद्र अंतर वाढू शकते. त्यामुळे जे परिणाम (लाखो वर्षांनी) दिसतील त्याची सुरुवात मात्र कधीच झाल्याचे आपल्याला समजलंय. त्यामुळे पुढच्या अतिप्रगत वैज्ञानिक काळात ही गोष्ट लक्षात घेऊन दिनदर्शिकेत बदल करावा लागेल. कारण ग्लोबलायझेशन वाढत गेल्याने सणवारांसाठी, ऋतुचक्राशी निगडित स्थानिक दिनदर्शिका जगात सर्वत्र वेगवेगळ्या असल्या तरी ‘वर्क फ्रॉम होम’च्या जमान्यात एक कॉमन घड्याळ आणि दिनमान असावेच लागेल. त्याचा विचार पुढच्या पिढ्या करतीलच. परंतु विज्ञानाचा विचार केला तर अशा गंमत गोष्टी आपल्याला आजही भविष्यातील कालमापनाचा अंदाज देऊ शकतात हेसुद्धा मनोरंजक सत्य आहे.