मोनेगिरी- अभागी सरला मावशी

>> संजय मोने

सरलादुर्दम्य इच्छाशक्ती आणि ओठांवर कायम विराजमान असणारं हसूहे सरला मावशीचं दारिद्र्यावर मात करणारं हत्यार होतं. मात्र ती हे जग सोडून गेली तेव्हाच तिची सगळ्या वेदनांतून सुटका झाली. दुर्दैवाचे चटके किंवा झळा जन्मापासून तिच्या पाचवीला पुजोल्या होत्या

खादं माणूस किती कमनशिबी असावं याचं सरला मावशी हे ठळक उदाहरण आहे. दुर्दैवी हा शब्दही तिच्या नशिबात आलेल्या आणि भोगाव्या लागलेल्या यातनांसाठी अपुरा पडेल. ती हे जग सोडून गेली तेव्हाच तिची सगळ्या वेदनांतून सुटका झाली. दुर्दैवाचे चटके किंवा झळा जन्मापासून तिच्या पाचवीला पूजल्या होत्या. ताडदेवमधल्या एका गरीब घरात तिचा जन्म झाला. हा तो काळ होता जेव्हा किमान गरजा जेमतेम भागवता येतील इतके कमी पैसे मिळवणारे आणि कमाल गरजांपेक्षा खूप जास्त पैसे मिळवणारे असे दोनच वर्ग तेव्हा समाजात होते. नवश्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीय असे दिखाऊ आणि नकली वर्ग जन्माला आले नव्हते. आपण तिला सरला मावशी म्हणू या. घरात सर्व मिळून सहा जण होते. आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असं कुटुंब होतं. सरला सगळ्यात मोठी होती. त्या काळात मोठ्या भावाचे किंवा बहिणीचे कपडे मागच्या भावंडाला मिळायचे तेच त्याच्यासाठी नवीन कपडे. सरला सगळ्यात मोठी असल्याने लहानपणी नेहमी नवे कपडे मिळायचे. तोच काळ तेवढा तिच्यासाठी अत्युच्च सुखाचा काळ होता. पण तोही लवकरच संपुष्टात आला. तिचे वडील अचानक वारले तेव्हा ती फक्त सोळा वर्षांची होती आणि सगळ्यात लहान भाऊ आठ वर्षांचा होता. आईचं शिक्षण जेमतेम साक्षर म्हणण्याइतकंच होतं. सगळी लहान भावंडं शिकत होती.

उपहारगृहांना लागणाऱया भाज्या आणि कडधान्यं चिरून व सोलून द्यायचं काम आईने स्वीकारलं. इतर भावंडांची मदत होतीच, पण संसाराला पडलेली आर्थिक ठिगळं झाकायला ती अपुरी होती. अर्धवेळ नोकरी करून सरला शिकत राहिली आणि भावंडांची शिक्षणं तिने थांबू दिली नाहीत. तीन-चार नोकऱया त्या काळात सरला मावशी करायची. दिवसाचे बारा तास त्यात जायचे. शिवाय तिचं महाविद्यालयीन शिक्षण होतंच. आसपासच्या लोकांना इच्छा असून कधी फार मदत करता आली नाही. कारण तेव्हा सगळ्यांनाच आपापला संसार चालवण्याइतकेच पैसे मिळायचे. पण सरला मावशी आणि हिंमत दोघीही हरल्या नाहीत. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ओठांवर कायम विराजमान असणारं हसू हे सरला मावशीचं दारिद्र्यावर मात करणारं हत्यार होतं.

सरला मावशी दिसायला अत्यंत सुंदर होती. तिची भावंडं लख्ख गोरी होती आणि मावशी किंचित सावळी, पण तरीही हजारात उठून दिसेल अशी. हुशार तर होतीच, पण अतिशय उत्तम हस्ताक्षर हे तिला लाभलेलं एक देणं होतं. एव्हाना ती 22-23 वर्षांची झाली होती. म्हणजे त्या काळात लग्नाच्या वयाची. पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिला लगेच नोकरी मिळाली होती. तिच्या महाविद्यालयातल्या एका तरुण अध्यापकाने तिला लग्नाबद्दल विचारलं होतं. पण भाऊ शिकत होते, लग्न झालं तर घरी येणारे पैसे थांबले असते म्हणून तिने नकार दिला. तेवढ्यात तिला एका लेखकाकडे लेखनिक म्हणून संध्याकाळी चार तासांची नोकरी मिळाली. घराच्या अगदी जवळ म्हणून तिने ती स्वीकारली. वर्ष-दीड वर्ष उलटली. बहीण लग्नाला आली होती. पण तिने त्या काळात प्रेमविवाह केला आणि ती निघून गेली. भावांची शिक्षणं संपत आली होती आणि तेही अर्धवेळ नोकऱया करत होते. पण घर मात्र सरला मावशीच्या पैशांवर चालत होतं. ती जिथे लेखनिक म्हणून काम करायची त्याच्या बाजूला असलेल्या कचेरीत एक तरुण उमदा माणूस यायचा. त्याला मावशी आवडली होती, पण त्याची जात वेगळी होती. त्यामुळे तिला थेट विचारायला त्याला संकोच वाटत होता म्हणून त्याने एकदा मावशीच्या एका भावाला गाठलं आणि तिला द्यायला त्याच्याजवळ एक पत्र दिलं.

त्यानंतर तीन-चार वेळा तो येऊन मावशीबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. पण त्याचं पत्र मिळाल्याचं काही तिच्या संभाषणातून त्याला जाणवलं नाही. तिचं मौन म्हणजे नकार असं समजून तो येईनासा झाला. काळ त्याच्या गतीने चालत होता. सरला मावशीची आई हे जग सोडून गेली. त्यालाही वर्षं लोटली. तिचे सगळे भाऊ लग्न होऊन आपापल्या संसारात मग्न झाले होते. तिची जुनी जागा विकून त्यातला तिचा वाटा तिला दिला गेला आणि प्रत्येक भावाकडे चार-चार महिने राहायची तिची त्रिस्थळी यात्रा सुरू झाली. तिथे तिला फार विचित्र वागणूक मिळत होती. घरातले सगळे दुर्लक्ष करायचे. जाणूनबुजून अपमान करायचे नाहीत. याच बहिणीने आपल्याला आयुष्यात उभं केलंय हे थोड्याबहुत फरकाने सगळे विसरले होते. तिची खूप घुसमट होत होती. पण आता दुसरा इलाजच नव्हता. कशीबशी ती दिवस काढत होती.

अचानक एक दिवस तिच्या भावाने तिच्या हातात एक पत्र दिलं. त्यावर 35 वर्षं जुनी तारीख होती. ते पत्र सरलाला त्या काळात भेटायला यायचा त्याने लिहिलं होतं. आपल्या भावना त्याने त्यात लिहिल्या होत्या व उत्तर द्यावं अशी विनंती केली होती.

“सरला, तुला तेव्हा द्यायला विसरलो.” एवढंच भाऊ म्हणाला.

सरला उन्मळून पडली. काय बोलावं ते तिला कळेना. तो तरुण आता एक नेता, एक मंत्री झाला होता. सरलाने जाऊन त्याला भेटायचं ठरवलं. त्याच्या ऑफिसात जाऊन एक चिठ्ठी पाठवली. साहेब भेटू शकणार नाहीत असा निरोप आला. फक्त दोन मिनिटांचं काम आहे असा उलट निरोप तिने दिला. मुश्किलीने तिला संध्याकाळी भेटायची वेळ मिळाली.

आत जाऊन तिने ते पत्र मंत्रीसाहेबांच्या टेबलवर ठेवलं आणि म्हणाली, “साहेब, मला हे आज दिलं गेलं.”

मंत्रीसाहेब खुर्चीतून उठले आणि त्यानेच 35 वर्षांपूर्वी लिहिलेलं पत्र वाचून तो आाढमक म्हणून प्रसिद्ध असलेला माणूस अक्षरश गुढघ्यावर बसून ढसाढसा रडायला लागला.

“तू काहीच उत्तर दिलं नाहीस म्हणून मी लग्न केलं नाही सरला.” सरला मावशीच्या डोळ्यांतून अश्रूंची संततधार वाहात होती.

“मी तुझ्यासाठी काय करू शकतो? मला शक्य असेल तितकं करेन मी तुझ्यासाठी. काही पैशांची मदत…” मंत्री पुटपुटला.

“शक्य असेल तर हा सगळा काळ 35 वर्षे मागे न्या!” रडता रडता सरला म्हणाली.

पुढे त्यांच्यात काय बोलणं झालं ते कळलं नाही. कारण त्या दिवसानंतर सरला कोणालाही दिसली नाही. मंत्रीसाहेबांनी तिला शोधण्यासाठी जंगजंग पछाडले, पण काही उपयोग झाला नाही. अभागी सरलाचा शेवटही अभागी झाला.

[email protected]