साहित्य जगत- संमेलनातून परतताना…

>> रविप्रकाश कुलकर्णी

तीन दिवसाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपले. अखेर संपले असेही म्हणता येईल. म्हणजे तसं म्हणायची प्रथा आहे. हे म्हणजे कसं गणपती यायचे तेव्हा येतात आणि ठरलेल्या वेळी जातात. तरी आपण म्हणतोच ना, “गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या.’’ तेव्हा आता पुढच्या संमेलनाची वाट पाहूया.

दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी संमेलन अजून संपलं देखील नाही तोच पुढचं संमेलन आम्हाला भरवण्याची संधी द्यावी यासाठी चिपळूण, सातारा आणि इचलकरंजी येथील साहित्यिक संस्था पुढे आल्या! 31 मार्च पर्यंत आमंत्रण स्वीकारण्याची तारीख आहे. अजून कितीजण पुढे येतात ते पाहायचंय. याचाच अर्थ असा की काहीही होवो लोकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हवंच आहे. आता महाराष्ट्रात संमेलन कमी का भरत असतात? पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे आकर्षण आहे त्याची बरोबरी कुणाशीच होऊ शकत नाही! फार तर असं म्हणता येईल की संमेलन कोणीही करो, ज्याला हवंय तसं करू दे. पण नियोजन मात्र सरहद संस्थेला म्हणजेच संजय नहार आणि त्यांच्या चमूकडे द्यावं. अर्थात हा विश्वास मी आधीच म्हणजे दिल्लीचं संमेलन ‘सरहद’कडे सोपवलं तेव्हाच दाखवला होता. याचं कारण संजय नहार यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांना साथ देणाऱया सहकाऱयांची.

साहित्य संमेलनाचा पहिला दिवस हा महत्त्वाचा दिवस. ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन, ध्वजारोहण या गोष्टी संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी नक्कीच उपयुक्त होतात. पण त्याचवेळी हे सोपस्कार, उपचार म्हणून होत नाहीत ना असा पण मनात विचार येतो हेदेखील तितकंच खरं. हे सर्व दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होतं. मात्र दिल्लीतील उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होता तो मात्र विज्ञान भवनमध्ये झाला बंदिस्त सभागृहामध्ये.

या समारंभाला मोजक्याच लोकांना जाता येणार आहे याची वाच्यता खूपच झाली होती. त्याबद्दल अनेकांनी नाराजीदेखील व्यक्त केली. पण नंतर राहुल मेंगडे या कार्यकर्त्याने आधार कार्ड दाखवल्यानंतर प्रवेशिका मिळवून दिल्या. अनेकांना त्यांनी तशी मदत केली. आधी नाही म्हणायचं आणि नंतर सगळं द्यायचं असं का? तर उत्तर मिळालं ‘हो’ म्हणून ‘नाही’ दिलं तर खूप आरडाओरडा होतो. पण तेच ‘नाही’ म्हणून दिलं की आनंद होतो!

उद्घाटन समारंभ संस्मरणीय झाला तो संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांच्या नेमक्या आणि सुटसुटीत भाषणामुळे. त्यांनी सुरुवातच केली, ‘शंभर वजा दोन असं हे अखिल भारतीय मराठी संमेलन…’ आपल्या पहिल्याच वाक्याला टाळ्या घेणाऱया त्या एकमेव अध्यक्षा असाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत देखील असंच म्हणावं लागेल. ते फर्डे वत्ते आहेत हे सगळ्यांना आता ठाऊक आहे. पण आपल्या हिंदी भाषणात त्यांनी मराठी लेखकांचे, त्यांच्या रचनेचे जे संदर्भ दिले त्याने थक्क व्हायला झालं. भाषणात त्यांनी समर्थ रामदासांचे ‘मराठा तितुका मेळवावा…’ असं म्हटलं तेव्हा भल्याभल्यांना टाळ्या देण्याचा मोह आवरला नाही. मराठी भाषा त्याची परंपरा आणि अभिजातता याचा त्यांनी उचितगौरव केला. शरद पवार, देवेंद्र फडणविस यांनीदेखील प्रसंगानुरूप भाषणे केली इतकेच. हा सगळाच कार्यक्रम भरगच्च उपस्थितीमुळे संस्मरणीय ठरला. एरवी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम एवढा रंगला असता का?… तर नसता रंगला.

बाकी संमेलनातील मुलाखती, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कवी संमेलन वगैरे गोष्टी म्हणजे आलटून पालटून केलेले प्रयोग. सादर करणारे ते वेगळे वेगळे. अपवाद फक्त ‘मराठीचा अमराठी संसार’ या परिसंवादाचा. यामध्ये संवादक अस्मिता पांडे आणि बाळ कुलकर्णी यांनी वक्त्यांना नेमके आणि थेट प्रश्न विचारून परिसंवाद रंगतदार केला. म्हणून ही विशेष नोंद. संमेलनात चिडके आणि चिरके सूर निघाले नाहीत असं नाही. त्यांना कधीतरी सद्बुध्दी होईल अशी आपण प्रार्थना करूया. पण ते आता आपण विसरणं चांगलं.

 शेवटी अखिल भारतीय मराठी संमेलन म्हणजे एक प्रकारचा कुळाचार असल्यासारखा आहे. प्रत्येकाने तो यथाशक्ती पाळायचा असतो. तो आपण होता होईता साजरा करूया. बाकी स्मृतीशेष निमित्ता निमित्ताने येतीलच. स्मृतींचा हाच तर विशेष असतो!