
>> पूजा सामंत, [email protected]
‘पंजाब दा पुत्तर’ सनी देओल याचा डेब्यू चित्रपट ‘बेताब’ रिलीज होऊन तब्बल 42 वर्षे झालीत. या 42 वर्षांमध्ये सनीच्या कारकीर्दीत अनेक चढउतार आलेत. ‘बेताब’ सुपरहिट झाला आणि त्यानंतर दरवर्षी सनीचे किमान 3-4 चित्रपट रिलीज होत गेले. त्यात एखादा हिट तर अन्य फ्लॉप होत होते. यादरम्यान सनीने राजकारणात प्रवेश केला. पंजाबच्या गुरुदासपूरमधून सनी भरघोस मतांनी निवडून आला. पण तरीही सनी राजकारणात निष्प्रभ ठरला. 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल तब्बल 22 वर्षांनी रिलीज झाला. या फिल्मने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली. ‘ही–मॅन’ धर्मेंद्रचा हा ज्येष्ठ पुत्र नुकताच भेटला तेव्हा तो बराचसा सौम्य वाटला. अतिशय शांत संयतपणे त्याने आपल्या जीवनाचा आणि करीअरचा ताळेबंद मांडला.
आपल्या देशात ‘जाट’ म्हणजे शेतकरी असं मानतात. जाट हा पंजाबच्या शेतकऱ्यांचा एक समुदाय. आम्ही देओल कुटुंबीय मूळचे ‘जाट’ म्हणजे किसानच आहोत. मला ही कथा रिलेटेबल वाटली आणि म्हणून देखील आवडली. ‘जाट’चे दिग्दर्शक/लेखक गोपीनाथ मल्लीनेनी साऊथचे आहेत. त्यांनी जेव्हा 2024 मध्ये कथा ऐकवली तेव्हा ती मला आवडली आणि मी त्वरित होकार दिला. सर्वसामान्य जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून व्यक्तिरेखा साकारणं मला आवडतं. कोटय़धीश आईवडिलांच्या लाडाकोडात वाढलेला ‘रईसजादा’ साकारण्यापेक्षा ‘गदर’सारखे वा ‘जाट’ किंवा त्याआधी मी केलेले ‘अर्जुन’, ‘त्रिदेव’, ‘बेताब’सारखे चित्रपट आणि अशा देसी व्यक्तिरेखा साकारणं मला मनापासून आवडतं. मी सर्वसामान्य जनतेचा एक सदस्य आहे. त्यांचा प्रतिनिधी आहे असं मला मनापासून वाटतं. ‘जाट’सोबत माझा ‘भय्याजी सुपरहिट’ हा जुना चित्रपट पुन्हा रि-रिलीज होत आहे. जुने चित्रपट नव्याने रि-रिलीज होण्याचा हा ट्रेंड चांगलाच आहे. नवे चित्रपट म्हणावे तसे चालत नाहीत, जुने लोकप्रिय ठरलेले चित्रपट पुन्हा रिलीज करणे म्हणजे प्रेक्षकांना पुन्हा थिएटरपर्यंत आणण्याचा एक उत्तम मार्ग.
मला हल्ली हा प्रश्न वरचेवर विचारण्यात येतो, मी साऊथच्या निर्मितीतील (जाट) चित्रपट का स्वीकारला? माझ्या 43 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीतील हा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आहे. मध्यंतरी मी बोलून चुकलो, मैं साऊथ में सेटल्ड होना चाहता हूँ! त्याचे अनेक अर्थ काढण्यात आलेत. त्याचं स्पष्टीकरण देतो की मी दक्षिणेत राहायला जात नाहीये. माझी कर्मभूमी मुंबई महाराष्ट्र हीच कायम राहील. पण मला दक्षिण फिल्म इंडस्ट्रीचे वर्क कल्चर खूप आवडले. आपल्या कामाविषयी त्यांची असलेली श्रद्धा मला भारावून गेली. खूप शिस्तप्रिय आहेत ही माणसं. आपल्या कलाकृतीला ते जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतात. तरीही मासेससाठी चित्रपट असावा याकडे त्यांचा कटाक्ष असतो. एकेकाळी आमची हिंदी इंडस्ट्रीदेखील नावाजलेली होती. चित्रपटाचा दिग्दर्शक सगळ्यांसाठी सर्वोतोपरी असे. गेल्या 8-10 वर्षांमध्ये दिग्दर्शक नामधारी झालाय. हा बदल का, कसा, कधी झाला, या विचित्र बदलांना कोण जबाबदार आहे या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. मी त्रासलो आणि म्हणूनच दक्षिणेत गेलो. हमारी (हिंदी) इंडस्ट्री में गड़बड़ियां कहां से हुई, नहीं कह सकता. लेकिन बड़ा अ़फसोस हो रहा है इस माहौल को देख कर!
2023 हे वर्ष आमच्या देओल कुटुंबासाठी खूप खास होतं. पापाजींचा (धर्मेंद्र) ‘राजा और रानी की प्रेमकहानी’ हिट झाला, बॉबीचा ‘आश्रम’ ही वेब सीरीज आणि त्यानंतर रिलीज झालेल्या ‘अॅनिमल’मुळे बॉबी देओल प्रचंड भाव खाऊन गेला. माझा ‘गदर 2’ सुपर हिट ठरला. एकूणच आमच्या कुटुंबात एका दीर्घ कालावधीने खुशी के मौके एक साथ आले.
गंमत सांगतो – बॉबी अनेक वर्षं घरी होता. त्याला काम नव्हतं. ‘आश्रम’ वेब सीरीजसाठी त्याला प्रकाश झा यांनी ऑफर दिली. बॉबीचा आनंद वाढावा म्हणून मी आणि मम्मी (प्रकाश कौर) त्याच्यासोबत ‘आश्रम’च्या स्क्रीनिंगसाठी निघालो. पण बॉबी म्हणाला, भय्या आश्रम ना देखो!… आणि तेच त्याने मम्मीला सांगितलं. आम्ही चक्रावलो. पण बॉबीची इच्छा होती त्याला ‘क्रूर बीभत्स’ रूपात आम्ही पाहू नये. त्यामुळे त्याच्या इच्छेला आम्ही मान दिला. आजतागायत मी आणि मम्मीने बॉबीचा ‘आश्रम’ नाही पाहिला. बॉबीला पडद्यावर रक्तबंबाळ पाहणं मला आणि मम्मीला अजिबात शक्य नाही. ‘अॅनिमल’ मात्र मी पाहिला. बॉबीच्या व्यक्तिरेखेला यात संवाद नाहीत, पण तरीही त्याचा परफॉर्मन्स पब्लिकने उचलून धरला यातच सगळं आलं. ‘अॅनिमल’मधला बॉबी पाहूनच माझ्या मनात ‘निगेटिव्ह’ व्यक्तिरेखा साकारावी अशी ऊर्मी आली. त्यावर बॉबी म्हणाला, भय्या आपको निगेटिव्ह सूट नहीं करेगा! बॉबी मला भावासमान कमी आणि मुलासारखा जास्त आहे. तो लहान असताना मी त्याची सावली होतो. आमचं देओल कुटुंब एकत्रित कुटुंब पध्दतीतलं आहे. पापा पंजाबहून मुंबईला आले त्याला आता जवळजवळ 70 वर्षं होत आली आहेत आणि तेव्हापासून देओल कुटुंब एकत्र आहे. आम्हाला व्यवहार नसेल जमला, चापलूसी नसेल जमली, पण नातेसंबंध, प्रेम यांना आमच्या लेखी अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. दादाजी, दादी, नाना-नानी, नंतर मम्मी-पापा यांनी कुटुंब बांधून ठेवलं आणि हेच संस्कार आमच्यात उतरलेत.
कोरोना लॉकडाऊन काळात पापासाठी गजबजलेल्या मुंबईत राहणं धोकादायक होतं. म्हणून त्यांनी लोणावळ्याच्या फार्म हाऊसमध्ये स्वतला शिफ्ट केलं. आम्ही सगळे शेती करण्यात आघाडीवर आहोत. पंजाबमध्ये आजोबा शेती करत. शिवाय ते स्थानिक शाळेत हेडमास्तर होते. त्यामुळे शेती करणं आमच्या रक्तात आहे. लोणावळा येथे पापांनी शेतीत अनेक पिकं घेतली. खूप प्रयोग केलेत. आमच्या शेतात काम करण्याऱ्या शेतकऱ्यांशी त्यांची खूप दोस्ती झाली. पापा इथे जुहूच्या घरी आम्हाला भेटायला येतात तेव्हा लोणावळ्याच्या स्टाफचे फोनवर फोन येत असतात. पापांनी त्या सगळ्यांच्या मनात एक प्रेमाचे स्थान निर्माण केलं आहे. ‘राजा और रानी की प्रेम कहानी’चं शूटिंग कश्मीरच्या गुलमर्ग सोनमर्ग, दिल्लीत झालं. तो काळ कोरोनाचा होता. पण पापा त्या दिवसांमध्येदेखील शूटिंगला गेले होते. हल्लीच त्यांच्या मोतिबिंदूचं ऑपरेशन झालं. पापांना त्यांच्या 65 वर्षांच्या कारकिर्दीत खूप पुरस्कार मिळाले नसतील, पण त्यांनी चाहत्यांच्या मनात प्रेमाचं अढळ स्थान निर्माण केलं आहे याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, हेच समाधान आहे. गेली 70 वर्षं पपांनी अनेकांची करिअर घडवली, त्यांना उभं केलं. हे नव्या पिढीतल्या अनेकांना ठाऊकही नसेल. माय फादर इज किंग हार्टेड!
‘दिल्लगी’ (1999), ‘घायल वन्स अगेन’ (2016) त्यानंतर ‘पल पल दिल के पास’ (2019) असे तीन चित्रपट दिग्दर्शित केले. या फिल्म्स करताना मी माझे अभिनयातले करिअर बॅकसीटवर ठेवलं. त्या-त्या काळात आलेल्या ऑफर्सचा मी विचारच केला नाही, कारण माझ्या मते दिग्दर्शन हे पूर्णवेळेचं काम आहे. यात अभिनयाला वेळ देता येत नाही. म्हणून मी अभिनयाला रामराम केला. परंतु मी दिग्दर्शित केलेले कुठलेही चित्रपट चालले नाहीत. या सत्याचा मी स्वीकार केला आणि आता पूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित केलं आहे.
खासदार म्हणून पंजाबातून मी निवडून आलो, असं असताना राजकारणापासून दूर का झालो? तर याचं उत्तरही हेच आहे. माझ्या लक्षात आलं, राजकारण म्हणजे समाजसेवा नाही. माझ्यासाठी राजकारण हे करिअर नाही. लक्षात आल्यावर मी बाजूला झालो. अभिनयाच्या माध्यमातून सर्वसामान्य सिनेप्रेक्षकांचं मनोरंजन करणं हीच माझ्या दृष्टीने समाजसेवा आहे. देशसेवा आहे.
कधी काळी माझ्याकडे, बॉबीकडे चित्रपट नव्हते. आम्ही नैराश्य, तणावाने झाकोळून गेलो. पण आजकाल शेकडो कलावंत डिप्रेशनला तोंड देताना दिसत आहेत. आम्हीदेखील दिलं. मोठा कठीण काळ होता तो. पण माझ्याकडे आत्मविश्वास होता. रब ने मुझे शक्ती दी थी की मै निराशा, हार का सामना कर सकू और उससे बाहर निकल सकू! अपने दर्द को दिल में लेकर ना बैठो. दुःख, तणाव, नैराश्याला विसरायचा प्रयत्न करून सकारात्मक विचार करणं महत्त्वाचं.
माझ्या नावाचा जेव्हा उल्लेख होतो. ‘ढाई किलो का हाथ’ हे पालुपद येतंच. मला आरंभी खूप राग यायचा, अतिशय चिडायचो मी. नंतर लक्षात आलं, जॅकी श्रॉफचा अनेक वर्षं ‘भिडू’ असा उल्लेख होतो, त्याने त्याचा कुठे राग मानला? मग मी का राग का मानावा? मी ‘ढाई किलो का हाथ’ या पालुपदाचा हसतच स्वीकार करू लागलो आणि माझी चिडचिड, तगमग सगळं शांत झालं. माझ्याबद्दल अनेकांना एक अकारण भीती वाटते. कारण पूर्वी कधीकाळी मी तरुण असताना रागावलो असेन, त्याचा इश्यू केला असावा. आम्ही कलाकार म्हणजे आम्हाला हृदय नाही? भावभावना नाहीत? क्वचित कधी भावनांचं प्रदर्शन झालं तर सनी देओल रागीट अशी इमेज करणं चुकीचं आहे. असो, पण आता हा समज मी कसा दूर करू? मी रागीट नाही, मृदुभाषी आहे, इमोशनल आहे, थेट माझ्या पापांसारखाच!