>> अंजुषा पाटील
माझ्यावर लगेच कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव पडतो. मला एखादी वस्तूसुद्धा प्रभावित करते. हुशार असणारी व्यक्ती मला आवडते. तशीच निष्पाप, निरागस व्यक्तीसुद्धा जास्त भावते आणि मी लगेच प्रभावित होते. एखादी व्यक्ती मला भेटली की, मी तिच्याशी चांगली ओळख करून घेते. थोडीशी ओळख झाली की, त्या व्यक्तीचा माझ्यावर लगेच प्रभाव पडतो.
असं का बरं व्हावं, याचा विचार करेपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. कोणत्या ना कोणत्या वैशिष्टय़ामुळे, गुणामुळे एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव पडतो. मी लगेच त्या व्यक्तीचं समोरच कौतुक करते. एखादी स्त्री खूप सुंदर दिसते. एखादीचं नीटनेटकं, टापटीप राहणं, मुख्य मुद्दय़ावर मोजकं बोलणं, लाघवी, मनस्वी, मनापासून प्रामाणिक आणि सहकार्य करणारी, सर्वांभूती प्रेम करणारी, संवेदनशील मैत्रीण माझ्यावर दीर्घकाळ प्रभाव पाडून जाते.
नंतर उशिरा कळतं की, तिने आपल्यावर कोणता प्रभाव टाकला तो. काही जण आपल्या फायद्यासाठी जवळ येतात. काही उपयोग होत नाही म्हटल्यानंतर दूर होतात. हाही एक वाईट प्रभावच असेल. आपण मात्र सर्वांना सारखेच समजतो, पण तसं नसतं. डोळसपणे प्रभावाखाली राहायला हवं एवढं नक्की. प्रसार माध्यमे, वर्तमानपत्र, टीव्ही आणि इतर दृकश्राव्य साधनं नेहमीच प्रभाव पाडतात. काही सेकंदांची जाहिरातसुद्धा आपल्यावर इतका प्रभाव पाडते की, ती वस्तू खरेदी करण्याची आपली इच्छा होते.
मला तर वाटते, प्रभावाचे पण प्रकार असावेत.
वैयक्तिक प्रभाव, सामाजिक प्रभाव, धार्मिक प्रभाव, राजकीय प्रभाव
असे वेगवेगळे प्रभाव आपल्यावर कळत नकळत पडत असतात. आपण जिथे जातो तिथे रमतो. तिथले काहीतरी परिणाम, प्रभाव आपण सहजपणे बरोबर घेऊन येतो आणि बरेच दिवस त्याचा प्रभाव आपल्यावर राहतो. आपण आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रभावित होतोच. म्हणजे प्रभावाचा परिणाम हा चांगला झाला पाहिजे. कधीही कोणत्याही गोष्टीचा चांगलाच प्रभाव पडला पाहिजे. काही वाईटसुद्धा प्रभाव असतात. काही व्यक्तींप्रमाणे काही प्रभावापासूनसुद्धा सावध राहायला हवे. एकदा का आपल्यावर कोणताही प्रभाव पडला की, तो लवकर जात नाही.
संस्कारक्षम वयातच प्रभाव पडतो असं नाही. कोणत्याही वयात हा प्रभाव माणसावर पडत असतो आणि त्याची छाप आपल्याला वागणुकीतून दिसते. कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा, गुणांचा, मूल्यांचा अभाव असण्यापेक्षा प्रभाव केव्हाही चांगला. फक्त आपण कोणाच्या प्रभावाखाली किती राहायचे हा आपलाच प्रश्न आहे. नाही का?