
>> संजीव साबडे, [email protected]
पूर्ण मांसाहारी मंडळींचा आणि नुकतंच नॉनव्हेज खाऊ लागलेल्यांचा आवडता चमचमीत पदार्थ म्हणजे खिमा. खिमापाव मुंबईकरांची आवडती व स्टायलिश डिश आहे. खिमा खावा तर पावाबरोबरच. खिम्यावर तडका आणि तळलेली लाल वा हिरवी मिरची. सोबत कांदा व लिंबू. बस्स! हे पुरेसं व मन तृप्त करणारं असतं.
मांसाहारी लोकांचा प्रश्नच नाही. शाकाहारी मंडळींचा मांसाहार शक्यतो सुरू होतो अंडय़ाचं ऑम्लेट, भुर्जीपासून. सुरुवातीला ते उकडलेलं अंडं वा हाफ फ्रायही खात नाहीत. त्यात त्यांना बहुधा अख्खी कोंबडी दिसत असावी. घरात मांसाहारी पदार्थ बनवत वा खात नसल्याचा तो परिणाम. मग उकडलेलं अंडं आणि काही काळाने सीग कबाब, चिकन टिक्का असा त्यांचा प्रवास होतो. फुल वा हाफ तंदुरी असलं नाहीच. हाडकं असलेलं खायचं ते टाळतात. टिक्का, कबाबनंतर मटण वा चिकन खिमा, बटर चिकन आणि चिकनचे चायनीज प्रकार. म्हणजे बोनलेस. तशी चिकन वा मटण बिर्याणीही आवडू लागते. हाडाच्या भोवतालचं मांस खाणं, ते हातात धरणं त्यांच्या जिवावर येतं. यथावकाश नळी आपटून आतील भाग खाण्याचीही आवड लागते. माशांचा वास व काटे फार उशिरा खाल्ले जातात.
शाकाहारी मंडळींनी नॉनव्हेज खायला सुरुवात केल्यापासून ते महाग झालं, असे टोमणे ऐकावे लागतात. पुरुष घराबाहेर अधिक असल्याने ते लवकर मांसाहारी होतात. नोकरदार महिला वा तरुणीही सहकाऱ्यांमुळे किंचित लवकर नॉनव्हेज खाऊ लागतात. नोकरी नसेल तर मात्र नॉनव्हेजपर्यंत पोहोचणं अवघड असतं. अशा तरुणीचा प्रेमविवाह झाला आणि नवऱ्याचं घर नॉनव्हेजवालं असेल तर पंचाईतच होते. मग काही सवय करून घेतात, तर काही नॉनव्हेज बनवून देतात, पण स्वत खात नाहीत. नॉनव्हेज खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जाणारे पुरुष अधिक. मैत्रिणी वा कुटुंबासोबत असेल तर मुली वा महिला नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये जातात. अर्थात हे चित्र थोडं बदललं आहे.
पूर्ण मांसाहारी मंडळींचा आणि नुकतंच नॉनव्हेज खाऊ लागलेल्यांचा आवडता चमचमीत पदार्थ म्हणजे खिमा. खिमापाव मुंबईकरांची आवडती व स्टायलिश डिश आहे. खिमा खावा तर पावाबरोबरच. चपाती आणि खिमा असं बहुधा मराठी मांसाहारी हॉटेलात आणि घरीच खाल्लं जातं. खिम्यावर वरून तडका आणि तळलेली लाल वा हिरवी मिरची. सोबत कांदा व लिंबू. बस्स! हे पुरेसं व मन तृप्त करणारं असतं. त्यात टोमॅटो घातला की, आंबटपणा येतो, पण खिमा हा खिमा वाटत नाही. वाटाणे घातले की, तो चटपटीत राहत नाही. खिमा, कांदा, मसाला, फोडणी एवढं पुरेसं असतं तो बनवायला. पण त्यात वरून काही असू शकतं. खिमा तडका मारके, खिमा तर्रीवाला, खिमा अंडा घोटाला, खिमा विथ ऑम्लेट, खिमा विथ हाफ फ्राय आणि खिमा पराठा, खिमा-बैदा रोटी. शिवाय स्टफ्ड खिमापाव, खिमा-डोसा आणि सल्लीवाला खिमा हे अतिरिक्त असलं नसलं तरी चालतं. खिमा हिरव्या मिरचीचा, गरम मसाल्याचा, मालवणी मसाल्याचा वा खडे मसाले घालून कुटून केलेला असतो, वरून लाल वा हिरव्या मिरचीचा तडका, पण खिमा खावा झणझणीत.
क्रॉफर्ड मार्केटसमोरच्या ‘न्यू ग्रॅण्ट रेस्टॉरंट’चा खिमा असाच झणझणीत व मसालेदार. पूर्वीचं पोलीस कॅन्टीन. इथला खिमापाव पु. ल. देशपांडे यांना आवडायचा. आंध्र स्टाइलच्या या खिम्याची मस्त चव 40-45 वर्षं कायम आहे. मटण, चिकन खाणाऱ्यांचं ते आवडतं ठिकाण. अर्थात तिथले मासेही छान, पण खिम्याला तोड नाही. वांद्रे, हॉर्निमन सर्कल आणि कुलाब्याच्या ‘बडे मियाँ’कडील खिमापाव आणि खिमा-बैदा रोटी एकदम स्पेशल. ती एक रोटी खाल्ली की, पोट फुल्ल आणि खाल्ल्याचं समाधानही. फोर्टमध्ये एक्सेल्सिअर थिएटरसमोर त्याच नावाचं इराणी रेस्टॉरंट आहे. तिथला खिमा हिरव्या मसाल्यातला, सौम्य, पण चविष्ट. अनेक तरुण-तरुणी तिथे असतात. तिथलं कॅरमल कस्टर्डही मस्त.
हॉर्निमन सर्कलच्या ‘जिमी बॉय’मध्ये मिळणारा लाल मसाल्यातला खिमाही अतिशय उत्तम. त्याला तडका हवा असल्यास सांगायचं.त्यामुळे तो अधिक खमंग लागतो. तिथे खिमा अंडा घोटाला, खिमा विथ हाफ फ्राय किंवा खिमा विथ ऑम्लेटही छान मिळतं. काहीजण तिथे उकडलेल्या अंडय़ाचे लहान तुकडे असलेला खिमाही खात असतात. फोर्टच्या ‘मिलिटरी
कॅफे’मधला खिमा विथ तडका खूपच मस्त. इराणी-पारशी रेस्टॉरंटमध्ये खिमा विथ सल्ली हा छान प्रकार मिळतो. सल्ली म्हणजे बटाटय़ाचा कीस. त्यांच्याकडील सल्ली बोटीही छान असते.
परळला केईएम हॉस्पिटलसमोरील मेरवानजी स्ट्रीटवर ‘तृप्ती’ आहार रेस्टॉरंट आहे. तिथे मांसाहारी पदार्थांबरोबरच भंडारी पद्धतीचा चमचमीत व मसालेदार खिमा मिळतो. या रेस्टॉरंटला 35 वर्षं होऊन गेली, पण चव कायम आहे. तिथे खिमा थाळीही आहे. तिथला खिमा नक्की खावा. दादरला टिळक पुलाला लागून हिंदू कॉलनीच्या तोंडावर कॉलनी रेस्टॉरंट आहे. टिपिकल इराणी रेस्टॉरंट. तिथला खिमाही उत्तम, पण काहीसा सौम्य. दादर पश्चिमेला अमरहिंद मंडळापाशी असलेल्या ‘नवमेजवानी’ रेस्टॉरंटमध्ये मिळणारा चिकन खिमा चविष्ट आहे. सर्वच मराठी नॉनव्हेज रेस्टॉरंटमधील खिमा अधिक मसालेदार व चमचमीत असतो. अंधेरी पश्चिमेला न्यू लिंक रोडवरील ‘नॅचरल पराठा’मध्ये चिकन खिमा पराठा आणि खिमा सँडविच उत्तम मिळतात. अर्थात पराठे मिळणाऱ्या जवळपास रेस्टॉरंटमध्ये चिकन वा मटण खिमा पराठा मिळतो. महाग मटण आणि त्याविषयीची शंका यामुळे बरेच जण चिकन खिमा मागवतात. चिकन खिमा तुलनेने स्वस्तही असतो.
भेंडी बाजार, कुर्ला व घाटकोपरच्या ‘शालिमार’ रेस्टॉरंटचा खिमा मस्त तर्रीसह असतो. फार कोरडा नसल्याने खूप छान लागतो. कुलाबा, फोर्ट आणि दादरच्या सेनापती बापट मार्गावर असलेल्या ‘खिमा एक्स्प्रेस’मध्ये अनेक प्रकारचे मटण व चिकन खिमा मिळतात. ठिकाण लहान, पण चव छान. खिमा सौम्य हवा की तिखट, हे सांगणं उत्तम. वरळीच्या आदर्श नगर भागात ‘हाऊस ऑफ खिमा’ हे स्नॅक्स सेन्टर आहे. तिथे खिमा पिझ्झा, खिमा सँडविच, खिमापाव, स्टफ्ड खिमापाव असे अनेक पदार्थ मिळतात. खार पश्चिमेला ‘चेट्टीनाड टिफिन’मध्ये खिम्यापासून असंख्य पदार्थ तयार केले जातात. त्यात खिमा डोसा, खिमा वडाही आहेत. अंधेरीच्या वर्सोव्यात ‘रोज अँड जो कॅफे’मध्येही खिम्याचे असंख्य प्रकार मिळतात. अंधेरीच्या लिंक रोडवर ‘टाइम्स ऑफ पराठा’मधील खिमा पराठा मस्त. ठाण्यात तीनहात नाक्याजवळच्या ‘इराणी कॅन्टीन’ व काजुवाडीतील ‘बबन पाया सूप सेन्टर’ला तर अवश्य भेट द्यावी. तिथला खिमा खूप छान. वाघबीळ भागात ‘द खिमा कंपनी’कडील खिमापावही उत्तम. मुंबई, मीरा-भाईंदर व नवी मुंबईत खिमापावसाठी अनेक ठिकाणं आहेत. ती ठिकाणं तुम्हाला माहीत असतीलच.