किस्से आणि बरंच काही- दबंग देखणी

>> धनंजय साठे

‘आई कुठे काय करते’, ‘लग्नाची बेडी’, ‘ताराराणी’ इत्यादी मराठी मालिका. ‘तेरा हूं मैं’, ‘कुंडली भाग्य’, ‘मेरे साई’, ‘क्राईम पेट्रोल’ वगैरे हिंदी मालिकांमध्ये काम करणारी, बुलेटवरून जग फिरणारी, विमान चालवण्याची जिद्द ठेवणारी ही दबंग देखणी अभिनेत्री सुषमा जयवंत मुरुडकर.

मागच्या वर्षीची गोष्ट. वर्षा ऋतूचं महाराष्ट्रात आगमन झालं होतं. मी इन्स्टाग्रामवर एका अभिनेत्रीचे व्हिडीओज पाहत होतो आणि वाटायचं की, एखाद्याचा इतका बोलका चेहरा कसा असू शकतो?  दैवी देणगीच असावी बहुधा! त्या वेळी ती अभिनेत्री ‘लग्नाची बेडी’  या मालिकेत ऋतुजा रत्नपारखी ही भूमिका साकारत होती. त्या मालिकेत काम करणारी इतर काही माझ्या ओळखीची मंडळी होती. त्यामुळे मी ठरवलं की, आपण या अभिनेत्रीची भेट घ्यायची. ते शक्यही होतं. कारण ‘लग्नाची बेडी’ मालिकेची निर्मिती संस्था ओळखीची होती. कारण मी स्वतः क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून केलेली शेवटची मालिका ‘दिया और बाती हम’ याच संस्थेची होती. ही निर्मिती संस्था होती शशी सुमीत प्राडक्शन्सची.

तर तो भेटीचा दिवस उजाडला. ती अभिनेत्री त्या दिवशी शूटिंगसाठी आली असल्याची खात्री करून घेतली आणि आमची स्वारी मीरा रोडच्या शूटिंग स्टुडिओच्या दिशेने निघाली. तासाभरातच मी त्या स्टुडिओत पोहोचलो. तेव्हा समजलं की, जिला भेटायला मी आलो होतो ती आराम करत होती. थोडय़ाच वेळात ती आली आणि माझी अक्षरश ‘फॅन बॉय मोमेन्ट’सारखी अवस्था झाली. तिला भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं. मी तिला मनापासून धन्यवाद दिले. तिच्या अभिनय क्षमतेचं, तिच्या प्रचंड ऊर्जेचं कौतुक केलं. कुठल्याही कलाकाराला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते तेव्हा ती केलेल्या कामांची एक प्रकारे पोचपावतीच असते. अतिशय खुशीत मी सुषमा जयवंत नावाच्या हरहुन्नरी कलाकाराचा निरोप घेतला आणि एका अविस्मरणीय भेटीचा आनंद सोबत घेऊन परतलो.

सुषमा जयवंत मुरुडकर वयाच्या 15 व्या वर्षी पक्की विरारकर झाली. म्हणजे बॉलीवूडमध्ये विरार का छोकरा गोविंदा आहे, तर आपल्याकडे विरार की छोकरी सुषमा जयवंत आहे. उत्कर्ष मंदिर मालाड पूर्व इथून शालेय शिक्षण घेतलं, तर साठय़े कालेज आणि सोफिया पॉलिटेक्निकमधून पुढचं शिक्षण घेतलं. सुषमा ही कमर्शियल आर्टिस्ट असून कमर्शियल आर्टसोबत पेटिंग, नेल आर्ट, पाट पेंटिंग अशा अनेक क्रिएटिव्ह गोष्टीत  रमायची. तिने अॅनिमेशन आणि एडिटिंगचे (संकलन) शिक्षणही घेतले आहे. अतिशय गोड स्वभावाची असूनसुद्धा आपल्या स्पष्टवत्तेपणामुळे काही लोकांना दुखावल्याची जाणीवही तिला आहे, पण म्हणतात ना स्वभावाला औषध नाही.

बुलेट बाईक चालवायची तिला प्रचंड आवड आहे आणि त्यात ती निष्णातही आहे. लडाखपर्यंत तरी बुलेटवर जायचं तिचं स्वप्न आहे. मग कार चालवणं तिच्यासाठी हातचा खेळणा असणार! तिच्याच शब्दात कार ड्रायव्हिंगमध्ये ती कोणताही गड सर करू शकते. आता पुढची झेप आहे आकाशाच्या दिशेने. सुषमाला विमान चालवायचं आहे. मला अजिबात शंका नाही की तोही दिवस लवकरच येईल. तिला स्वयंपाकाची भरपूर आवड आहे. लोकांना छान छान शाकाहारी व मांसाहारी दोन्ही पदार्थ खाऊ घालण्याची आवड आहे. बनवतेही उत्तम! तसंच तिला स्वतला खायलाही खूप आवडतं.

सुषमाचा जीव तिची भाची अर्नामध्ये गुंतलेला असतो. वेळ मिळाला की, ती तिच्या भाचीला भेटायला ठाणे गाठते. अर्नाचा जन्म झाला तेव्हापासून मावशी झालेली सुषमा आणि लहानग्या भाचीमध्ये नातं निर्माण झालं जे कालांतराने अधिक दृढ होत गेलं. तिच्या करीअरमध्ये साथ देणाऱया तिच्या आई-वडिलांचा ती आवर्जून उल्लेख करते. आपल्या आयुष्यात आईचा पाठिंबा किती महत्त्वाचा असतो हे शब्दात मांडणं महाकठीण आहे, पण ती नेहमीच सुषमाच्या पाठीशी उभी होती. सुषमा म्हणते की, मातृत्वाची भावना अनुभवण्यासाठी एखाद्या बाळाचा जन्म आपल्या गर्भातून झालाच पाहिजे हे काही गरजेचं नसतं. तसं न होता ते अतूट असू शकतं. तिच्या भाचीवर तिचं खूप प्रेम आहे.

मालिकांमधून आई ही व्यक्तिरेखा साखरेसारखी गोड तरी दाखवतात, नाहीतर कारल्यासारखी कडू. सुवर्णमध्य कधीच नसतो.  तिला कधीतरी एखादी विकृत आईची भूमिकासुद्धा पडद्यावर साकारायची आहे.तशी  तिची प्रेक्षकांमधली प्रतिमा ही खलनायिकेची आहे. एकूण काय तर अतिशय उत्साही, दबंग, सुंदर आणि प्रामाणिक कलाकार हिंदी व मराठी सृष्टीला लाभलेली आहे. अशा गुणी अभिनेत्रीला तिच्या कारकीर्दीत भरभरून यश, नावलौकिक आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळो हीच नटराजाच्या चरणी प्रार्थना.

[email protected]

(लेखक िक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)