जाऊ शब्दांच्या गावा – नमन 

>> साधना गोरे,  [email protected]

ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात. भाषा आणि शब्दांचेही काहीसे तसेच आहे. कारण भाषेतला कोणताही शब्द हा त्याच्या विशेष अर्थासाठी तयार झालेला असतो आणि तरीही तो शब्द आणि त्याचा अर्थ स्वतंत्र नसतो. विशिष्ट शब्दाशी निगडित अनेक अर्थछटा सांगणाऱ्या शब्दांचा एक गोतावळाच असतो. शब्दांचे असे एकेक गणगोत जाणून घेताना आपण कित्येकदा अज्ञाताच्या प्रदेशात जाऊन पोहोचतो. तेथे अर्थातच मानवी संस्कृती, भाषा यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. शब्दांचे मूळ आणि गणगोत सांगण्याचा प्रयत्न या सदरात केला आहे.

आजचा माणूस हजारो वर्षांपूर्वी कुठल्या तरी एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाला. तरी आज जगभरात हजारो भाषा बोलल्या जातात. सर्व मानवजात एकच आहे, तर मग सगळे एकच भाषा का बोलत नाहीत? याविषयी एक गमतीशीर कथा सांगितली जाते. सर्व माणसांनी मिळून जिवंतपणे स्वर्गात जायचं ठरवलं. पण जायचं कसं? सगळ्यांनी मिळून लांबच्या लांब शिडी तयार करायचा बेत केला. सगळे मिळून कामाला लागले. करता करता शिडी चांगलीच लांबायला लागली. माणसांमधली ही एकी बघून स्वर्गातले सगळे देव धास्तावले. माणूस स्वर्गात आला तर आपले देवत्व ते काय राहिले म्हणून देव काळजीत पडले. आता काय करायचे म्हणून सगळे नारदाकडे गेले. नारदाने त्यावर नेहमीप्रमाणे नामी युक्ती सुचवली. माणसांना वेगवेगळ्या भाषा बोलायला लावायचे ठरले. एकाची दुसऱ्याला भाषा कळली नाही की विचारही कळणार नाहीत. तसेच झाले. प्रत्येक जण आपापले वेगळे बोलू लागला. शिडीचं काम खोळंबलं ते खोळंबलंच. पृथ्वीवर भाषा तेवढ्या कित्येक बोलल्या जाऊ लागल्या.

हे एवढं नमनाला घडाभर तेल कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ‘नमन’ या शब्दाचं मूळ शोधण्यासाठीच. नमन म्हणजे नमस्कार. एकमेकांना भेटल्यावर दोन्ही हाताचे तळवे जोडून किंचित झुकून अभिवादन करण्याची खास भारतीय परंपरा आहे. यालाच ‘नमस्ते’ असंही म्हटलं जातं. नमस्कार, नमस्ते हे दोन्ही शब्द उर्दू भाषेत आहेतच, शिवाय उत्तर भारतातील हिंदी, काश्मिरी, पंजाबी, सिंधी तसेच गुजराती, बंगाली, उडिया, असामी या भाषांमध्येही आहेत. गंमत म्हणजे दक्षिणेकडील तेलुगू, कानडी, मल्याळी, तामीळ या द्राविडी भाषांमध्येही हे दोन शब्द आहेत. साहजिकच नमस्कार किंवा नमस्ते या शब्दांचं मूळ संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमधील ‘नमः’ या मूळ धातूपासून हे शब्द तयार झाले आहेत. ‘नमः’ या शब्दाला वाकणे, झुकणे, कलणे, लवणे, शरण जाणे अशा विविध अर्थछटा आहेत.

ओघाने नम्र, विनम्र, प्रणाम हे शब्दही नमः या शब्दापासून तयार झाले आहेत हे सहज लक्षात येते. यामध्ये विनयाबरोबरीनेच वाकून सन्मान दाखवण्याचा भाव प्रतीत होतो. पण इस्लाम धर्मातील अल्लाहच्या प्रार्थनेला उद्देशून असणाऱ्या ‘नमाज’ शब्दाचं नातंसुद्धा संस्कृतमधील नमः या धातूशी आहे म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटतं. याची संगती लावताना आपल्याला इतिहासाबरोबर भाषा विज्ञानात डोकावावं लागलं. ‘नमाज’ किंवा ‘नमाझ्’ हा फारसी शब्द आहे. आज फारसी ही इराणची राष्ट्रभाषा आहे. मात्र प्राचीन इराणची भाषा अवेस्ता होती आणि ती आपल्या संस्कृतची भाषाभगिनी होती. म्हणजे शब्द आणि व्याकरणाच्या दृष्टीने अवेस्ता आणि संस्कृतमध्ये खूप साम्ये आहेत.

नमस्कार आणि नमाज या दोन्ही शब्दांमधील अर्थाचं साम्य कळण्यासाठी त्यांतील क्रियेचं साम्य समजून घेणं आवश्यक आहे. मराठीत ‘साष्टांग नमस्कार’ किंवा ‘साष्टांग दंडवत’ असा शब्दप्रयोग केला जातो. छाती, शिर, डोळे, मन, वाचा, पाय, हात आणि गुडघे ही शरीराची आठही अंगे भूमीला समांतरपणे टेकवून नमस्कार करणे म्हणजे साष्टांग नमस्कार. या स्थितीत शरीर जमिनीवर पडलेल्या काठीप्रमाणे म्हणजेच दंडाप्रमाणे दिसते म्हणून याला साष्टांग दंडवत असेही म्हणतात. हे सगळे पाहून विविध भाषांतील साम्याबद्दल, त्यातल्या आदानप्रदानाबद्दल आपण नव्याने विचार करायला लागतो. हीच तर शाश्वत अशी मानवी संस्कृती आहे.

आपल्या लोकगीतांमध्ये विविध देवतांना नमन करून आरंभ करण्याची परंपरा आहे. त्या परंपरेला अनुसरून शब्दांच्या या सदरात पहिलं नमन आपल्या समृद्ध भाषा संस्कृतीला करू या!