
>> डॉ. नीलम ताटके
महाराष्ट्रातील अनेक रूढी, परंपरांपैकी एक वासुदेव. काही परंपरा आजही काही ठिकाणी आहेत. पूर्वीच्या कथा-कादंबरीतून ‘वासुदेव’विषयी हमखास वाचायला मिळते. अनेक ठिकाणी वासुदेवाच्या अभंगांनी गाव जागे व्हायचे, पण गावातील लोक शहराकडे आले तसे वासुदेवही शहरी भागात स्थलांतरित झाले. शहरी संस्कृतीत वाडा, चाळ इथे त्यांचा वावर हमखास असायचा, परंतु नंतर वाडय़ांचे फ्लॅट झाले आणि शहरातूनही वासुदेव दुर्मिळ झाले.
वासुदेवाचा पोषाख लक्ष वेधून घेणारा असातो. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायात पॅन्ट किंवा धोतर आणि कमरेभोवती उपरणे किंवा शेला गुंडाळलेला असायचा. एका हातात चिपळ्या आणि दुसऱया हातात पावा, मंजिरी अशी पारंपरिक वाद्ये असायची. काखेला झोळी अडकवलेला. गळ्यात माळाही विशिष्ट प्रकारच्या म्हणजे बहुतेक कवडय़ाच्याही असायच्या. हातात हमखास तांब्याचे कडे असायचे. कपाळावर, गळ्यावर आणि दंडावर अष्टगंधाचे टिळे लावलेले असायचे. वासुदेवाची परंपरा महाराष्ट्रात खूप जुनी म्हणजे सुमारे हजार, बाराशे वर्षांपूर्वीपासून आहे. आपल्याकडील प्रथा, परंपरेला काही विशिष्ट अर्थ आणि सामाजिक संदर्भ आहे.
वासुदेव आपल्या अभंगातून समाज प्रबोधनाचे काम करत असे. यात व्यक्तीचे वर्तन कसे असावे, नातेसंबंध, व्यसनाधीनता, चारित्र्य, व्यवहार याविषयी प्रबोधन करायचा. आदर्श वर्तन, आदर्श माणूस याविषयी सांगायचा. ही एक प्रकारे समाजसेवा होती. वासुदेवाला या सेवेचा मोबदला धान्य, पैसे, फळे अशा रूपात मिळायचा. समाज ही आपली जबाबदारी आहे असे मानून या सेवांचा सन्मान करीत होता.
एखाद्या दिवशी जर द्यायला काही नसेल तर वासुदेवाला तसे सांगितले जायचे व रोख पैसे देत. गृहिणी स्वतः भिक्षा देत असे. वासुदेवाविषयी आणखी रोचक माहिती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते वासुदेवांकडून मावळ्यांना निरोप पाठवायचे. तसेच त्यांचा उपयोग हेरगिरीसाठी केला जायचा. शत्रूच्या गोटातल्या बातम्या मिळवल्या जायच्या.