सूर-ताल- सूर तेच छेडिता…

>> गणेश आचवल

मराठी वाद्यवृंद किंवा एखादी सांगीतिक मैफल ऐकताना कीबोर्ड वादनाचे महत्त्व खूप असते. अशा अनेक कार्यक्रमांतून कीबोर्ड वादक म्हणून परिचयाचे झालेले एक नाव म्हणजे आरती गोसावी सागडे.

बालपणापासून संगीत क्षेत्रात सहजपणे आपली कला सादर करणाऱया आरती गोसावी यांचा प्रवास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. संगीत कलेचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला. त्यांचे आजोबा सदानंद गोसावी हे संगीत विशारद होते. त्यांचे वडील सुनील गोसावी हे प्रसिद्ध कीबोर्ड वादक आहेत, तर काका अनिल गोसावी हेसुद्धा तबला, ढोलकी, ढोलक, रिदम वादक म्हणून परिचित आहेत. आरती जेव्हा साडेतीन वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे गाणे ऐकून प्रमिला दातार यांच्या ग्रुपमध्ये त्या बालगायिका म्हणून सहभागी झाल्या. प्रमिला दातार यांच्या कार्यक्रमासाठी आरती यांचे वडील वादक, तर आरती या गायिका म्हणून सहभागी होत असत. तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाचा परदेश दौरादेखील झाला होता.

आरती यांनी बालगायिका म्हणून 1983-84 मध्ये अनेक कार्यक्रम केले. आपल्या मुलीला एखादे वाद्यदेखील वाजवता यायला हवे, असे त्यांच्या वडिलांना वाटायचे. शामकांत परांजपे यांच्याकडून आरती हार्मोनियम शिकू लागल्या. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी कीबोर्ड खरेदी करावा असे आरती यांना वाटायचे. एकदा कोणाचा तरी कीबोर्ड घरी आणलेला असताना त्यांनी वडिलांना एक म्युझिक ट्रक बनवून दाखवला. त्यानंतर त्यांच्या घरी कीबोर्ड घेतला गेला. कलेबरोबर शिक्षणदेखील महत्त्वाचे आहे असा त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन होता. रुपारेल कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए पूर्ण केले.

दरम्यानच्या काळात हळूहळू आरती गोसावी हे नाव कीबोर्ड वादक म्हणून प्रसिद्ध होऊ लागले होते. संगीतकार विनय राजवाडे, आप्पा वढावकर, यशवंत देव, अशोक पत्की, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, पद्मजा फेणाणी जोगळेकर, अमितकुमार, रवींद्र जैन अशा अनेक मान्यवरांच्या सांगीतिक कार्यक्रमांत अनेकदा आरती या कीबोर्ड वादक म्हणून कार्यरत असतात. कलेच्या क्षेत्रात अनिश्चितता असते हे सत्य लक्षात घेऊन नोकरी करणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले. रेल्वेच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या रेल्वे विभागात अनेक वर्षे नोकरीदेखील करत आहेत. त्यांच्या या करीअर प्रवासात ‘सा- रे-गöम’च्या ऑडिशनसाठी, ‘म्युझिक मस्ती गप्पा गाणी’ या मुंबई दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी तसेच काही रिअॅलिटी शोसाठी त्यांनी कीबोर्ड वादन केले आहे. त्या संगीत विशारददेखील आहेत. ट्रिनिटी कालेज ऑफ लंडनच्या पियानोच्या परीक्षासुद्धा त्या डिस्टिंक्शनने उत्तीर्ण आहेत. आपल्या सासरी कलेला मिळणारे प्रोत्साहन हे त्यांचा उत्साह वाढवणारे ठरते. या क्षेत्रात करीअर करताना स्त्राrला तिच्या नवऱयाचे आणि सासरच्या मंडळींचे सहकार्य आणि प्रोत्साहन असणे हे खूप महत्त्वाचे असते, असे आरती आवर्जून सांगतात. लग्नानंतर त्यांचे पती गणेश सागडे यांनी आरती यांना अकॉर्डियन हे वाद्य शिकण्यासाठी खरेदी करून दिले. आपल्या पत्नीने फक्त वादक म्हणून कार्यरत न राहता संगीत संयोजक, संगीतकार आणि गायिका म्हणूनही कार्य करत रहावे असे प्रोत्साहन त्यांना आपल्या पतीकडून कायम मिळते. सुषमा श्रेष्ठ यांच्या हिंदी, मराठी कार्यक्रमांतून तसेच अमित कुमार आणि रवींद्र जैन यांच्या कार्यक्रमांतूनदेखील त्यांचा कीबोर्ड वादक म्हणून सातत्याने सहभाग असतो. अमोल बावडेकर यांच्या अल्बमसाठी संगीत संयोजक म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. रजनीकांत पाटील, टोनी पिंटो, झेव्हियर सर यांच्याकडून त्यांनी वेस्टर्न नोटेशनचे शिक्षण घेतले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकाच्या जवळजवळ शंभर प्रयोगांत लाईव्ह ऑर्गन वाजवणारी महिला म्हणून आरती यांच्या कलेची नोंद खूप महत्त्वाची आहे. आपले कुटुंब, आपली कला आणि नोकरी या सर्वांचा योग्य मेळ घालणाऱया वादक म्हणून आरती गोसावी सागडे यांनी स्वतचे स्थान निर्माण केले आहे.

[email protected]