दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशात पुन्हा योगीविरोधी हालचाली

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

पवित्र महाकुंभानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षात पुन्हा जोरात ‘गृहयुद्ध’ सुरू असल्याची चर्चा आहे. महाकुंभाचे श्रेय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत जोरकस भाषण ठोकले. मात्र या कुंभमेळ्यात किती लोक प्राणाला मुकले याचा उल्लेख मोदींनी केला नाही. तसेच उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव घेणेही मोदींनी टाळले. त्यामुळे ‘योगी की अब खैर नही’ अशा चर्चांनी जोर पकडला आहे. योगींना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून केंद्रात मंत्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हळूहळू ‘हिंदुत्वाचे पोस्टरबॉय’ बनत आहेत आणि हीच गुजरातच्या महाशक्तीपुढची खरी डोकेदुखी आहे. वास्तविक योगी व अमित शहा यांच्यात गृहयुद्ध होते आणि आहे. ते जगजाहीरही आहे. मात्र मोदींनी योगींना त्या अर्थाने कधी हेडऑन केले नाही. यावेळी ती स्थिती जाणवत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सप्टेंबर महिन्यात मोदी पंचाहत्तरी पूर्ण करतील. त्यानंतर आपण सक्रिय राजकारणातून दूर जाणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. (ती घोषणा ते खरंच पाळतात का? हाही प्रश्न आहेच.) समजा मोदी स्वखुषीने मार्गदर्शक मंडळात गेलेच तर देशाचा पंतप्रधान कोण होणार? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. योगी हे भगवेधारी व उत्तर प्रदेशमधील ठाकूर असल्याने त्यांच्या मागे एक लॉबीही आहे. त्यातच नागपूरकरांनी महाशक्तीला काबूत ठेवण्यासाठी योगींना तूर्तास रसद पुरवलेली आहे. त्या बळावरच योगींचेही प्रतिडाव सुरू आहेत. म्हणूनच योगींना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून केंद्रात मंत्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाले तर योगींचे राजकारण संपेल आणि आपल्याला हवे तसे घडेल, असे महाशक्तीचे मनसुबे आहेत.

योगींना खरे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनविण्याची महाशक्तीची अजिबात इच्छा नव्हती. मात्र, परिस्थितीच अशी बनली की, अगदी नाईलाजाने योगी आदित्यनाथ अनपेक्षितपणे तेथील मुख्यमंत्री बनले. त्यानंतर योगींना हटविण्याच्या अनेक संधी आल्या. मात्र या ना त्या कारणाने योगींची खुर्ची वाचली. योगी हे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूळ केडरचे नाहीत. किंबहुना गोरखपूरमध्ये त्यांनी हिंदु युवा वाहिनीच्या माध्यमातून काम करत असताना संघाच्या विरोधातच अनेकदा भूमिका घेतलेली आहे. मात्र सध्या संघासाठी योगी म्हणजे बुडत्याला काडीचा आधार ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचा दारुण पराभव झाला. त्यातल्या जिंकून येणाऱ्या जागा योगींनी मुद्दाम पाडल्या आणि मोदींच्या बहुमताचा आकडा हुकवला, असा आरोप भाजपच्या वर्तुळात ऐकायला मिळतो. त्याबद्दल वेगवेगळ्या थेअरीज दिल्या जातात. तेव्हापासून तर योगी दिल्लीकरांच्या डोळ्यात सलतच आहेत. मात्र दरवेळी परिस्थिती अशी निर्माण होते की योगी सहीसलामत सुटतात. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत योगींनी, ‘मै मौका मिला तो फिर गोरखपूर के मठ मे जाऊंगा, लेकिन दिल्ली नही जाऊंगा,’ असे थेट बेधडक विधान केले. त्यामुळे योगी जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. योगींनी कितीही नाही नाही, नको नको केले तरी महाशक्ती त्यांना बळजबरीने दिल्लीत आणि केंद्रीय मंत्रिमंडळात घुसवणार, अशी एक शक्यता आहे. राजनाथसिंह भाजपचे पुढचे अध्यक्ष झाले तर दिल्लीकरांचे सगळे फासे सुलटे पडणार आहेत. नागपुरातून अजून अध्यक्षपदाबाबत हिरवा कंदील मिळालेला नाही. मात्र योगींना निपटवण्याचा  दिल्लीकरांचा प्लॅन तयार आहे. या निपटानिपटीत पहिली विकेट कोणाची पडते ते यथावकाश कळेलच.

नितीशबाबूंची स्थिती

बिहारचे लोकप्रिय मुख्यमंत्री नितीशकुमार यांची स्थिती दिवसेंदिवस ‘आऊट ऑफ कंट्रोल’ होत चालली आहे. नितीशबाबू अल्जायमरच्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. आपण कुठे आहोत आणि काय करतो आहोत, याचे भान त्यांना राहिलेले नाही. त्यांच्या या शारीरिक स्थितीचा फायदा उठवत भाजपने त्यांचा पक्ष ताब्यात घेतला आहे आणि याही स्थितीत ते बिहारचा कारभार पाहत आहेत, हे त्याहून अधिक धोकादायक. नितीशकुमार ऊठसूट कोणाच्याही पाया पडतात, याबाबतचे किस्से जगजाहीर झाले आहेत. त्यांना काही आठवत नाही आणि समजत नाही, हा त्यांचा दोष नाही. मात्र राजकारणात आता थांबावे, हेही त्यांचे भान सुटले आहे. बिहार विधानसभेमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना नितीशकुमार कोणाला तरी अभिवादन करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यावर जोरदार टीका होत आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी नितीशबाबूंनी तातडीने राजीनामा देऊन आपल्या चिरंजीवाला मुख्यमंत्री करावे, असा सल्ला दिला आहे तर इतर विरोधी पक्षांनीही नितीशबाबूंवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र या सगळ्या गडबडीत भाजपची मंडळी आणि नितीशबाबूंचे दोन भाजपाई उपमुख्यमंत्री कुठे आहेत? असा सवाल विचारला जात आहे. बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर नितीशबाबूंनी आता योग्य निर्णय घ्यावा आणि आपल्याबद्दलचा उरलासुरला आदर शाबूत ठेवावा इतकेच!

मामाजी के बेटे की शादी

दिल्लीत सध्या ‘मामाजी के बेटे की शादी’ चर्चेत आहेत. हे मामा म्हणजे शिवराजसिंग चौहान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय कृषिमंत्री. शिवराज मामांच्या मुलाचे लग्न मध्य प्रदेशात वाजतगाजत झाले. त्याचा स्वागतसोहळाही भोपाळमध्ये भव्यदिव्य रंगला. त्या समारंभात मामांनी आपले पक्षांतर्गत राजकीय विरोधक असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे आणि कैलाश विजयवर्गीय या दोघांनाही नाचायला लावले. हे दोघे ‘मामांच्या तालावर’ कसे नाचले त्याचीही वेगळी चर्चा झाली. मात्र मामांच्या मुलाचा दिल्लीतला स्वागतसोहळाही चांगलाच गाजला. मामा व दिल्लीकरांमध्ये तसा छत्तीसचा आकडा. पण मामांच्या मुलाच्या दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधानांसह भाजपचे यच्चयावत पुढारी जमा झाले. तसेच काँग्रेसचीही मंडळी जमली. राहुल, प्रियंका ही गांधी घराणतील भावंडे त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही या समारंभात उपस्थित होते. या काँग्रेसजनांशी शिवराजमामा अत्यंत प्रेमाने गप्पा वगैरे मारत होते, हे चित्र दिसून आले. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून अशा राजकारणविरहित गाठीभेटी होत नाहीत. विविध पक्षांचे नेते अभावानेच भेटतात. त्या भेटींमध्ये ओलावा नसतो. त्यामुळेच शिवराज सिंग चौहान आणि त्यांच्या पत्नीने समारंभात लावलेल्या ठुमक्यांबरोबरच हे लग्न याही कारणासाठी गाजले. शिवराज सिंग चौहान यांनी दिल्लीत ज्या पद्धतीने रिसेप्शन दिले ते पुढच्या राष्ट्रीय सर्वसमावेशक राजकारणाचे संकेत मानायचे का?