>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाने काय साध्य केले? असा सवाल या अधिवेशनात जे काही घडले ते पाहून देशवासीयांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल. जनता ही सरकारला टॅक्स देते. त्यातून ही अधिवेशने सजतात, त्यासाठी तामझाम केला जातो. अधिवेशनाचा एका मिनिटाचा खर्च लाखो रुपयांत असतो. मग या महागडय़ा अधिवेशनाने जनतेच्या पदरात काही पडते काय? देशातील जनतेचा राजकीय सिस्टिमवरचा विश्वास उडण्याचे हे कारण आहे.
भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त संसदेत एक दिवसाची संयुक्त बैठक बोलावली गेली. राज्यघटनेची महती वर्णन करताना सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आपापली मते मांडली आणि अधिवेशनाच्या सांगतेला त्याच संसदेत अक्षरक्षः धक्काबुक्की, हाणामाऱ्या झाल्या. कोणी कोणाला मारले? कोणी कोणाला पाडले? याबरोबरच देशाच्या लोकशाहीचे वस्त्रहरण संसदेच्या प्रांगणात झाले. हे दुःखदायक आहे. हीच का ती देशाची लोकशाही? असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.
हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली ती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधातील विरोधकांनी आणलेल्या विश्वासदर्शक ठरावाने. त्यानंतर एकेक वादग्रस्त मुद्दय़ांनी या अधिवेशनाला घेरले. त्यात जनमताचे मुद्दे बाजूला पडले. सुरुवातीला ‘आमचा अदानी तर तुमचा सोरोस’ या सत्तापक्षांच्या नारेबाजीने दोन आठवडे कामकाज वाया गेले. नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमानजनक उद्गार काढल्याचा मुद्दा गाजला. हा मुद्दा अमितभाईंच्या एवढा अंगलट आला की, त्यापासून जनतेचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी अधिवेशन संपता संपता धक्काबुक्कीचा एपिसोड जाणीवपूर्वक रंगविण्यात आला. त्यामुळे अमित शहा यांची खुर्ची व अब्रू वाचेलही. मात्र देशाच्या लोकशाहीचे काय? गृहमंत्री अमित शहा यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचा मुद्दा चांगलाच शेकणार हे लक्षात आल्यावर संसद भवनाचा आखाडा बनविण्यात आला. संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलू दिले जात नव्हते इथपर्यंत ठीक. मात्र संसद भवनात प्रवेश करण्यापासून विरोधी खासदारांना रोखण्यापर्यंत ही दादागिरी गेली. अर्थात देशातील जनतेची स्मरणशक्ती अल्प असते. त्यामुळे अमित शहा आंबेडकरांबद्दल असे काही बोलले होते हे जनता दिल्लीच्या निवडणुकीपर्यंत विसरूनही जाईल. त्यानंतर सगळे काही सुशेगात सुरू होईल!
कुछ तो गडबड है!
गेल्या दहा वर्षांत ‘महाशक्ती बोले आणि दल हले’ असा अनुभव देशाने घेतला आहे. महाशक्तीचे हे महात्म्य वर्णन करायचे कारण म्हणजे या महाशक्तीच्या धाक, दराऱ्याला काही ग्रहण वगैरे लागले आहे काय? असा निर्माण झालेला प्रश्न. त्याचे झाले असे की, लोकसभेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक मांडले गेले. त्या वेळी मतविभाजन झाले. त्या स्थितीत भाजपचे तब्बल 20 खासदार अनुपस्थित असल्याची बाब लक्षात आल्यानंतर मायबाप सरकारचे डोळेच पांढरे झाले. हे विधेयक घटना दुरुस्ती असल्याने ते पारित होण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज आहे. मात्र तरीही 20 खासदार असे गायब झाले कुठे? यामुळे महाशक्तीचे धाबे दणाणले आहेत. गायब होणाऱ्यात ‘योगायोगा’ने महाशक्तीचे ‘नावडते’ नितीन गडकरी आहेत. त्यामुळे चर्चेला ‘वेगळे’च वळण लागले. ज्योतिरादित्य शिंदे व उदयनराजे भोसले हेही त्या 20 मध्ये आहेत. आता या दांडीबहाद्दर 20 खासदारांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला ते 20 जण यथावकाश जे द्यायचे ते उत्तर देतीलच. मात्र या 20 खासदारांनी दांडी मारण्याची हिंमत दाखवलीच कशी? याबद्दल खुमासदार चर्चा रंगली आहे. महाशक्तीची करडी नजर असल्यामुळे एरवी खासदारांना सभागृहात दिवसभर बसावे लागते. तरीही 20 जण गायब झाले कसे कुछ तो गडबड है!
शौर्यचित्र का बदलले?
काँगेस व इतर पक्षांची 70 वर्षांतली सरकारे किती कुचकामी होती हे दाखविण्यासाठी आता आपल्या लढवय्या लष्कराची परंपराही बदलण्याचे कुटील काम होते आहे. याच मुद्दय़ावरून संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी राडाही घातला. वास्तविक बांगलादेशमधील हिंदूंच्या मुद्दय़ावर विरोधक आक्रमक आहेत. आपल्या महाशक्तीला दीडदमडीचा बांगलादेश काबू येत नाहीये. बांगलादेशातील स्थिती चिघळली आहे. हिंदूंवर मोठे संकट आहे. अशा स्थितीत बांगलादेशला दम देण्याऐवजी इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे पाडून ज्या पाकिस्तानला गुडघ्यावर बसवले ते 1971 च्या बांगलादेश युद्धाचे शौर्यचित्र बदलण्याचे कलंकित काम सरकारने केले आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘एक घाव दोन तुकडे’ करत पाकिस्तानची दोन शकले उडवली होती. पाकडय़ांचे 96 हजार सैन्य हिंदुस्थानपुढे शरण आले होते. लेफ्टनेंट जनरल जगजीत सिंग अरोडा यांच्यापुढे पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल नियाजी यांनी पिस्तूल पुढे ठेवून पत्करलेली शरणागती आपल्या सैन्याच्या अद्भुत शौर्याचे प्रतीक आहे. मात्र सरकारच्या डोळय़ांत हे शौर्यचित्र खुपले. त्यामुळे लष्करप्रमुखांच्या कार्यालयातील लाऊंजमध्ये लावलेले हे पेंटिंग काढून त्याजागी नवे पेंटिंग लावण्यात आले आहे. ज्याचे नाव आहे ‘कर्म क्षेत्र फील्ड ऑफ डीडस.’ हे पेंटिंग मद्रास रेजिमेंटच्या कर्नल थॉमस यांनी बनविले आहे. भारतीय सैन्याला त्यात ‘गार्डियन ऑफ धर्म’ या रूपात दाखविले गेले आहे. मिथिकीय कल्पनांवर आधारित हे पेंटिंग आहे. त्यामुळे देशासाठी लढलेले शूरवीर जवान व लष्करी अधिकारी प्रचंड नाराज आहेत. भारतीय सैन्यात जोश व आत्मविश्वासाचे धुमारे भरणारे शौर्यचित्र बदलण्यात काय हशील आहे? असा सवाल ते करत आहेत. मात्र बांगलादेशला साधा दम भरू न शकणाऱ्या सरकारकडे त्याचे उत्तर नाही.