दिल्ली डायरी – रेखा गुप्ता दिल्लीच्या ‘भाग्यरेखा’ बनतील का?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

 ‘रेखा गुप्ता दिल्ली की भाग्यरेखा बनेगी,’ असा सूर रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्यानंतर भाजपमधून लावला जात आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनीयमुना शुद्धीकरणाचे काम जोरात सुरू केले आहे. त्याचेही स्वागत करायला हवे. मात्र जे गंगा शुद्धीकरणाचे झाले तेयमुनामातेचे होऊ नये. रेखा गुप्ता यांनी दिल्लीचे प्रदूषण यमुना शुद्धीकरण ही दोनच कामे जरी केली तरी त्या दिल्लीच्याभाग्यरेखाम्हटल्या जाऊ शकतील!

दिल्लीकर जनतेच्या अपेक्षा उंचावून भाजपने अखेरीस दिल्लीला ‘केजरीवालमुक्त’ केले. आता केंद्रात व राज्यात भाजप या एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे दिल्लीकरांना ‘अच्छे दिन’ यायलाच काही हरकत नाही. दिल्लीत प्रदूषण व वाहतूककोंडी ही मोठी समस्या आहे. दिल्लीकरांचा श्वास कोंडला गेलेला आहे. या वायू प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांतील शेतकऱ्यांनी पराली जाळणे हे प्रमुख कारण आहे. उत्तर प्रदेश व हरयाणात भाजपचेच सरकार असल्यामुळे आता तिथल्या सरकारांशी संवाद साधून रेखा गुप्ता दिल्लीकरांची वायू प्रदूषणातून सुटका करतील, अशी आशा करायला हरकत नाही. रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड थेट नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. भाजपच्या राजकीय यशात महिला मतदारांचा मोठा सहभाग आहे. 2028 पर्यंत देशातील 21 वेगवेगळ्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचदरम्यान महिला आरक्षण विधेयकाचीही अंमलबजावणी होईल. त्या वेळी अभाविपच्या केडरमधून आलेल्या रेखा गुप्ता भाजपच्या प्रचारात्मक रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील. अर्थात रेखा गुप्ता शीला दीक्षितांप्रमाणे यशस्वी व लोकप्रिय होतील काय, हे येणारा काळच ठरवेल.

‘कौन बनेगा दिल्ली का मुख्यमंत्री?’ हा सस्पेन्स इतर राज्यांप्रमाणे महाशक्तीने दिल्लीतही काही दिवस लोंबकळत ठेवला. सीएमचे नाव अगोदरच निश्चित करायचे आणि बाकी कोण कोण कोणासाठी काय काय पद्धतीने लॉबिंग करते त्याची मजा पाहायची, असा ‘नवा ट्रेंड’ आता महाशक्तीने आणला आहे. त्यात भाजप व संघाचे काही नेते अलगद सापडतात. नंतरच्या काळात त्यांना खड्यासारखे दूर केले जाते. प्रवेश वर्मांच्या बाबतीतही हेच घडले. अरविंद केजरीवालांना हरविल्यानंतर आपण जणू जगच जिंकले या आविर्भावात ते अमित शहांना भेटायला गेले. त्यांना अर्धा तास सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातल्यानंतर कसेबसे आत सोडले. दुसरीकडे त्यांच्या पत्नी, मुली व सोशल मीडियाच्या टीमने प्रवेश यांना सीएम बनवूनच टाकले. त्यामुळे दिल्लीकर अधिकच नाराज झाले. माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा व जाट असण्याबरोबरच केजरीवालांना हरविल्याने ‘हम ही सीएम बनेंगे’ अशा हवेत प्रवेश होते. मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर ही हवा ‘गुल’ झाली. दिल्लीत महिला मुख्यमंत्री बनवून देशात एक संदेश देण्याची भाजपची रणनीती होती. त्यात अनेक महिला नेत्यांच्या नावावर चर्चा झाली ती नेहमीप्रमाणे अदमास घेण्यासाठी. रेखा गुप्ता यांचे नाव अगोदरच ठरले होते. मात्र राजकारणात काही नाट्ये निर्माण होऊ द्यावी लागतात. ती संधी महाशक्तीने दिल्लीतील नेत्यांना दिली. प्रवेश वर्मा हे जयशंकर व हरदीप पुरी या केंद्रीय मंत्र्यांकडून सीएम होण्यासाठी प्रयत्न करीत होते. हेही एव्हाना उघड झाले आहे. त्यामुळे येत्या काळात दोघांचीही काही खैर नाही.

मुहूर्त कीशुभ घडी

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या. नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी मुद्रेत सभास्थळी आले. नायब राज्यपाल, प्रोटोकॉलचे अधिकारी शपथविधी सोहळ्याच्या तयारीला लागले. शपथविधीसाठी रेखा गुप्ता यांचे नाव घोषित करण्याची सूचना राज्यपालांनी केली. मात्र त्याच वेळी पंतप्रधानांनी मनगटावरील घड्याळात पाहून ‘पाच मिनिट रूकते है’ अशी सूचना केली. त्यानंतर या पाच मिनिटांच्या काळात नरेंद्र मोदी व्यासपीठावरील सगळ्यांना भेटले. चंद्राबाबूंना इग्नोर करत पवन कल्याण यांच्याशी ते खूपच ‘आत्मीय’तेने मोदी बोलताना पाहून चंद्राबाबूंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. पाच मिनिटांचा ‘अंतराल’ झाल्यानंतर पुन्हा रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोदीसाहेबांनी घड्याळात पाहून पाच मिनिटांचा ‘गॅप’ का दिला? याबाबत शपथविधी समारंभात खुमासदार चर्चा रंगली. रेखा गुप्ता ज्या वेळी शपथ घेणार होत्या तो काळ ‘शुभ’ नव्हता. म्हणून ती वेळ टाळून मोदींनी त्यांना ज्योतिषशास्त्रानुसार शुभ काळात शपथ घेण्याची सूचना केल्याची चर्चा त्यानंतर रंगली. नरेंद्र मोदी राजकारणात पटाईत आहेतच. मात्र ज्योतिषशास्त्रातही त्यांना गती आहे काय? असा सवाल आता विचारला जात आहे. शुभ मुहूर्तावर दिल्लीत आलेल्या भाजप सरकारने सगळे शुभ शुभ करावे म्हणजे या मोदींनी शोधून काढलेल्या ‘शुभ मुहूर्ता’चे पांग फिटतील!

मोडक्या सीटवरूनउड्डाण

शिवराजसिंग चौहान हे देशाचे कृषिमंत्री आहेत. इतकेच नाही तर मध्य प्रदेशातील लोकप्रिय नेते आहेत हे बहुधा त्यांच्याच केंद्रीय सरकारच्या अखत्यारीत असलेल्या व त्यांच्याच पक्षाचे असलेले आणि सध्या महादजी शिंदे यांचे वारस म्हणून मिरवू पाहणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गावी बहुधा नसावे. अन्यथा फाटक्या व तुटलेल्या सीटवरून शिवराजमामांसारख्या लोकप्रिय नेत्याला हवाई प्रवास करावाच लागला नसता. त्याचे झाले असे की कृषिविषयक कार्यक्रमाला कुरुक्षेत्रला जाण्यासाठी शिवराजमामा एअर इंडियाच्या विमानात बसले. त्यांना ‘8 सी’ क्रमांकाची सीट देण्यात आली. मात्र ही सीट पाहून मामाही हादरून गेले. सीट अक्षरक्षः तुटलेली व फाटलेली होती. त्यावर बसणार तरी कसे? यावर मामा संतापले नाहीत. मात्र संयमी स्वरात त्यांनी ‘इतनी खराब सीट थी तो आबंटित क्यो किया?’ असा सवाल केला. त्यावर विमान कर्मचाऱ्यांनी ‘हमने प्रबंधन को जानकारी दी थी और भी सीटे खराब है’ अशी माहितीत भर घातली. शिवराज चौहान यांनी फाटक्या सीटवरूनच भोपाळ ते चंदिगड असा प्रवास केला. या प्रवासानंतर त्यांनी त्रस्त झाल्याने एक ‘एक्स पोस्ट’ लिहिली. त्यानंतर एअर इंडियाने केवळ  दिलगिरी व्यक्त केली व चौकशीचे आदेश दिले. ना दिल्लीतील महाशक्तीने त्यासाठी कोणाची कानउघाडणी केली, ना नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी कोणाचे कान पकडले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मामांचे नाव चर्चेत असताना त्यांना फाटकी सीट मिळावी हा निव्वळ योगायोग नाही. आता शिवराजमामांच्या फाटक्या सीटवर नागपुरातून काही ‘रफू’ वगैरे होते का ते बघायचे!