सायबर ट्रेंड – घिबलीच्या कॅनव्हासवर डेटा चोरी

>> डॉ. धनंजय देशपांडे

फेसबुकवर सध्या घिबलीची हवा असल्याने फेसबुकचा कॅनव्हास नेटकऱ्यांच्या व्यंगचित्रांनी व्यापून गेला आहे. त्यामुळे सर्वजण सध्या भांबावल्या अवस्थेत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल एआयच्या रूपाने मानवी जीवनात पडत आहे. घिबली ही त्याचीच नवी आवृत्ती आहे. हे नक्की काय प्रकरण आहे? त्याबद्दलचे आक्षेप काय? धोके काय? यामध्ये सरकारची भूमिका काय? एक नागरिक म्हणून सर्वसामान्य जनतेने काय केले पाहिजे? अशा प्रत्येकाच्या मनातील प्रश्नांचा घेतलेला वेध.

आधुनिक तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल एआयच्या रूपाने मानवी जीवनात पडत आहे. घिबली ही त्याचीच नवी आवृत्ती. सध्या फेसबुकवर घिबली स्टुडिओ, घिबली आर्ट हे शब्द आपल्या कानावर पडत आहेत आणि फेसबुकए इन्स्टाग्रामचा कॅनव्हास नेटकऱ्यांच्या व्यंगचित्रांनी व्यापून गेला आहे. हे घिबली आर्ट ज्याची अचानक आपल्याकडे चर्चा सुरू झाली आहे. जपानमध्ये या तंत्रज्ञानाचा शोध लागून तीस-चाळीस वर्षे होऊन गेली. मात्र काही काही गोष्टी काही काळाने रिवाईव्ह होतात. त्यापैकीच हे एक उदाहरण. आपण एखादी गोष्ट माळ्यावर टाकतो आणि काही वर्षांनी पुन्हा वापरायला काढतो त्याप्रमाणे. त्यामुळे जुने असले तरी नव्या रूपात हे आले आहे. आधी जे होते त्याला इतका शार्पनेस नव्हता. आता यामध्ये ज्या प्रतिमा तयार होत आहेत, त्या अगदी व्यंगचित्रकाराने काढल्यासारख्या मिळत आहेत. पूर्वी एआयच्या त्या प्रतिमा इतक्या सुस्पष्ट नव्हत्या. आता याला एआयची जोड देण्यात आली आहे. यापूर्वीही फोटो एडिटर, फोटो मॅनिया यांसारखे अॅप होते. त्यामध्ये फोटो टाकला की, वेगवेगळ्या स्वरूपात बदल करून देत होते, पण त्याला कार्टूनचे एआय जोडले गेले. त्यासाठी देशातील व्यंगचित्रकारांच्या शैलीची कॉपी केली गेली आणि ते एआयला पुरवून हे अॅप रिडेव्हलप केले गेले आहे. मुळामध्ये यातील चित्रांमध्ये जे फिनिशिंग आले आहे, ते कलावंताच्या शैलीची एआयला जोड दिल्यामुळे आले आहे. विविध चित्रकारांची शैली ढापल्यामुळे हे शक्य झाले आहे.

अद्याप ज्या व्यंगचित्रकारांच्या शैली यासाठी वापरली आहे त्यांनी याबाबत कोणताही आक्षेप घेतला नसला तरी  हे नैतिकदृष्टय़ा योग्य नाही. असंख्य चित्रकारांची असंख्य चित्रे समाज माध्यमांवर उपलब्ध असतात. प्रत्येक चित्रकाराची एक खास शैली असते आणि शैलीचे पेटंट कोणी घेत बसत नाहीत. याचाच फायदा यामध्ये घेतला गेला आहे. समाज माध्यमातून अशी असंख्य चित्रे घेऊन एआयच्या माध्यमातून एक शैली विकसित केली गेली. व्यंगचित्रकारांच्या पोटावर हा पाय आहे. इथे एक रुपयाही न देता फुकटात कार्टून काढून मिळत आहे. आपले कार्टून काढून घेण्यासाठी एखाद्या व्यंगचित्रकाराकडे गेलात तर तो किमान पाचशे रुपये घेईल. ती त्याच्या आयुष्याची कमाई आहे. म्हणून हे नैतिक नाही.

तंत्रज्ञानाच्या मदतीने जेव्हा आपण इतरांची कला कोणत्याही मोबदल्याशिवाय वापरतो तेव्हा ती त्या-त्या कलाकाराची फसवणूकच आहे असे मला वाटते. अशा गोष्टींबाबत कॉपीराइट कायदा आणणे गरजेचे आहे. मात्र त्याहीपलीकडे जात आपण या कलाकारांची फसवणूक करीत आहोत. म्हणूनच जोपर्यंत चुकीचे काही घडत नाही, तोपर्यंत कोणीही यावर नियंत्रण आणू शकत नाही. ज्याप्रमाणे चीनने ट्विटरवर थेट बंदी घातली, त्याप्रमाणे इथे सरकारने ठरवल्यास घिबलीवर बंदी घातली जाऊ शकते. मात्र या प्रकरणांत बचाव करण्यास घिबलीलाही संधी आहे.

अशा स्वरूपाचे माध्यम वापरताना त्यात आपण वैयक्तिक माहिती पुरवत असतो हा यातील सर्वात मोठा धोका आहे. घिबली आर्ट तयार करण्यासाठी लागणारे अॅप वेगवेगळी माहिती आणि परवानगी तुमच्याकडे मागते. ती स्वीकारणे अनिवार्य असते आणि ते अॅपच तुमचे काम करते. यात महत्त्वाचा धोका असा की ते तुमच्या फोटो गॅलरीचा अॅक्सेस मागते. अशा प्रकारे ते देणे निश्चितच धोकादायक आहे. या अॅपद्वारे आपण स्वतच फोटो घेण्याची परवानगी देतो. वास्तविक सोशल मीडियावर आपले फोटो कोणीही घेऊ शकत असले तरी याबाबत कायदे आहेतच. ज्यांची वॉल ओपन आहे, त्यांचे फोटो घेता येतील. मात्र तुम्ही विनापरवानगी कुणाचेही फोटो कोणत्याही चांगल्या कामासाठी का असेना डाऊनलोड करून घेऊ शकत नाही असा त्यासंबंधी सायबरचा एक नवीन कायदा आहे. जर असे विनापरवानगी फोटो डाऊनलोड करून घेतले आणि समोरच्याने याबाबत तक्रार दाखल केल्यास त्या व्यक्तीला दोन दिवसांच्या आत अजामीनपात्र वॉरंट निघते, अटक होते, पण इथे तुम्ही स्वतःहून आपले फोटो घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे याबाबत तुम्हाला तक्रार दाखल करता येणार नाही. मात्र यापुढे जाऊन वेगळीच समस्या उद्भवू शकते ती म्हणजे या दरम्यान फोटो गॅलरीचा अॅक्सेस दिल्याने ती लिक होण्याचा संभव असतो. आपल्या फोटो गॅलरीमध्ये अनेक खासगी फोटो असतात. ते चोरले गेले आणि त्याला
मॉर्फिंग केले गेले, त्या आधारे तुम्हाला ब्लॅकमेल केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोशल मीडियावरील अशा सर्व घटना व शक्यतांबाबत सायबर कायदे आहेत. त्यांचा आधार आपण घेऊ शकतो. पण आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, अपघात होत आहेत म्हणून सरकारने चांगले रस्ते बांधायचे नाहीत का? लोकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे, आपली आपण दक्षता घेतली पाहिजे. तुम्हाला स्वतःचे कार्टून कशाला बनवून पाहिजे? तुम्ही स्वतःच आरशात पाहून हसलात तर स्वतःला कार्टून वाटाल. वेगळे कार्टून काढून घेण्याची गरज नाही. काय होईल हे निश्चित सांगता येत नाही, पण होण्याची शक्यता नाकारताही येत नाही. त्यामुळे या मोहात पडू नका, अशी जागृती करणे गरजेचे आहे.

तुमचा फोटो मॉर्फिंग झाला, ब्लॅकमेल केले गेले आणि तुम्ही घिबलीवर तक्रार दाखल केली तरी तुम्ही काहीच सिद्ध करू शकणार नाही, कारण याबाबतचे अधिकार तुम्हीच अॅपला दिलेले असतात. तेव्हा घिबली वा अन्य कोणतेही अॅप स्वीकारताना त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा अंदाज जरूर घ्या.

शब्दांकनः गजानन चेणगे

(लेखक सायबर तज्ञ महाराष्ट्र राज्य सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे विभागप्रमुख आहेत.)