
>> दिलीप ठाकूर, [email protected]
आपल्या देशात चित्रपट संस्कृती शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत खोलवर रुजली आहे. यामुळेच चित्रपट महोत्सवांबाबत कायम उत्सुकता असते. चित्रपटसृष्टी व चित्रपट रसिक या दोघांच्याही आवडीची चित्रपट महोत्सव ही बहुस्तरीय गोष्ट. म्हणूनच चांगल्या चित्रपटांचे महत्त्व अधोरेखित होण्यासाठी असे महोत्सव नक्कीच उपयुक्त ठरतात. मुंबईत 21 ते 24 एप्रिल या कालावधीत राज्याचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध विषयांवरील चित्रपट पाहण्याची पर्वणी रसिकांना लाभेल.
चित्रपट महोत्सव म्हणजे बरेच काही असते. त्यात काही जुने क्लासिक चित्रपट तर काही वेगळ्या प्रवाहातील चित्रपट पाहायची संधी आणि त्याच वेळेस या माध्यम व व्यवसायातील अनेकजण एकमेकांना भेटणे, आपसात संवाद होणे, माहितीची देवाणघेवाण होणे असे बरेच काही घडत असते. मुंबईत 21 ते 24 एप्रिल असा राज्याचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. यात एकूण 41 चित्रपट पाहता येतील. डिजिटल युगात मराठी चित्रपटांची फक्त संख्या वाढली असे नव्हे तर वेगळ्या व नवीन विषयाची जाण असलेले, वेगळा दृष्टिकोन असलेले पटकथाकार व दिग्दर्शक चित्रपट व्यवसायात आले असल्याचाही प्रत्यय अशा महोत्सवात येतो.
राज्य चित्रपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात येत आहे. पहिला राज्य चित्रपट महोत्सव 1962 साली आयोजित करण्यात आला होता. विशेष उल्लेखनीय गोष्ट, प्रादेशिक भाषेतील चित्रपट पारितोषिक देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. त्यानंतर कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामीळनाडू या राज्यात प्रादेशिक भाषेतील चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येऊ लागले. पहिला मराठी चित्रपट महोत्सव मरीन लाईन्स येथील लिबर्टी चित्रपटगृहात साजरा झाला होता. अशा महोत्सवांची खूपच मोठी आणि सतत नवीन कल्पनांचा सहभाग असलेली परंपरा आहे. प्रत्येक वर्षी 30 एप्रिल या दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त हा महोत्सव धोबीतलाव येथील रंगभवन नाटय़गृहात आयोजित केला जाई. 1993 सालापासून त्यात नामांकन पद्धत आली.
मराठी रसिकांना चित्रपट पुरस्कारांचे विशेष आकर्षण असते. संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’( 2003) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सुवर्ण कमळ प्राप्त झाले आणि ऑस्करसाठीची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड होताच प्रसार माध्यम, चित्रपट रसिक व चित्रपटसृष्टी असे सगळीकडेच वातावरण बदलले. आज मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आलेत याचे श्रेय ‘श्वास’ला दिले जाते. मराठीत काही उत्तम आशयावरील चित्रपट असतात यावर प्रेक्षकांचा विश्वास आहे. अशा वेगळ्या चित्रपटांना महोत्सव ही उत्तम संधी असते. दिग्दर्शक राजदत्त यांच्या अर्धांगी, सर्जा, पुढचं पाऊल तसेच अन्य चित्रपटांनी मोठय़ा प्रमाणावर राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त केले आणि त्यामुळे त्या चित्रपटांना रसिकांचा प्रतिसाद वाढला.
राज्यातील अनेक शहरात लहानमोठय़ा स्वरुपात चित्रपट महोत्सवाचे आयोजन होताना रसिकांत उत्स्फूर्त वातावरण असते. मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीकडून अन्य प्रकारचेही चित्रपट महोत्सव सातत्याने होत असतात. देव आनंद जन्मशताब्दीच्या निमित्ताने झालेल्या महोत्सवात वहिदा रेहमान यांनी पुन्हा एकदा ‘गाईड’ अनुभवला. राज कपूर जन्मशताब्दीनिमित्त ‘संगम’ व ‘मेरा नाम जोकर’ हे मूळ दोन मध्यंतरचे चित्रपट दाखवले गेले. असे काही वेगळेपण चित्रपट महोत्सवाला नवीन उर्जा देतात. राज्य चित्रपट महोत्सवात चित्रपती व्ही.शांताराम व राज कपूर यांच्या नावाने दिले जात असलेले जीवन गौरव व विशेष कामगिरी पुरस्कार म्हणजे एका महत्त्वपूर्ण वाटचालीची दखल घेण्यासारखे असते.
चित्रपट महोत्सव ही बहुस्तरीय गोष्ट. ती चित्रपटसृष्टी व चित्रपट रसिक या दोघांच्याही हिताची. आपल्या देशात चित्रपट संस्कृती शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत खोलवर रुजली आहे. कोणत्याही भाषेतील सर्व चित्रपट दर्जेदार असूच शकत नाहीत. त्यात अधिकउणे असणारच पण जे चांगले आहेत त्यांचे महत्त्व अधोरेखित होण्यासाठी असे महोत्सव नक्कीच उपयुक्त ठरतात. मराठी चित्रपट महोत्सव पूर्वीच्या तुलनेत आज अतिशय थाटात साजरा होतात. त्यातील पुरस्कार विजेते अधिक आत्मविश्वासाने पुढील वाटचाल सुरु ठेवतात तर रसिकांतही नवचैतन्य निर्माण होते.
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)