सिनेविश्व – चौकटीबाहेरच्या जोड्यांची गंमत

>> दिलीप ठाकूर

पटकथेची मागणी म्हणून नेहमीची चौकट मोडत काही वेगळ्या गोष्टी सिनेमामध्ये दिसतात. आगामीगुलकंद चित्रपटात समीर चौगुले आणि सई ताम्हणकर अशी वेगळी जोडी दिसत आहे. कथेत अशी जोडी शोभली, मुरली की सगळेच समीकरण जमून येते आणि प्रेक्षकांचीही दाद मिळते. अशा वेगळ्या प्रयोगांची सध्या गरज आहे.

काही वेगळे समीकरण दिसले की, उत्सुकता वाढते… ‘का बरे ते जुळवून आणले असेल?’ इथून ते ‘आता पिक्चर आल्यावरच त्याचे उत्तर शोधू या’ इथपर्यंत. ते समीकरण म्हणजे हिरो व्यक्तिमत्त्व वा इमेज नसलेला आणि हिरॉईन ग्लॅमरस, लाडिक बोलणारी यांची जोडी पडद्यावर का जमवली? उत्तर सोपे आहे, पटकथेची मागणी. ‘गुलकंद’ चित्रपटाचे डिझाईन, टीझर, गाण्याचा मुखडा. एकेक गोष्ट समोर येताना सई ताम्हणकर व समीर चौगुले या जोडीबद्दल असाच भारी प्रश्न पडला. समीरची व आपली ओळख विनोदाचे मस्त टायमिंग साधणारा, दिसायला मध्यमवर्गीय नि मध्यमवयीन. सईची कारकीर्द सात-आठ वर्षांची. आता कुठे  ‘पाँडेचरी’ चित्रपटातले तिचे लक्षवेधक काम, ओटीटीवरील वेब सीरिजमधील तिच्या भिन्न व्यक्तिरेखा यामुळे तिला अभिनय येतो  असे म्हटले जाऊ लागले तरी तिची इमेज ग्लॅमरस नि बेधडक अशीच आहे. अशी वेगळी जोडी जमल्याने ‘गुलकंद’ने कुतूहल चाळवले.

असा विनोदी नायक व त्याच्या जोडीला देखणी, चुलबुली, खटय़ाळ नायिका हा मामला अजिबात नवीन नाही. कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या युगात हिंदीत याकूब व गोप हे विनोदी अभिनेते होते. त्यांनी त्यांची ओळख दिसण्यापासूनच जपली. 1945 सालच्या ‘जीनत’ या चित्रपटात याकूबला नूरजहांसोबत संधी मिळाली. गोप ‘दुनिया एक तमाशा’  या चित्रपटात त्या काळातील उर्मिला नावाच्या अभिनेत्रीसोबत चमकला. भगवानदादा मुख्य प्रवाहातील चित्रपटात आले तेव्हा ‘अलबेला’मध्ये गीता बालीचे नायक झाले आणि पिक्चर सुपरहिट. म्हणून ‘झमेला’मध्येही तीच जोडी दिसली. ठेकेबाज गीत, संगीत व नृत्याची मेजवानी असलेला ‘अलबेला’ मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील इंपिरियल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला हे त्या काळात केवढे तरी कौतुकाचे ठरले.   मराठीत दामुअण्णा मालवणकर हे ‘ब्रॅण्डीची बाटली’ या चित्रपटात मीनाक्षी शिरोडकरचे नायक होते. त्याचीही केवढी चर्चा होती. राजा गोसावी हे मराठीतील एक आघाडीचे नायक. अनेक सामाजिक, कौटुंबिक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या. ‘उतावळा नवरा’मध्ये जयश्री गडकर, ‘काका मला वाचवा’मध्ये उमा यांचे, तर ‘असला नवरा नको गं बाई’ या चित्रपटात रंजनाचे नायक म्हणून पडद्यावर ते झळकले तेव्हा त्या जमलेल्या जोडय़ाही वेगळ्याच ठरल्या. जयश्री टी यांनी ‘ह्योच नवरा पाहिजे’ या चित्रपटासाठी दादा कोंडके यांना होकार दिला तेव्हा तो सुखद धक्काच होता. दादा कोंडके मोकळेढाकळे, हाफ पॅन्टमधले ग्रामीण नायक, भन्नाट बोलणारे अशी जोडी हे आश्चर्यच होते. ‘पांडू’ चित्रपटातील भाऊ कदम व सोनाली कुलकर्णी या जोडीनेही ‘भुर्रम भुर्रम’, ‘केळेवाली मी’ गाण्यात छान रंग भरला.

नायक विनोदी म्हणा वा लौकिक अर्थाने, ज्याला  हिरो म्हणतो असा नाही तरी तो ग्लॅमरस अभिनेत्रीसोबत पडद्यावर दिसला, शोभला, खुलला अशी ही काही उदाहरणे. एकदा का, शीर्षक सुरू झाले आणि त्या कथेत अशी जोडी शोभली, मुरली की सगळेच समीकरण जमून येते. चौकट मोडली तरच काही वेगळ्या गोष्टी पिक्चरमध्ये दिसतील. त्याचीच आज गरज आहे.

[email protected]

(लेखक सिनेपत्रकार समीक्षक आहेत)