
>> प्रा. अनिल कवठेकर
चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे. पण मनोरंजन करताना त्यातून जर शिक्षण देता आलं तर त्यासारखा राजमार्ग नाही. ‘शर्माजी की बेटी’ हा चित्रपट म्हणजे आई आणि कुमारवयीन मुलींमधील संघर्ष, भावनिक दुरावा, प्रेम, करिअर, मुलीबाबत आईची भूमिका, मुलींच्या वागण्यातील बदल, तिच्या शरीरामध्ये होणारे बदल याबाबत आईने आपल्या मुलीशी कशा गप्पा मारायला हव्यात आणि त्या गप्पा तशा होत नसल्यामुळे काय होतं, हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सांगणारा ‘शर्माजी की बेटी’ हा चित्रपट आहे.
महाभारतामध्ये ‘मै समय हूं’ हा आवाज पुरुषाचा होता तर ‘शर्माजी का बेटी’ मध्ये स्त्रीचा आवाज आहे आणि तिचं म्हणणं आहे की, आता काळ बदलला असून आमच्या ताब्यात आला आहे. एकमेकांशी काही संबंध नसलेली तीन शर्मा आडनावाची कुटुंबे आणि या सर्वांमधून एक सुंदर कथानक तयार होत नाही तर प्रत्येकाची स्वतंत्र कथा फुलत जाते. स्वाती शर्मा जिला मोठं होण्याची घाई झाली आहे. स्वातीला आपले पिरियड्स का येत नाहीत याची चिंता आहे. आपल्या वर्गातल्या इतर मुलींच्या शारीरिक वाढीमुळे त्यांना असणारे मित्र आणि आपण त्यांच्यात लहान राहिलो हे सामान्य वाटणारं स्वातीचं दुःख आहे.
एक दिवस शाळेत ऑडिशनच्या लाइनमध्ये उभी असताना स्वातीला एकजण प्रेमपत्र देतो. ते तिच्या गुरवीन नावाच्या मैत्रिणीकरता असतं. आपल्याला कोणीतरी प्रेमपत्र लिहावं असं तिला वाटत नसून प्रेमपत्र येणं म्हणजे आपल्या अस्तित्वाची कुणीतरी दखल घेणं आणि ती दखल तिची कोणीच घेत नाही हे तिचं दुःख आहे. त्या ऑडिशनमध्ये रामू अंकल नावाच्या म्हाताऱ्याची भूमिका असते. त्याचे संवाद बऱ्याच जणांना जमत नाहीत. स्वातीला ते जमतं आणि तिला रामू अंकलची भूमिका मिळते. तिला वाटतं की, तिच्या पुरुषी शरीरयष्टीमुळे तिला ती भूमिका मिळालेली आहे.
या चित्रपटात सगळ्या स्री पात्रांची एक स्वतंत्र समस्या आहे. त्यामुळे या चित्रपटाचं नाव समस्या ठेवलं असतं तरी चाललं असतं. किरणची समस्या आहे बोलण्याची. तिला बोलायला आवडतं आणि त्या सोसायटीमध्ये तिच्याशी बोलायला कोणीच नसतं. एखादी व्यक्ती कोणाशी तरी बोलण्यासाठी किती झपाटलेली असू शकते याचं उदाहरण आहे किरण शर्मा. तिला वाटतं, भाजीवाल्याने तिच्याशी बोलावं पण तो बोलत नाही. हा यातला वेगळेपणा. तिची शेजारीण तिला म्हणते की, तुला गप्पा मारायला वगैरे आवडतं हे घरात राहणाऱ्या बायकांची सवय आहे. नोकरी करणाऱ्या बायकांची नाही. मुंबईत तिला रस्ता क्रॉस करता येत नसतो; पण तिला हळूहळू आपला आनंद कसा मिळवायचा हे कळलेलं आहे.
किरणला बोलायला कोणी सापडत नाही म्हणून ती वारंवार आपल्या आईला फोन करते आणि तिची आई व्हिडिओ गेममध्ये मश्गूल असते. तिला मुलीचं फोन करणं आवडत नसतं. ती किरणला बिझी राहण्याचा सल्ला देते. यावरून समस्या कोणाची आहे हे आपल्या लक्षात येतं. कसं जगायचं याचा शोध लागला नाही तर जगणं हीच समस्या होऊन बसते.
तिसरी ज्योती, तिला काही आठवत नाही म्हणून तिने प्रत्येक गोष्टीसाठी रिमाइंडर लावलेला आहे. आज आपण नवऱ्याची गप्पा मारायच्या याचा सुद्धा रिमाइंडर ती लावते. हासुद्धा एक वेडेपणा आहे.
रामू अंकलच्या भूमिकेबद्दल स्वातीला बेस्ट आक्टर आवॉर्ड मिळतं. तिला लवकर एक सुंदर मुलगी व्हायचं आहे. शरीराने पूर्णपणे तयार झालेली पण ती मुलांसारखी दिसते आणि तिला भूमिकाही मुलाचीच मिळते. तिच्या ओठावर लावलेली मिशी नकली असली तरी तिच्या मनाने तिच्यावर लादलेला पुरुषीपणा ती अनुभवत आहे. स्वाती तिच्या आईची चांगलीच हजेरी घेते आणि सांगते की, तू आई होण्याच्या योग्यतेची नाहीस. तुला तुझ्या क्लासमध्ये शिकवणं फक्त येतं. तुझं माझ्याकडे लक्ष नाही. बऱ्याचदा आपल्या कामात आपण इतके गुंतून जातो की आपल्या मुलाकडे, मुलीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आणि आपल्याला असं वाटतं की, आपण हे सगळं त्यांच्यासाठी करतोय. पण स्वाती स्पष्ट सांगते की, वडिलांच्या पगारातसुद्धा माझं शिक्षण होऊ शकतं. तू केवळ तुझ्यासाठी नोकरी करतेस. हे मुलांना समजेपर्यंत जर पालक बदलले तर मुलांच्या किशोरवयीन समस्या वाढणार नाहीत आणि स्वाती याबाबतीत खूपच अग्रेसिव्ह आहे. कारण तिच्या मते मासिक पाळी येणं ही एक फार मोठी आवश्यक बाब आहे आणि तिच्या वर्गात न आलेली ती एकमेव शिल्लक राहिल्याचं शल्य तिला आहे. या शल्याबरोबर तिला मिळालेली रामू अंकलची भूमिका हेदेखील तिचं कन्फ्युजन आहे.
किरणने आपली मुलगी गुरवीन हिच्या वाढदिवसाची एवढी तयारी केल्याचं पाहून स्वातीच्या आईला आश्चर्य वाटतं. किरणच्या नवऱ्याला आपली बायको सामान्य वाटत असते. किरणला वाटतं की, प्रत्येक जण का धावतोय. त्यांना नेमकं कुठे पोहोचायचं. चित्रपट किरणभोवती जास्त फिरतो. त्यानंतर स्वातीभोवती. आनव्हर्सरीच्या दिवशी सरप्राईज देण्यासाठी किरण नवऱ्याच्या ऑफिसमध्ये जाते. तिथे तिला कळतं की तिच्या नवऱ्याचं अफेअर आहे. खूप आनंदात जगणारी किरण उद्विग्न होते. किरणला तिचं दुःख आईला सांगायचंय, पण आई स्वतःचा व्हिडिओ बनवण्याच्या नादात आहे. लेकीचं ऐकण्याची तिची मानसिक तयारीच नाही. तिला वेळ द्यायला, तिला समजवायला कुणाकडेच वेळ नाही.
स्वातीला तिची आई हॉटेलमध्ये घेऊन जाते आणि मसाला डोसा मागवते. जो स्वातीला आवडत नाही. तेव्हा आई म्हणते, लहानपणी तुला आवडत होता. स्वाती म्हणते, लहानपणी आवडत होता, आता मी मोठी झालेय. पण हे तुझ्या लक्षातच आलेलं नाही. स्वाती प्रत्येक वेळेस बोलते ते अनेक मुलींच्या मनातलं बोलते असं वाटतं… तन्वी शर्माला क्रिकेटचं वेड आहे. तिच्या प्रियकराला सिनेमाचं वेड! त्याला हीरो व्हायचंय. पण तन्वीची कहाणी हवा तो इम्पॅक्ट साधत नाही. या चित्रपटातली खरी कहाणी केवळ किरण आणि स्वाती या दोघींचीच आहे. बाकीच्या आलेल्या कहाण्या या अगदी उपऱ्या वाटतात. गुरवीनला ती समलैंगिक आहे असं वाटतं.तेव्हा तिला तिची आई समजावून सांगते की, प्रेम खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात. महत्त्वाचं म्हणजे प्रेम असायला हवं. तू मला जे सांगितलंस ते मला आधीच माहीत होतं. मी ठरवलं होतं की, ज्या दिवशी तू मला सांगशील त्या दिवशी मी तुला गिफ्ट देईन आणि आई तिला हेयर जेल देते. कारण गुरवीनला मुलांसारखे केस ठेवायला आवडत असतात. खूप खेळ, शिक्षण घे, करिअर कर आणि आयुष्य घडव असं आई सांगते. घरात समलैंगिक व्यक्ती असणं ही खूप मोठी समस्या आहे. देशात आई-वडीलच अशा मुलींना-मुलांना स्वीकारायला तयार नसतात. पण या चित्रपटातून आई-वडिलांनी ते कसं स्वीकारायला हवं ते चांगलं सांगितलेलं आहे.
किरण स्वतःचा मार्ग निवडते आणि पटियालावरून आलेली किरण मुंबईकर होते. स्वाती तरुण होते. गुरवीनला आपण कोण आहोत हे सापडतं… या सर्व कहाण्या दिग्दर्शिका तहिरा कश्यप खुराणाला एकत्र गुंफता आलेल्या नाहीत.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)