साय-फाय- ChatGPT आणि कायदा

>> प्रसाद ताम्हनकर

सध्या हिंदुस्थानातील एका खटल्याने जगाचे लक्ष वेधून घेतलेले आहे. ChatGPT सारखा जगविख्यात चॅटबॉट बनवणाऱया ओपन एआय या कंपनीविरुद्ध गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात एशियन न्यूज इंटरनॅशनल (ANI) या हिंदुस्थानातील एका प्रख्यात वृत्तसस्थेने दाखल केलेला हा खटला आहे. एशियन न्यूज इंटरनॅशनलने केलेल्या दाव्यानुसार ChatGPT ने त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या कॉपिराइट कंटेंटचा वापर केला आहे. ओपन एआयने मात्र हा आरोप पूर्णपणे फेटाळला असून, आपला ChatGPT फक्त सार्वजनिकरीत्या जी माहिती उपलब्ध असते तिचा वापर करत असतो असे सांगितले. ओपन एआयच्या दाव्यानुसार माहितीचा असा वापर करणे हे बेकायदेशीर नाही.

एशियन न्यूज इंटरनॅशनलने ओपन एआयकडे 2 कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. आता या खटल्याला अजून एक वेगळे वळण लागले असून, द हिंदू, एनडीटीव्ही, इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे असा प्रसिद्ध वृत्तसंस्थांनी या खटल्यात सहभागी होण्याची परवानगी मागितली आहे. सध्या जगभरात ‘ओपन एआय’विरुद्ध अशा प्रकारचे दहा खटले सुरू आहेत. प्रकाशक, लेखक, वृत्तसंस्था, प्रकाशन माध्यमे अशा अनेकांनी त्यांचा कॉपिराइट असलेला कंटेंट त्यांच्या परवानगीशिवाय वापरल्याबद्दल ओपन एआयला कोर्टात खेचले आहे.

हिंदुस्थान ही ChatGPT साठी प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. ChatGPT चा सर्वात जास्ती वापर करणाऱया देशांमध्ये हिंदुस्थानचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. अशा वेळी हिंदुस्थानात आपला विस्तार करू पाहत असलेल्या ओपन एआयसाठी देखील हा खटला महत्त्वाचा ठरणार आहे. तर संपूर्ण हिंदुस्थानात अंदाजे 450 वृत्तवाहिन्या आणि 17 हजार वर्तमानपत्रे आहेत. त्यांच्यासाठी देखील कोर्टाचा निकाल महत्त्वाचा आहे. सध्या ChatGPT कोणत्या प्रकारची माहिती वापरू शकतो किंवा वापरू शकत नाही यासंदर्भात नियम अथवा ठोस असा कायदा नाही. या खटल्याच्या निकालाने, इतर चालू असलेल्या खटल्यांवर देखील परिणाम होणार आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर ChatGPT सारख्या चॅटबॉट्सना प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कंटेंटचा, डाटाचा उपयोग ओपन एआयसारख्या प्रशिक्षण संस्था करू शकतात या संदर्भात नियम बनवण्यास मोठी मदत मिळणार आहे. न्यायालय या संदर्भात काही ठोस कायदे अथवा नियमदेखील आखून देऊ शकते. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेने 2023 मध्ये ओपन एआयच्या जोडीने तिची समर्थक कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टकडे देखील अशा माहितीच्या बेकायदेशीर वापराबद्दल अब्जावधी डॉलर्सची नुकसान भरपाई मागितली होती. माहितीचा हा गैरवापर त्यानंतर मोठय़ा प्रमाणात चर्चेत आला.

न्यायालयाच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. न्यायालयाचा निकाल जर एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या बाजूने लागला, तर एआय कंपन्या विरुद्धच्या खटल्यांमध्ये मोठी वाढ होऊ शकते आणि या कंपन्या अडचणीत येऊ शकतात. त्यांना यापुढे आपल्या चॅटबॉट्सना प्रशिक्षण देण्यासाठी लागणारा कॉपीराइट कंटेट वापरण्यापूर्वी तशी परवानगी घेण्याची गरज भासणार आहेत. सध्या ओपन एआयसारख्या काही कंपन्यांनी अशा प्रकारच्या परवानग्या घेण्यास सुरुवातदेखील केली आहे. मात्र जर निकाल ओपन एआयच्या बाजूने लागला, तर कोणत्याही प्रकारची कॉपीराईट असलेली माहिती वापरण्याचे स्वातंत्र्य एआय कंपन्यांना मिळणार आहे.

एशियन न्यूज इंटरनॅशनल आपल्या ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना बातम्या पुरवते. या बातम्या, विविध मजकूर, फोटो यांचा त्यांच्याकडे मोठा साठा असून, त्यावर त्यांचा मालकी हक्क आहे. मात्र त्यांची परवानगी न घेता ओपन एआयने या माहितीचा वापर आपल्या चाटबॉट्ला प्रशिक्षण देण्यासाठी केला आहे आणि त्यामुळे चॅटबॉट्च्या कार्याची क्षमता वाढली आणि ओपन एआय कंपनीला त्याचा थेट फायदा मिळालेला आहे, असा एएनआयचा आरोप आहे. खटला दाखल करण्यापूर्वी आपण ओपन एआय कंपनीला त्यांच्या बेकायदेशीर माहितीच्या वापराबद्दल कल्पना दिली होती आणि माहितीचा वापर करण्यासाठी परवानगी घेण्याचा सल्लादेखील दिला होता, असा दावादेखील केला आहे.

या सर्व प्रकरणात ओपन एआयने वेगळाच पवित्रा घेतला असून, हिंदुस्थानात दाखल झालेल्या खटल्याला विरोध केला आहे. ओपन एआय ही कंपनी आणि तिचा सर्व्हर दोन्ही हिंदुस्थानात नाही आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चॅटबॉटलादेखील हिंदुस्थानात प्रशिक्षण देण्यात आलेले नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.