लेख – तुर्कस्तानमधील सत्तासंघर्ष

>> सनत्कुमार कोल्हटकर, [email protected]

तुर्कीयेमधील सत्तासंघर्ष इतक्या टोकाला पोहोचला आहे की, इस्तंबूलचे नवनिर्वाचीत महापौर एक्रम इमा मोगलू यांच्या शैक्षणिक पात्रतेवरच शंका उपस्थित करण्यात आली असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी बंदी घालण्याचा त्या देशाचे अध्यक्ष रेसीप एर्दोगेन यांचा इरादा दिसतो. एक्रम इमा मोगलू यांच्यावर भ्रष्टाचार, लाच देणे अशा आरोपांची राळ उठविण्यात आलेली दिसते आहे. तुर्कीयेमधील न्यायालयालाही सक्रियपणे त्यांची भूमिका वठवावी लागणार आहे असे दिसते आहे.

तुर्कस्तान ज्याला सध्या ‘टर्की’ अथवा ‘तुर्कीये’ नावाने संबोधले जाते. तेथील इस्तंबूल शहराच्या महापौरपदी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ‘एक्रम इमा मोगलू’ हे बहुमताने निवडून आले. तुर्कस्तानचे सध्याचे अध्यक्ष ‘रेसीप एर्दोगेन’ यांच्या सत्ताधारी पक्षाचा उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाला. इस्तंबूल शहराच्या महापौरपदी येणारी व्यक्ती ही पुढे तुर्कस्तानच्या सत्तारूढपदी पोहोचते असा तुर्कस्तानचा आतापर्यंतचा इतिहास आहे. या निवडणुकीत जिंकलेले ‘एक्रम इमा मोगलू’ हे तुर्कस्तानचे निर्माते केमाल पाशा यांना मानणारे आणि लिबरल विचारसरणीचे मानले जातात.

रेसीप एर्दोगेन यांनी गेल्या काही वर्षांत इस्लामी कट्टरतावादाचा बुरखा पांघरलेला आहे. एकेकाळी हागीया सोफिया संग्रहालय हा खरे तर तुर्कस्तानचा सांस्कृतिक वारसा होता. ही वास्तू ख्रिश्चन आणि मुस्लिम या या दोन्ही धर्मांच्या समुदायासाठी गेली अनेक वर्षे सारख्याच प्रमाणात आकर्षणाचे केंद्र होती. 1500 वर्षांपूर्वी बायझंतीन राजवटीने बांधलेले हे चर्च होते. त्यानंतर सुमारे 1000 वर्षे ती चर्चचीच वास्तू होती. 1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपल पादाक्रांत झाल्यावर ऑटोमन साम्राज्याने त्या वास्तूचे मशिदीत रूपांतर केले होते. 1934 मध्ये केमाल पाशा यांनी या मशिदीचे एका संग्रहालयात रूपांतर केले होते.

साधारण 2 वर्षांपूर्वी म्हणजे 14 मे 2023 रोजी तुर्कस्तानमधील अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. रेसीप एर्दोगेन यांना पहिल्या फेरीत निवडणूक जिंकण्यात अडचण आली होती. मग कटाकटीच्या निवडणुकीत एर्दोगेन यांनी फार थोडय़ा मताधिक्याने बाजी मारून ती निवडणूक जिंकली होती. ती निवडणूक रेसीप एर्दोगेन यांना खूपच जड गेली होती हे खरे. त्यामुळे रेसीप एर्दोगेन यांनी तेथील विरोधी पक्षाची जेवढी म्हणून मुस्कटदाबी करता येईल त्यासाठीचे जोरदार प्रयत्न केले होते.

रेसीप एर्दोगेन यांच्या सीरियामधील सत्तापालटातील सक्रिय सहभागामुळे इराण आणि रशिया हे दुखावले गेलेले आहेत. अमेरिकेत नुकतेच अध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांना रेसीप एर्दोगेन यांच्याबद्दल अजिबात ममत्व नाही. युरोपियन महासंघाकडून सर्वात अविश्वासार्ह देश म्हणून तुर्कीयेकडे म्हणजेच रेसीप एर्दोगेन यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे तुर्कीमधील अंतर्गत असंतोष आणि बाहेरील अनेक देशांशी घेतले शत्रुत्व बघता रेसीप एर्दोगेन यांना तुर्कीयेबाहेर पळ काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

तुर्कीयेमधील सत्तासंघर्ष इतक्या टोकाला पोहोचला आहे की, इस्तंबूलचे नवनिर्वाचीत महापौर एक्रम इमा मोगलू यांच्या शैक्षणिक पात्रतेवरच शंका उपस्थित करण्यात आली असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी बंदी घालण्याचा त्या देशाचे अध्यक्ष रेसीप एर्दोगेन यांचा इरादा दिसतो. एक्रम इमा मोगलू यांच्यावर भ्रष्टाचार, लाच देणे अशा आरोपांची राळ उठविण्यात आलेली दिसते आहे. तुर्कीयेमधील न्यायालयालाही सक्रियपणे त्यांची भूमिका वठवावी लागणार आहे असे दिसते आहे.

तुर्कीयेमधील या सत्तासंघर्षात सर्वात मोठी भूमिका असेल ती तुर्कीयेच्या लष्कराची. जर लष्कराने एर्दोगेन यांच्या विरोधात म्हणजे इस्तंबूल शहराच्या महापौरपदी निवडून आलेल्या एक्रम इमा मोगलू यांना अटक करण्याच्या विरोधात भूमिका घेतली तर रेसीप एर्दोगेन यांना त्यांची तुर्कीयेमधील पुढील वाटचाल अवघड होऊ शकते. पुढील काळात तुर्कीयेमध्ये असंतोष धगधगत राहणार असे दिसते आहे. रेसीप एर्दोगेन जेवढे म्हणून तेथील विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करतील तेवढी त्यांची राजकीय वाटचाल त्यांना भविष्यात अवघड होत जाणार आहे.

इस्तंबूल या शहराचे महापौर ते पंतप्रधान ते तुर्कस्तानचे अध्यक्ष हा एर्दोगेन यांचा राजकीय प्रवास लक्षवेधी आहे, पण 2 वेळा अध्यक्षपदाची संधी मिळालेल्या एर्दोगेन यांच्या अगदी अलीकडील कारकीर्दीत ज्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे तेथील सामान्य जनता एर्दोगेन यांच्यावर नाराज आहे असे बोलले जाते. खाली उल्लेखलेल्या घटना या एर्दोगेन यांच्या कारकीर्दीत घडलेल्या आहेत.

1. एर्दोगेन यांच्या यापूर्वीच्या 5 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये तुर्कस्तानच्या चलनाचे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत प्रचंड अवमूल्यन झालेले आहे. त्यामुळे तुर्कस्तानच्या जनतेला अमेरिकन डॉलर मिळविण्यासाठी खूपच जास्त तुर्कस्तानच्या चलनाची म्हणजे ‘लिरा’ या चलनाची भरपाई करावी लागत आहे. जून 2017 मध्ये 1 अमेरिकन डॉलरच्या बदल्यात 3.5 तुर्किश लिरा मिळत असत. आता सध्याचा तुर्किश लिराचा डॉलरबरोबरील विनिमय दर हा ‘लिरा’ची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत किती घसरण झालेली आहे ते दर्शवितो. सध्या 1 अमेरिकन डॉलरच्या बदल्यात 37.78 तुर्किश लिरा मिळतात.

2. रशिया-युक्रेन युद्ध आणि तुर्किश लिराचे अवमूल्यन या सर्वांचा परिणाम म्हणून तुर्कस्तानमध्ये महागाई भडकलेली आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. यामुळेही तुर्कस्तानची सामान्य जनता नाराज आहे.

3. एर्दोगेन हे धार्मिक कट्टरतेचाही आधार घेत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी तुर्कस्तानचे प्रसिद्ध नेते मुस्तफा केमाल पाशा यांचा निधर्मी विचारांना तिलांजली देऊन एर्दोगेन हे ते स्वतः किती कट्टर आहेत हे जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. एकेकाळी हागीया सोफिया संग्रहालय हा खरे तर तुर्कस्तानचा सांस्कृतिक वारसा होता. ही वास्तू ख्रिश्चन आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या समुदायासाठी गेली अनेक वर्षे आकर्षणाचे केंद्र होती. 1500 वर्षांपूर्वी बायझंतीन राजवटीने बांधलेले हे चर्च होते. त्यानंतर सुमारे 1000 वर्षे ती चर्चचीच वास्तू होती. 1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपल पादाक्रांत झाल्यावर ऑटोमन साम्राज्याने त्या वास्तूचे मशिदीत रूपांतर केले होते. तुर्कस्तानचा जगप्रसिद्ध नेता मुस्तफा केमाल पाशा याने इस्तंबूलच्या मध्यभागी असणाऱया या महाकाय वास्तूचे 1934 मध्ये परत संग्रहालय बनविले होते. त्या वास्तूमध्ये कोणालाही प्रार्थना करण्यास मनाई करण्यात आली होती. मुस्तफा केमाल पाशा याला तुर्कस्तानचा प्रागतिक आणि सर्वधर्म समभाव राखणारा नेता म्हटले गेले, पण तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगेन यांनी ‘हागीया सोफिया’ या वास्तूचे परत एकदा मशिदीत रूपांतर केले. एर्दोगेन त्यांची स्वतःची कडवी प्रतिमा उभी करण्यासाठी असा निर्णय घेण्यास प्रवृत्त झाले असावेत. या निर्णयाबद्दल तुर्कस्तानमध्ये अल्पसंख्य ख्रिश्चन समाजही एर्दोगेन यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येते.

4. तुर्कस्तानमध्ये कुर्द वंशाचे लोकही मोठय़ा प्रमाणात राहतात. त्यांचा एर्दोगेन यांच्या राजवटीला प्रचंड विरोध आहे.

एर्दोगेन यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे जगाचे लक्ष असेल.