प्रासंगिक – गणपती बाप्पा मोरया…

>> वृषाली पंढरी

आज म्हणजे गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदा 11 दिवस हा आनंदोत्सव चालणार आहे. जगभरातच हिंदू शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनाने करीत असले तरी दहा/अकरा दिवसांचा हा उत्सव महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामीळनाडू आणि गोवा या राज्यांसह नेपाळमध्ये मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. वैदिक पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3.01 वाजता सुरू होत असून 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.37 वाजता संपेल. अशा परिस्थितीत शनिवार, 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी साजरी करणे योग्य आहे. या दिवशी पूजेची योग्य वेळ सकाळी 11ः00 ते दुपारी 1ः36 पर्यंत आहे. 7 सप्टेंबर रोजी गणेशपूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 03 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत आहे. गणेश मूर्तीची स्थापना केल्यानंतर पूजनासाठी 2 तास 31 मिनिटांचा वेळ अतिशय शुभ आहे. या विशेष दिवशी ब्रह्मयोगदेखील आहे, जो रात्री 11ः17 पर्यंत राहील.

सध्या सर्वत्र जो साजरा होतो त्याला गणेशोत्सव म्हणायचे काय? अशी टीका अनेक जण, विशेषतः उत्सवात भाग न घेणारे हिंदूच करतात. सार्वजनिक गणेशोत्सवात आता सर्वधर्मीय भाग घेत असल्याने केवळ हिंदूंचा धार्मिक उत्सव म्हणणे आजच्या काळाला धरून होणार नाही. तो आता आनंदोत्सव, लोकोत्सव आणि आर्थिक इव्हेंट झाला आहे. खरे तर बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवात कालानुरुप बदल झाले आहेत. तरीही प्रशासनाने, पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमात बसेल असा आवाज ठेवणे, देवदेतांची भक्तिगीतेच लावणे,रहदारीला कमीत कमी अडथळा होईल असा उत्सव साजरा करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. या उत्सवाला सार्वजनिक रूप छत्रपती शिवाजीराजांनी पुणे येथे दिले असे दाखले इतिहासात मिळतात. त्यामागील त्यांचा उद्देश स्वराज्य संस्कृती लोकांना कळावी व त्यांच्यात देशभक्ती जागवावी हा होता. नंतर सार्वजनिक गणेशपूजा पेशव्यांनी पुन्हा सुरू केली. ती प्रथा 1818 पर्यंत चालू राहिली, पण सार्वजनिक गणपती पूजा पेशव्यांच्या पतनानंतर 1818 ते 1892 या काळात बंद झाली व घरोघरी सुरू झाली. वैयक्तिक आणि घरगुती स्वरूपाचा हा धार्मिक उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन लढा देण्यासाठी 1893 मध्ये खऱया अर्थाने सार्वजनिक केला. त्यामुळे सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा लावण्याची प्रथा कटाक्षाने पाळतात.