जहाजाच्या ‘ताप’दायक प्रवासानंतरही ‘सुवर्ण’यश

>>  विठ्ठल देवकाते 

हिंदुस्थानचा हॉकी संघ 1928 साली पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. देश पारतंत्र्यात असल्याने त्यावेळी आतासारखे खेळाडूंचे लाड होत नसत. त्यामुळे हिंदुस्थानचा हॉकी संघ जहाजाने ऍम्स्टरडॅमला (हॉलंड) निघाला. कंटाळवाण्या प्रवासात हळूहळू वातावरण बदलत गेले. त्यामुळे हॉलंडमध्ये पोहोचल्यानंतर बहुतांश खेळाडू आजारी पडले. तरीही हिंदुस्थानी हॉकीपटूंनी फायनलमध्ये धडक मारली. जेतेपदासाठी हिंदुस्थानला यजमान हॉलंडविरुद्धच दोन हात करायचे होते. अंतिम युद्ध अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले असताना, फिरोज खान, शौकत अली आणि खेरसिंग हे खेळाडू आजारी पडले. त्यामुळे हिंदुस्थानचा बलाढय़ संघ दुबळा झाला होता. कर्णधार जयपाल सिंग यांनीही वैयक्तिक कारणामुळे लंडनला पलायन केल्याने उर्वरित हिंदुस्थानी हॉकीपटूंचेही अवसान गळाले होते. त्यातच मेजर ध्यानचंदही तापाने फणफणले. त्यामुळे किताबी लढतीत उतरण्यापूर्वीच हिंदुस्थानी हॉकीपटू मानसिकदृष्टय़ा पराभूत झाले होते. मात्र, जातीचे सैनिक असलेल्या मेजर ध्यानचंद यांनी अंगात ताप असतानाही खेळण्याचा दृढ निश्चय केला. हिंदुस्थानचे संघव्यवस्थापक रोसर यांनी कर्णधारपदाची धुरा पेन्निगर यांच्या खांद्यावर सोपवून सर्वांना एकदिलाने खेळण्याचा सल्ला दिला.

यजमान देश फायनलमध्ये असल्याने अर्थातच सामन्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी झाली होती. हॉलंड समर्थकांचा जल्लोष सुरू असताना, ध्यानचंदसह सर्व हॉकीपटूंनी मैदानावर पाऊल ठेवले. हिंदुस्थानचे महत्त्वाचे खेळाडू बाहेर बसलेले पाहून हॉलंडच्या हॉकीपटूंना आणखीनच चेव चढला होता. पंचांची शिट्टी वाजली अन् हॉलंडने हिंदुस्थानच्या गोलपोस्टवर हल्लाबोल केला. आपले महत्त्वाचे खेळाडू अंतिम लढत खेळत नसले, तरी हिंदुस्थानने आपली पारंपरिक लय बिघडू न देता तुफानी खेळ केला. हिंदुस्थानच्या या अनपेक्षित प्रतिहल्ल्याने यजमान संघ गांगरला. त्यांच्यातील समन्वय बिघडला. हिंदुस्थानने याचा पुरेपूर फायदा उठवीत हॉलंडला 3-0 अशा मोठय़ा गोलफरकाने पराभूत करीत हिंदुस्थानला प्रतिष्ठsच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. यात ध्यानचंद यांनी 2 गोल करीत स्पर्धेतील सर्वाधिक गोल करण्याचा बहुमानही पटकाविला. अशा पद्धतीने 26 मे 1928 रोजी हिंदुस्थान हॉकीमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन बनला. देश पारतंत्र्यात असताना हिंदुस्थानी हॉकीवीरांनी ‘सुवर्ण’यशाला गवसणी घातल्याने क्रीडाजगतात हिंदुस्थानी हॉकीचा दबदबा निर्माण झाला. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या हिंदुस्थानने संपूर्ण स्पर्धेत एकही गोल स्वीकारला नाही, हे विशेष. हिंदुस्थानी हॉकी संघाने ऑलिम्पिकचे ‘सुवर्ण’शिखर सर करताना ऑस्ट्रियाला 6-0, बेल्जियमला 9-0, डेन्मार्कला 5-0, स्वित्झर्लंडला 6-0, तर किताबी लढतीत हॉलंडला 3-0 असे पराभूत केले. त्यानंतर हिंदुस्थानने हॉकीत ऑलिम्पिकमधील सुवर्णकाळ अनुभवला. ऑलिम्पिकच्या इतिहासात हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत 8 सुवर्णपदके जिंकली आहेत. याचबरोबर एका रौप्यपदकासह तीन कांस्यपदकेही मिळविली आहेत. मागील टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून हिंदुस्थानी हॉकी संघाने तब्बल 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कांस्यपदक जिंकून हिंदुस्थानच्या या राष्ट्रीय खेळातील पदकांचा दुष्काळ संपविला. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्येही हिंदुस्थानच्या हाकी संघाकडून देशवासीयांना पदकांची अपेक्षा आहे.