विज्ञान – रंजन : रोरावणारे वारे

>> विनायक

‘पश्चिमेचा वारा’ अशी कविवर्य केशवसुतांची एक कविता आहे. महाराष्ट्राचा सागर किनारा पश्चिमेला असल्याने सुमारे सातशे किलोमीटरच्या कोकणपट्टीत ‘पश्चिमेचा वारा’ सतत वाहत असतो. एवढंच नव्हे तर संपूर्ण देशात सतत चार महिने धो धो पाऊस पाडून पावसाळा हा पूर्ण ऋतू निर्माण करणारा वाराही मेघगर्जनेसह दक्षिण-पश्चिम समुद्रातूनच पाण्याची ‘वाफ’ घेऊन ढगांच्या रूपाने येत असतो. त्यामुळे आपल्या देशाच्या द्वीपकल्पाला (पेनिन्स्युला) पश्चिमेच्या वाऱ्याची सतत साथ मिळते.

यावेळी पश्चिमेच्या ‘वाऱ्यां’चे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात काय रौद्र रूप दिसते याविषयी थोडक्यात. पृथ्वीवर सुमारे 75 टक्के पाणी आणि 25 टक्के भूपृष्ठ असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे ‘खोल खोल पाणी’ समुद्रात विविध विक्रम निर्माण करते. त्याला अर्थातच वादळी वाऱ्यांची वेळोवेळी साथ मिळते. त्यातही पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती फिरते. तिच्या या ‘स्पिन’चा परिणामही समुद्री जलनिधीवर होतच असतो. सूर्य-पृथ्वी-चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या सामायिक गणितातून पृथ्वीवर भरती-ओहोटीचे दृश्य सागरकिनारी राहणाऱ्या लोकांना नेहमीच पाहायला मिळते. उधाणाच्या भरतीच्या वेळी उफाळलेल्या सागरी लाटांचे वर्णन कवी विं. दा. करंदीकरांनी सिंहाच्या उग्र आयाळीप्रमाणे असे केलेय.

तरीसुद्धा समुद्राला रोखणारा फार मोठा भूपृष्ठाrय किनारा जिथे असतो तिथल्या लाटा तुलनेने सौम्य असतात. अर्थात सागर पृष्ठाखालच्या भूमीत भूकंप झाला आणि तिथल्या ‘प्लेट टॅक्टॉनिक’ डचमळल्या तर समुद्र ‘किनारा तुला पामराला’ या मर्यादेत न राहता थेट मैलोगणती आत आक्रमण करतो. आता तर वाढत्या जागतिक तापमानामुळे जगभरचे बर्फ वितळून समुद्र किनारपट्टीची कोणकोणती शहरे, गावे गिळंकृत करेल याचा येत्या शतकामधला धोकादायक हिशेब मांडायलाही सुरुवात झाली आहे.

पृथ्वीवर सर्वाधिक उष्णतेचा भाग म्हणजे, पृथ्वीच्या मधोमध असलेले विषुववृत्त. म्हणून विषुववृत्त आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या आठ ते दहा अक्षांशाच्या भागात वर्षभर सागरी पाण्याची वाफ होऊन रिमझिम पाऊस पडत असतो. त्यात आपल्या देशात केरळ राज्याला त्याचा सर्वाधिक अनुभव येतो. मात्र यामुळेच विषुववृत्तीय भागात पृथ्वीवरची विविध वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती मोठय़ा प्रमाणात निर्माण होतात. याच भागात पृथ्वीवरची सर्वात प्राचीन वनश्री आहे.

विषुववृत्तावर सूर्य ‘आग ओकत’ असल्याने त्याचे उत्तरायण-दक्षिणायन जमेस धरूनही तेथे वर्षभर कमी-जास्त प्रमाणात पण उन्हाळाच असतो. परिणामी तिथली हवा अतोनात तापते. साहजिकच ती दक्षिण गोलार्धाकडे ढकलली जाते. त्यातूनच पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील 40 ते 60 दक्षिण अक्षांशाच्या भागात पश्चिमेकडून पूर्वेकडे रोरावणारे वारे वर्षभर वाहतात. याची सुरुवात दक्षिण गोलार्धातील 30 ते 40 होते आणि नंतर पुढे 10 च्या टप्प्याने 50 आणि 60 दक्षिण अक्षांशांपर्यंत जाणवते.

एकेकाळी शिडाच्या होडय़ांचाच वापर समुद्र पर्यटनासाठी व्हायचा तेव्हा वाऱ्याची दिशा ही होडी किंवा अनेक उत्तुंग शिडांच्या मोठय़ा बोटी जलद चालवणारी ‘ऊर्जा’ असायची. वल्हवणाऱ्यांचे कष्ट थोडे कमी होत असे. त्यामुळे ‘पश्चिमेच्या वाऱ्या’वर स्वार होऊनच युरोपीय लोक ऑस्ट्रेलिया-न्यूझीलॅण्ड या देशात गेले. या नैसर्गिक आविष्काराचे वर्णन 40 अक्षांशापर्यंत ‘रोअरिंग फॉर्टिज’ पुढे ‘फ्युरिअर फिफ्टिज’ आणि ‘श्रिंपिंग सिक्टिज्’ असे केले जाते. एकूणच काय 30 ते 40 दक्षिण अक्षांशावरच्या समुद्रात पश्चिमेकडून येणारे वारे जोर धरायला लागतात. त्यांच्या घोंघावण्यावरून त्यांना रोअरिंग (डरकाळी पह्डणारे) म्हणतात. त्यानंतर 50 अंश दक्षिण अक्षांशापर्यंत ते अधिक उग्र झाल्याने त्यांना ‘फ्युरिअस’ (उग्र) फिफ्टिज् आणि 60 अंश दक्षिण अक्षांशापर्यंत तर कर्णकटु, कर्कश, शहारे आणणारा ध्वनी करत धुमाकूळ घालतात, म्हणून त्यांना ‘श्रिंपिंग’ (कर्कश) सिक्टिंज म्हणतात.

यामध्ये आणखी एक भौगोलिक वैशिष्टय़ असे की, पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात 30 ते 60 अंश अक्षांशापर्यंत वारा आणि समुद्राच्या पाण्याला रोखणारा प्रचंड भूपृष्ठाrय भागच नाही. जे आहेत ते थोडेसे. त्यामुळे दक्षिण अमेरिकेचा काही दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला भाग, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसारख्या जागा आणि इवल्याशा न्यूझीलंडचे दक्षिण बेट याचा अडथळा न जुमानता हे भयचकित करणारे वारे वाहतच असतात. मेलबर्नला तर भर दुपारीसुद्धा या वाऱ्यांमुळे डोपं जड होऊन थंडी वाजल्यासारखे वाटते असे तिकडे जाऊन आलेले सांगतात.

याचे वर्णन 1615 मध्ये डच (नेदरलॅण्ड)चे प्रवासी हेंड्रिक बॉवर यांनी केले. त्यांचा या मार्गावरचा बोटीचा प्रवास वाऱ्यामुळे वेगवान झाला आणि त्याला ‘बॉवर मार्ग’ असे नाव पडले. याच वाऱ्यांच्या सपाटय़ात सापडलेली न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन ‘विंडी विली’ म्हणून ओळखली जाते. दक्षिण गोलार्धातील या अक्षांशांवर उन्हाळी वाऱ्यांचा जोर असतो. उत्तर गोलार्धातील अशाच अक्षांशांवर ते हिवाळय़ात वाहत असले तरी मध्येमध्ये अनेक देशांच्या प्रचंड भूभागांमुळे ते रोखले जातात.