>> विनायक
‘छान किती दिसते फुलपाखरू, या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू.’ त्यातच पुढे म्हटलंय, ‘पंख चिमुकले निळे जांभळे, हलवुनि झुलते, फुलपाखरू’ ही शाळकरी जीवनातली ग. हा. पाटील यांची कविता आठवते? फुलपाखराचं असं नजरेसमोर चलत्fिचत्र निर्माण केलेलं वर्णन, त्या वेळी कवितेपुरतंच नव्हतं, तर मुंबईतल्या आमच्या घराच्या अंगणातल्या छोटय़ाशा बागेतल्या फुलझाडांभोवती रुंजी घालणारी विविधरंगी फुलपाखरं श्रावण संपला की लगेच दिसायला लागायची. आज शहरी भागातून हद्दपार झालेली फुलपाखरं खेडोपाडय़ात दिसतात किंवा महानगरवासीयांना ‘बटरफ्लाय गार्डन’पर्यंत जावं लागतं. आमचं बालपण मात्र अगदी सहजतेने, त्या कवितेच्या ओळींसोबत आणि खऱया फुलपाखरांच्या सहवासात गेलं.
या सगळय़ाची आठवण झाली ती विज्ञानातल्या एका भन्नाट संकल्पनेमुळे. त्या संकल्पनेचं नावच ‘बटरफ्लाय इफेक्ट’ म्हणजे फुलपाखराच्या ‘चिमुकल्या निळय़ा-जांभळय़ा’ नाजुक पंखांच्या मंद, हळुवार फडफडण्याने पुढे त्यांचं एखाद्या भयंकर चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं अशी ‘विचित्र’ वाटणारी मांडणी. घाबरू नका! ‘फुलपाखरू’ हे केवळ निमित्त. खरं तर संशोधक, संकल्पकाला आधी सीगल म्हणजे समुद्रपक्ष्यांच्या पंखांच्या फडफडाटाची उपमा सुचली होती. पण मग संशोधन थोडं ‘काव्यमय’ करण्याच्या नादात त्याने फुलपाखराची उपमा दिली म्हणे. अर्थात असं गृहीतक मांडणाऱया एडवर्ड लॉरेन्स यांना केशवसुत यांची मोहक कविता माहिती असल्याचं कारणच नाही.
तर उपमा, अलंकार वापरून या ‘इफेक्ट’ किंवा परिणामाचं वर्णन ‘बटरफ्लाय इफेक्ट’ असं केलेलं असलं तरी मूळ गाभा आहे तो ‘सूक्ष्म गोष्टीचाही प्रचंड परिणाम होऊ शकतो’ असा. या ‘स्मॉल कॉजेस, लार्ज इफेक्ट’ विचारामागे विश्वरचनेतील अणुरेणुंचा परस्पर संबंध आणि प्रत्येक गोष्ट एकदुसरीशी निगडित (एव्हरिथिंग इज इन्टरलिंक्ड) या संकल्पनेवर आधारित आहे.
1972 मध्ये लॉरेन्झ यांना अमेरिकेत टेक्सास येथे झालेल्या टॉर्नेडोवरून (चक्रीवादळ) सुचली, परंतु तेही अशा ‘छोटय़ा गोष्टीचा विराट परिणाम’ संकल्पनेचे जनक नव्हते. त्यापूर्वीही ही संकल्पना सन 1800 मध्ये जॉन फिच या फ्रेंच गणिती आणि भौतिकशास्त्र्ाज्ञाने मांडली होती. त्यानंतर हेन्री पॉइन्करे यांनी नॉर्बर्ट वेनरसह असंच मत मांडलं. हे सारं वातावरणातील बदलाच्या अनिश्चिततेबाबत होतं. आतासुद्धा हा लेख लिहिताना बाहेर वादळी हवा सुटलीय आणि ऑक्टोबरमध्येही पाऊस पडतोय. त्यामुळेही मनातल्या लेखाला चालना मिळाली असावी.
तर छोटय़ा गोष्टींचा मोठा परिणाम याचा केऑस (गोंधळवाद) सिद्धांतामधला एक भाग. आपलं विराट विश्व म्हणजे एक जिज्ञासा वाढवणारं कोडंच आहे. ते सोडवण्याचा विविधमार्गी प्रयत्न करण्यातही आनंद आणि बौद्धिक आव्हान आहे. संशोधक असं सर्वसामान्यांना ‘विचित्र’ वाटणारं प्रमेय स्वतःच मांडतात. त्याचं वैज्ञानिक पद्धतीने गणिती उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. एका संकल्पनेच्या चौकटीतल्या काही गोष्टी कालांतराने अयोग्यही ठरतात, पण खऱया वैज्ञानिक वृत्तीला या अपयशातही समाधान असतं ते एका विषयाच्या वैज्ञानिक चर्चेला गती दिल्याचं.
1800 मध्ये एका पुस्तिकेत म्हटलं की, धान्यसाठय़ातला एक कण जरी हलवला तरी त्याचा परिणाम संपूर्ण धान्यसाठय़ावर काही ना काही होतोच. नंतर बऱयाच वर्षांनी 1950 मध्ये, ऍलन टय़ुरिंग यांनी ‘एका इलेक्ट्रॉनच्या एक-अब्जांश मिलिमीटर एवढय़ा सूक्ष्म हालचालीचा परिणाम पुढे कधीतरी, कुठेतरी मोठं हिमस्खलन करण्यात होऊ शकतो असं म्हटलं. तसंच रे ब्रॅडबरी यांनी 1952 मध्ये ‘साऊन्ड ऑफ थंडर’ या कथेत, एका फुलपाखराच्या ‘चिमुकल्या’ पखं फडफडण्यातून कालांतराने मेघगर्जनेची निर्मिती संभवते, असं ‘फॅन्टॅसी’ वाटणारं मत व्यक्त केलं आणि एका माशीच्या पंखांची फडफड कुठेतरी वाऱयाची झुळुक घडवू शकते असंही म्हटलं.
हे जोपर्यंत ‘फॅन्टॅक्सी’ किंवा कविकल्पनेच्या किंवा रहस्यमय कथेच्या स्वरूपात होते तोपर्यंत ठीक, पण 1961 मध्ये एडवर्ड लॉरेन्स यानी या संकल्पनेचं गणिती प्रारूपच मांडलं. कॉम्प्युटरमध्ये हवामानाचा प्रोगॅम मांडताना त्यांनी 0.506127 याऐवजी 0.576 मिलीमीटर असं नोंदलं आणि कॉफी घेऊन तासाभराने परतेपर्यंत, कॉम्प्युटरने पुढच्या दोन महिन्यांचा हवामानाचा जो अंदाज वर्तवला होता तो पाहून ते चकित झाले. हा अंदाज पूर्वीच्या या भागातल्या भाकिताशी जुळत नव्हता. त्यांना वाटलं कॉम्प्युटरमध्ये बिघाड झालाय. पण तसं नव्हतं. पण मूळ आकडय़ातील सूक्ष्म बदलाने पुढचा अंदाज ‘एक्स्पोनेन्शियल’ (भौमितिक) पद्धतीने म्हणजे अनेक पटींनी बदलला होता. त्याविषयी वर्णन करताना त्यांनी एका सीगल पक्ष्याचं पंख फडफडवणं वादळ आणू शकेल असं (कदाचित गंमतीने) म्हटलं आणि पुढे ते काव्यात्म वाटावं म्हणून सीगलऐवजी फुलपाखरू आणलं. एवढय़ावरच हे थांबलं नाही. ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ या संस्थेत त्यावर चर्चाही झाली.
…ते काहीही असलं तरी फुलपाखरू न्याहाळण्याचा आपला आनंद अवर्णनीयच राहाणार. इवल्याशा फुलपाखरामुळे एवढा ‘उत्पात’ होत असेल तर ‘उत्पाती’ मनुष्यप्राण्यामुळे विश्वात काय काय घडत (बिघडत) असेल याचा विचार अधिक करायला हवा.