
>> विलास पंढरी
पृथ्वीला अनेक नावे असली तरी वसुंधरा हे संस्कृतप्रचुर नाव अधिक समर्पक आणि फारच गोड आहे. वसुंधरा म्हणजे जी सर्वकाही (वसु) धारण करते आणि समृद्ध करते ती. अशा या सर्वकाही असलेल्या पृथ्वीमातेला आपल्या पूर्वजांनी देवीचे स्थान दिले आहे.
अशा या पृथ्वीमातेला विकासाच्या नावाखाली वाट्टेल तसे ओरबाडण्याने पृथ्वीवरील सजिवांचे काय होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून वाचण्यासाठी आज साजरा होत असलेल्या जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना पुढे आली.
पहिला पृथ्वी दिन 22 एप्रिल 1970 रोजी साजरा करण्यात आला आणि तो विस्कॉन्सिन येथील सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी तरुण कार्यकर्ते डेनिस हेस यांच्यासह साजरा केला. 1969 मध्ये तिथे झालेली तेल गळती याला कारणीभूत ठरली. तेल गळतीच्या घटनेचे नुकसान पाहून त्यांना हा कार्यक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळाली आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी जागरुकता दिवसाची आवश्यकता त्यांना जाणवली. त्यानंतर 1990 मध्ये, 141 राष्ट्रांमधील 20 कोटी लोक जगभरातील पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र आले आणि 1992 मध्ये ब्राझील (रिओ दि जानेरो) येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेचा पाया रचला गेला. तेव्हापासून ‘वसुंधरा दिन’ जागतिक स्तरावर साजरा होऊ लागला.
2010 मध्ये अर्थ ऑर्गनायझेशनने जगभरातील लोकांसाठी पर्यावरणासाठी कृती करण्यासाठी वसुंधरा दिन हा एक महत्त्वाचा क्षण बनवला. 193 देशांतील लाखो लोक अर्थ ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखालील पर्यावरण चळवळीत सामील झाले. आता संस्थेने दरवर्षी 100 कोटींहून अधिक लोकांना पृथ्वी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले असून ज्यामुळे जागतिक पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने होणाऱया चळवळीत हा एक महत्त्वाचा कार्यक्रम बनला आहे.
संयुक्त राष्ट्रांकडून वसुंधरा दिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक समर्पक थीम जाहीर केली जाते. या वर्षी 2025 जागतिक पृथ्वी दिनाची थीम ‘आपली शक्ती, आपला ग्रह’ ही आहे. ही थीम लोक, संघटना आणि सरकार यांच्या अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वळण्यासाठी आणि शाश्वत भविष्य घडवण्याच्या सामान्य जबाबदारीवर लक्ष केंद्रित करते. 2030 पर्यंत जगभरात उत्पादित होणाऱया अक्षय ऊर्जेचे प्रमाण तिप्पट करण्याचे लक्ष्य आहे, ज्यामध्ये भूऔष्णिक, जलविद्युत, भरती-ओहोटी, पवन आणि सौर ऊर्जा यासारख्या स्वच्छ ऊर्जा स्रोतांवर विशेष भर दिला जाईल.
नैसर्गिक आपत्ती वाढलेले प्रमाण, मान्सूनचा वाढलेला बेभरवसा, वादळे, भूस्खलन, वाढत असलेले जागतिक तापमान आणि परिणामी वाढत असलेली समुद्रपातळी हे सर्व थांबण्यासाठी, तीव्रता कमी करण्यासाठी आणि पुढील पिढीला पृथ्वी चांगलं जीवन जगण्यालायक सुपूर्द करण्यासाठी केवळ वसुंधरा दिन साजरा करून चालणार नाही तर पर्यावरण रक्षणासाठी खालीलप्रमाणे उपाय कठोरपणे अंमलात आणावे लागतील.
पर्यावरण रक्षण आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. कार्बन उत्सर्जन कमी केल्याने, आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो आणि हवामान बदलाच्या नकारात्मक परिणामांना रोखू शकतो. यासाठी सरकारने उद्योग आणि सामान्य व्यक्ती यांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे.
सध्या सुरू असलेला प्लास्टिकचा अनिर्बंध वापर थांबवला नाही तर भयावह स्थिती निर्माण होणार आहे.
प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना ः 1) एकदा वापरता येणाऱया प्लास्टिकचा वापर कमी करणे. 2) पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या, बाटल्या आणि कंटेनर वापरणे. 3) प्लास्टिक कचऱयाची योग्य विल्हेवाट लावणे, शक्य असेल तेव्हा त्याचा पुनर्वापर करा. 4) प्लास्टिक पर्यायांना प्रोत्साहन देणाऱया उपक्रमांना पाठिंबा देणे. 5) प्लास्टिक प्रदूषणाच्या परिणामांबद्दल इतरांना शिक्षित करणे. 6) ई कचरा व्यवस्थापन धोरण कठोरपणे राबवणे
कार्बन उत्सर्जन मोठय़ा प्रमाणावर विकसित राष्ट्रांकडूनच होत असून काही राष्ट्रांनी ते 2050 पर्यंत शून्यावर आणण्याचे जाहीर केले असून तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. पण सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणारे दुर्दैवाने अमेरिका आणि चीन हे याबाबतीत जबाबदारीने वागायला तयार नाहीत.
विकसनशील असूनही भारताने नोव्हेंबर 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजच्या 26 व्या सत्रात,2070 पर्यंत निव्वळ कार्बन उत्सर्जन शून्य करण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. भारताचे 2070 पर्यंतचे निव्वळ शून्य उत्सर्जन धोरण एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे भारताला हवामान बदलाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यास मदत होईल. हे धोरण केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि पुढच्या पिढीला सुरक्षित भारत सोपविण्यासाठी महत्त्वाचे आहे.