निमित्त – लोकराजा राजर्षी शाहू महाराज

>> वर्षा चोपडे

प्रजासुखे सुखं राज्ञ प्रजानां च हिते हितम् ।
नात्मप्रियं हितं राज्ञ प्रजानां तु प्रियं हितम् ।

अर्थात लोकांच्या आनंदातच राजाचे सुख आहे. त्यांचे कल्याण हेच त्याचे कल्याण आहे. राज्य हे लोकांसाठी आहे. या श्लोकाचे पालन करणारा राजा, मानवाच्या जीवनात ज्ञान आणि बुद्धीचा दिवा प्रज्वलित करणारा महान राजा, जातिभेदाविरुद्ध लढा देणारा महान राजा, शिक्षणास उत्तेजन देऊन सर्वधर्म आणि समाजासाठी शैक्षणिक वसतिगृहे निर्माण करणारा रयतेचा लाडका राजा राजर्षी श्री शाहू महाराज. राजर्षी श्री शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याच्या कोल्हापूर खंडाचे राजे होते. शाहू महाराजांचा जन्म 26 जून इ.स. 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व ‘शाहू’ हे नाव ठेवले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सुविद्य पत्नीचे नाव महाराणी लक्ष्मीबाई होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्यात त्या सहभागी होत्या. राधाबाई ऊर्फ आक्कासाहेब महाराज, राजाराम महाराज तिसरे आणि प्रिन्स शिवाजी, आऊबाई अशी त्यांच्या मुलामुलींची नावे होती.

राजर्षी शाहू महाराज आपल्या पत्नीचा सन्मान करायचे. आपल्या संस्थानातील भोगावती नदीवर धरण बांधण्याची योजना 1907 मध्ये सुरू केली होती. त्या तलावाला शाहू छत्रपतींनी आपल्या पत्नीचे नाव ‘महाराणी लक्ष्मीबाई तलाव’ तसेच धरणाला ‘राधानगरी’ असे आपल्या मुलीचे नाव दिले. फेजिवडे गावाजवळ, राधानगर नावाचे गावही वसविले. त्याकाळी एका परराज्यातून महाराजांना एका कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले, पण भाषण हिंदीतून करायचे होते. शाहू राजांना रेल्वेने जायला तीन दिवस लागणार होते. राजे जिद्दी होते. तीन दिवस त्यांनी रेल्वेतच हिंदीचा सराव केला आणि उत्तम रीतीने भाषण तयार केले. त्या भाषणात ते म्हणाले, ‘श्री शिवछत्रपतींनी सिसोदिया वंशात जन्म घेऊन आपले सर्व आयुष्य स्त्रियांचे रक्षण करण्यात, दीन प्रजेचे रक्षण करण्यात व आर्य धर्माचे रक्षण करण्यात खर्चिले. त्या क्षत्रियकुलवंतास श्री शिवाजी महाराज यांचे यशोचिन्ह आपल्या हृदयात प्रतिबिंबित असले पाहिजे. श्री छत्रपतींच्या पुत्रपौत्रांपैकी मी एक आहे. त्याचमुळे मानसन्मान मिळतो. एका भाषणात राजर्षी शाहू महाराज म्हणतात, ‘मी रयतेचा राजा आहे. श्री शिवछत्रपतींच्या नावाला गादीला किंवा बट्टा लागेल असे नीच वर्तन माझ्याकडून कधीच होणार नाही. राज्यअधिकार सूत्रे हाती आल्यानंतर मागासलेल्या जातींना वर आणण्याचे मी प्रामाणिक प्रयत्न केले; पण यावरून ब्राह्मणांच्या ठिकाणी माझा द्वेषभाव आहे असे मात्र मुळीच नाही. अनेक ब्राह्मण माझे विश्वासाचे अंमलदार आणि सल्लागार आहेत. त्यांना मी इमाने दिली आणि इतर जातीप्रमाणे त्यांच्या कल्याणाची इच्छा बाळगलेली आहे.

अशक्त मुलांना ताकद येण्यासाठी आई जसे प्रयत्न करते तसेच माझे प्रत्येक मागासलेल्या समाजासाठी कार्य आहे.’ यावरून शाहू महाराजांना रयतेतील प्रत्येक व्यक्तीची काळजी होती हे सिद्ध होते. ब्रिटिशांच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या व विनाअत्याचार जगण्याचे स्वातंत्र्य हवे असल्यामुळे अस्पृश्य समाजाने बंड पुकारले तेव्हा त्यांच्यावरील अन्याय कमी व्हावा म्हणून महाराजांनी सचोटीने प्रयत्न केले.

ब्रिटिश सरकारसोबत चर्चा करून महाराजांनी अस्पृश्यावरील जाचक बंधने शिथिल केली आणि त्यांच्या जीवनात शिक्षणाची बीजे रोवली. शेतकऱयांना सिंचनव्यवस्था, कर्ज उपलब्ध करून दिले. त्यांनी किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिटय़ूटची स्थापना केली, ज्यामुळे शेतकऱयांना त्यांचे पीक उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रे आणि विविध शेती पद्धती शिकवल्या जातात. महाराजांनी समानता, शिक्षण,अंधश्रद्धा, आणि मानवतेची गुढी उभारली. रयतेचा लाडका राजा अशी त्यांची ख्याती होती.

[email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)