निमित्त – मनोरंजनाची अव्याहत सेवा

>> वर्षा चोपडे

युनेस्कोच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस एकमताने घोषित केला व संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीने डिसेंबर 2012 मध्ये जागतिक रेडिओ दिवसाच्या घोषणेला मान्यता दिली. ‘ज्ञान, माहिती आणि मनोरंजन’ या त्रिसूत्रीच्या आधारे रेडिओची 96 वर्षांची सेवा अव्याहत सुरू आहे.

नोव्हेंबर, 2011 मध्ये युनेस्कोच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस एकमताने घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीने डिसेंबर 2012 मध्ये जागतिक रेडिओ दिवसाच्या घोषणेला मान्यता दिली. महान शास्त्रज्ञ गुग्लिल्मो मार्कोनीने 13 मे 1897 ला जगातील पहिला रेडियो संदेश पाठवला. ते एक इटालियन भौतिकशास्त्रज्ञ आणि यशस्वी वायरलेस टेलिग्राफ किंवा रेडिओचे शोधक होते. 1909 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले, ते त्यांनी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ फर्डिनांड ब्रॉन यांच्यासोबत शेअर केले.

भारतात जून 1923 मध्ये रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेने देशातील पहिले प्रसारण केले. त्यानंतर पाच महिन्यांनी कलकत्ता रेडिओ क्लबची स्थापना करण्यात आली. 1956 मध्ये राष्ट्रीय प्रसारणासाठी आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आले. असे म्हणतात, 4 जून 1944 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर रेडिओवरून एक संदेश प्रसारित केला आणि महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींच्या हत्येनंतर देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रेडिओवरून राष्ट्राला संबोधित करताना ‘राष्ट्रपिता राहिले नाहीत’ असे म्हटले होते.

आकाशवाणी सिग्नेचर टय़ून 1930 च्या मध्यात प्रथम प्रसारित करण्यात आली होती. जर्मनीतून पळून मुंबईत 12 वर्षे घालवलेल्या वॉल्टर कॉफमन या ज्यू निर्वासिताने ही टय़ून तयार केली होती. ती राग शिवरंजनीवर आधारित आहे. गौहर जानने ग्रामोफोन कंपनीसाठी राग जोगियामधील भारतातील पहिले ख्याल गाणे रेकॉर्ड केले. गौहर जान या कोलकाता येथील एक भारतीय गायिका आणि नृत्यांगना होत्या. पूर्वीच्या काळात रेडिओ अगदी दुर्गम आणि असुरक्षित भागापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे सोपे माध्यम होते.

रेडिओवर मनोरंजनाच्या कार्यक्रमासोबत विविध अभ्यासक, नामवंतांच्या मुलाखती, शैक्षणिक कार्यक्रम तसेच शेतकरी आणि गृहिणीसाठी विरंगुळा आणि माहितीचे स्रोत अशी रेडिओची ओळख होती. आमच्या लहानपणी गावात टीव्ही फार तुरळक होत्या आणि संपूर्ण गावात रेडिओची संख्या दोन-तीनच होती, पण गावातील आमचे मामा सकाळी रेडिओ लावायचे आणि गावकरी बातम्या आणि गाण्याचा आनंद लुटायचे. स्त्रिया गाणे ऐकताना कामात गुंतलेल्या असायच्या. मराठी गाणे म्हणजे मेजवानी होती. गावातील एक हौशी तरुण रेडिओ खांद्यावर घेऊन कामाने का होईना गावात चक्कर मारायचा व रेडिओचा आवाज फुल करून प्रसिद्ध झालेल्या गाण्याचा आनंद लुटायचा. मनोरंजनाची खूप कमी साधने हे त्याचे कारण असायचे. लोक त्याला हसायचे, पण त्यांनाही रेडिओचे अप्रूप होते. आमच्या वाडय़ात घरगडी म्हणून काम करणारे काका आमच्या घरचा रेडिओ शेतात घेऊन जायचे आणि काम करताना रेडिओवरचे कार्यक्रम ऐकायचे.

संगीताचे कार्यक्रम, हिंदी सिनेमाचे अर्थपूर्ण श्रवणीय गाणे यामुळे लोकांना रेडिओने वेड लावले होते. तो काळ वेगळा होता. आता खूप बदल झाले. तरीही आजच्या काळात रेडिओ ऐकणारे आहेत. टेलर, ड्रायव्हर आणि इतर बैठेकाम करणारे लोक रेडिओवर गाण्याचा आनंद लुटतात. त्या काळात रेडिओ कार्यक्रमाचा दर्जा उत्तम होता. आजही भारतात ऑल इंडिया रेडिओ इंडियाचे पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर, प्रसार भारतीचे रेडिओ व्हर्टिकल आपल्या श्रोत्यांना माहिती देणे, शिक्षित करणे आणि त्यांचे मनोरंजन करण्याचे काम करत आहे.
एएम, एफएम, शॉर्टवेव्ह, लाँगवेव्ह, सॅटेलाइट, हॅम, डीएबी, वॉकी-टॉकीज आणि एचडी रेडिओ हे सर्वात जास्त वापरले जाणारे रेडिओ तंत्रज्ञान आहेत. AIR (ऑल इंडिया रेडिओ) आज 23 भाषांमध्ये आणि 146 बोलीभाषांमध्ये प्रसरण करते, जे सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा वैविध्यपूर्ण लोकसंख्येच्या मागणीचा विचार करून पोषक कार्यक्रम प्रक्षेपित करते. हिंदुस्थानी बाह्य सेवा विभागाचे कार्यक्रम 11 हिंदुस्थानी आणि 16 परदेशी भाषांमध्ये 100 हून अधिक देशांमध्ये प्रसारित केले जातात. आकाशवाणीमध्ये त्रिस्तरीय प्रसारण प्रणाली आहे. आकाशवाणी कार्यक्रमांचे हे तीन स्तर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक आहेत, प्रत्येकाला वेगळे प्रेक्षक आहेत. दिल्लीतून प्रादेशिक आणि स्थानिक रेडिओ केंद्रांद्वारे राष्ट्रीय कार्यक्रम प्रसारित केले जातात. यात सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रसारित केले जातात.

शासन निर्णयाला अनुसरून, AIR टप्प्याटप्प्याने अॅनालॉगवरून डिजिटलवर स्विच करत आहे. एफएम रेडिओ अर्थात फ्रिक्वेन्सी मॉडय़ुलेशन (एफएम) हीसुद्धा एक रेडिओ प्रसारण सेवा आहे. एफएम रेडिओचा शोध अमेरिकन अभियंता एडविन आर्मस्ट्राँग यांनी 1933 मध्ये लावला होता. एफएम रेडिओ AM प्रसारणासारख्या इतर ब्रॉडकास्टिंग तंत्रांपेक्षा उच्च सेवा देते. सोशल मीडियाचे वर्चस्व वाढल्यामुळे रेडिओचे महत्त्व कमी झाल्याचे जाणवते. इंटरनेटवर आपण रेडिओशी जोडले जाऊ शकतो.

आजच्या काळात हिंदुस्थानात भाषांची संख्या, सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक विविधतेच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठय़ा प्रसारण संस्थांपैकी एक असून, ऑल इंडिया रेडिओच्या होम सर्व्हिसमध्ये देशभरात 591 रेडिओ स्टेशन्स आहेत. ‘ज्ञान, माहिती आणि मनोरंजन’ या त्रिसूत्रीच्या आधारे आकाशवाणी रेडिओची 96 वर्षं ही सेवा अव्याहत सुरू आहे. लोकशाही प्रचारासाठी रेडिओ हे एक शक्तिशाली माध्यम आहे. मनुष्याच्या सामाजिक आणि मानसिक विकासासाठी विविध विषयाची माहिती आवश्यक आहे आणि मनोरंजन हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ग्रामीण असो वा शहरी आजही रेडिओचे चाहते आहेत.

[email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)