>> तिरुची शिवा
राजकारणात आणि वैयक्तिक जीवनातील संकटांशी मुकाबला करीत माझी शक्ती म्हणून सोबत करणारी माझी पत्नी देविकाराणी वयाच्या 49व्या वर्षी मला एकटय़ाला सोडून निघून गेली. ‘फसव्या कॅन्सर’मुळे तिची जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती व्यर्थ ठरली अन् तिला माझ्यापासून कायमचे दूर नेले. तिच्या जाण्याने मी बरंच काही गमावलं पण या गमावण्यासोबतच मनात उरली ती खंत. जिने कोणत्याही परिस्थितीत मला कधीच दुःखी वा नाराज होऊ दिले नाही तिच्याकडे मी फारसा व्यक्त होऊ शकलो नाही. आपल्या प्रेमळ शब्दांनी भारावून जाणाऱया जोडीदाराला आपण गृहित धरतो अन् मग उरतो तो संवादाचा अभाव. पत्नीला गमावल्यानंतर हे जे मला उमगले ते तुमच्यासाठी… या लेखातून.
माझी पत्नी, जिने वयाच्या 17 व्या वर्षी माझ्याशी लग्न केले आणि आपले ‘प्लस टू’चे शिक्षण अर्धवट सोडले. 32 वर्षे आमचा सुखाचा संसार अर्धवट सोडून वयाच्या 49व्या वर्षी ती मला एकटय़ाला सोडून निघून गेली. तिची जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती, वैद्यकीय मदत आणि डॉक्टरांचे प्रामाणिक प्रयत्न त्या ‘फसव्या कॅन्सर’ पुढे व्यर्थ ठरले. पान्सरने माझ्या पत्नीचा जीव घेतला व तिला माझ्यापासून कायमचे दूर नेले.
आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी जे काही केलेय त्याबद्दल मला कधीही पश्चात्ताप झाला नाही. कारण ते सर्वकाही मी कधी विचारपूर्वक तर कधी जाणूनबुजून केले होते. पण गेल्या काही दिवसांपासून मला अपराधी भावनेने ग्रासले आहे. ज्याचे कारण सविस्तरपणे सांगतो. ज्यावेळी माझ्याकडे मर्यादित सुविधा होत्या त्यावेळी माझ्या पत्नीने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला साथ देत आनंदाने प्रत्येक गोष्टीचा स्वीकार केला. कधीच तक्रार केली नाही. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्मितहास्य हाच तिचा एकमेव दागिना होता. आम्हाला आधार देण्यासाठी तिने तिच्या सोन्याच्या दागिन्यांवर पाणी सोडले होते. मी राजकारणात आणि वैयक्तिक जीवनातील संकटांशी मुकाबला करत होतो तेव्हा तिचे सांत्वन माझ्यासोबत शक्तीचे स्रोत म्हणून काम करत राहिले. कोणत्याही उपकारांना किंवा मोहांना बळी न पडण्याची माझी प्रवृत्ती नेहमीच राहिली आहे. कितीही किंमत मोजावी लागली तरी स्वाभिमान जपत आणि नकारात्मक गोष्टींना मागे टाकत मी पुढे आलो आहे. तेव्हा ती माझ्यासोबतच होती.
माझ्या तीन मुलांचा जन्म झाला तेव्हा मी कधी प्रचारात, कधी प्रवासात तर कधी एखाद्या आंदोलनात निषेध करण्यात व्यस्त होतो. 1982 मध्ये जेव्हा आमच्या पहिल्या बाळाचा जन्म होणार होता. तेव्हा आमचे नेते डॉ. कलैगनर यांच्या पेरियाकुलम येथे पोटनिवडणुका होत्या. तिने त्या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेले पत्र ‘माझे डोळे तुला शोधत आहेत,’ ते मलाच उद्देशून होते. त्यात निवडणूक प्रचारासाठी शुभेच्छाही होत्या. 17 सप्टेंबरला आमच्या मुलीचा जन्म झाला आणि मी 19 तारखेला तिला भेटायला जाऊ शकलो. एक तासानंतर जेव्हा मी तिला मला निवडणूक प्रचारासाठी जायचे आहे, असे सांगितल्यावर तिने मला शुभेच्छा दिल्या आणि कोणतीही नाराजी व्यक्त न करता मला हसून निरोप दिला. आमचे दुसरे अपत्य जन्माला आले तेव्हा मी आंदोलनात सहभागी होतो आणि पोलीस कोठडीत होतो. ती बाळाला हॉस्पिटलमधून थेट पोलीस ठाण्यात घेऊन आली आणि स्वतच्या तब्येतीची पर्वा न करता माझ्याबद्दल चिंता व्यक्त करू लागली.
आमच्या घरात पाहुणचार करावा तर तिनेच. त्यासाठी ती ओळखली जायची. रात्री 2 वाजताही ती हसतमुखाने पाहुण्यांचे स्वागत करून गरमागरम डोसे बनवायची. तसे पाहिले तर हे सार्वजनिक जीवनात व्यस्त असलेल्या माझ्यासारख्या माणसासाठी आवश्यक होते. माझ्या आयुष्यात माझ्या आईची पोकळी तिने भरून काढली होती. कोणत्याही परिस्थितीत तिने मला कधीच दुःखी वा नाराज होऊ दिले नाही. माझ्या राजकीय कारकीर्दीमध्ये नैतिकतेचा पाया जर कोणी घातला असेल तर ती माझी पत्नी आहे. कारण घरची स्त्राr लोभी असेल तर सार्वजनिक जीवनात प्रामाणिक राहणे कोणत्याही व्यक्तीला अशक्य असते.
मला आठवते, आमच्या घरी साजरे होणारे सण आणि उत्सव, ज्यात जात, धर्म आणि पंथ या पलिकडे घरी येणारे नातेवाईक आणि मित्र परिवार खूप होता. त्यांचे आदरातिथ्य व्हायचे ते तिच्याच पुढाकाराने आणि सहयोगाने.
आज हे सगळे बोलताना मला खूप वाईट वाटत आहे. कारण जेव्हा ती हयात होती तेव्हा हे सगळे तिच्या सोबत कधीच शेअर केले नाही आणि याचाच मला रात्रंदिवस त्रास होत आहे. याला कदाचित तुम्ही पुरूषी अभिमान किंवा अहंकार म्हणू शकता पण मी त्यातला नाही. असे असते तर मला ते कधीच कळले नसते.
काही जण म्हणतात की, व्यस्त राजकारण्यांकडे कुटुंबाला देण्यासाठी वेळ नसतो. या गोष्टीला माझा ठाम नकार आहे. कारण माझ्या 32 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात एकदाही मला माझ्या पत्नीशी हितगुज साधण्यासाठी, तिच्या गुणांबद्दल बोलण्यासाठी दहा मिनिटेही मिळू नयेत? मी तिच्यासाठी ते करू शकलो नाही याचे मला खूप दुःख होत आहे. काहीजण म्हणतात की बायकांना न सांगता कौतुक समजते. पण जर हे खरे असते तर आपल्याला कधी भाषेची गरज पडली असती का? ‘सॉरी,’ ‘धन्यवाद’ आणि ‘प्रेम’ यांसारखे शब्दही योग्य वेळी नाही बोलले गेले तर ते कितीही बरोबर असले तरी अर्थ गमावून बसतात.
आयुष्यात बरेच काही शिकून आणि समजून घेत असताना मी माझ्या सर्वात महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक असलेले पत्नी कर्तव्य निभावण्यात अपयशी ठरलो आहे. जर कधी मी तिला सांगितले असते की, तिच्या सहयोगामुळे माझी राजकीय उंची वाढली आहे, तिच्या समजावण्यामुळे काही अडचणी दूर झाल्या आहेत किंवा तिच्या सहवासामुळे माझ्या मानसिक त्रासाचे क्षण हलके झाले आहेत तर तिला किती आनंद झाला असता? मला खात्री आहे की, माझ्या या शब्दांमुळे जेवढा आनंद तिला वाटला असता तो पैशांचा ढीगही तिला देऊ शकला नसता.
त्या दिवशी मी उटी येथे एका जाहीर सभेत होतो. तेव्हा तिची प्रकृती खालावत असल्याची बातमी मला मिळाली. घरी परतताना विचार करत होतो की, निदान त्या दिवशा तरी मी जे काही माझ्या मनात तिच्याबद्दल दडवून ठेवलेल्या भावना आहेत त्या सर्व तिला सांगायच्या. पण अफसोस! रुग्णालयात ती जिवंत सापडली. पण शुद्धीवर नव्हती. सर्वतोपरी प्रयत्न करूनही डॉक्टरांना तिला जिवंत करण्यात अपयश आले. तिच्या कानाजवळ झुकून मी तिला ‘देवी’ अशी हाक मारली. ती हाक मी तिला नेहमीच मारत असे. तिचे नाव ‘देविकाराणी’ होते. जसे शहाजहान एकटे असताना मुमताजला ‘ताज’ म्हणत तसे मी तिला ‘देवी’ म्हणत असे. तिसऱयांदा तिचे नाव पुकारल्यावर, जणु काही चमत्कार व्हावा तशी तिने ‘काय’ विचारणाऱया भुवया उंचावल्या आणि पुढच्याच क्षणी तिच्या उजव्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. मी आतून पूर्णपणे मोडलो होतो.
ती जेव्हा निरोगी, चालतीबोलती होती तेव्हा मी तिला माझ्या मनातले काही सांगितले नाही. आता तर ती ऐकण्याच्या वा समजण्याच्या स्थितीत नाही आणि मी तिला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या फोटोसमोर बसून आज माझे मन आक्रंदत आहे. जेव्हा बोलायला हवे होते, तेव्हा मी तसे केले नाही आणि आता मी माझ्या मित्र आणि नातेवाईकांसोबत तिच्या चांगुलपणाबद्दल बोलत आहे…. सगळे व्यर्थ आहे आता.
आम्ही राजकारणी स्टेजवरून बोलतो, श्रोत्यांच्या टाळ्यांच्या गजरात व उत्साहात आमच्या शब्दांचे कौतुक मोजतो आणि मग आमच्या सहकाऱयांकडूनही तशीच अपेक्षा ठेवतो. त्याचप्रमाणे घरातल्या गृहिणी कुटुंबाची सेवा करतात, काळजी घेतात, नवीन पदार्थ शिजवून खाऊ घालतात, त्यांनाही त्यांच्या समर्पणाबद्दल कौतुकाच्या शब्दाची अपेक्षा असते हे आपल्याला का समजत नाही? नवऱयाच्या प्रेमळ शब्दांनी बायको स्वाभाविकपणे भारावून जाते. याने नवरा म्हणून आपण काय गमावतो का? मग आपल्यापैकी बरेच जण असे पत्नीला का सांगू शकत नाहीत? आता मला हे सगळे जाणवत आहे. पण एव्हाना उशीर झाला आहे. तिला जाऊन आता 15-20 दिवस झाले आहेत. जेव्हा जेव्हा मीˆतिचा फोटो पाहतो तेव्हा माझ्या हृदयात कळ उठते आणि डोळय़ातून अश्रुंच्या धारा वाहू लागतात.
प्रिय मित्रांनो, मी तुम्हा सगळय़ांना विनंती करतो की, कृपया तुमच्या पत्नीशी तिच्या सहवासाबद्दल, ती वाहात असलेल्या जबाबदारीबद्दल, तिच्या सहनशीलतेबद्दल, समंजसपणाबद्दल आणि तुमच्या आयुष्यात तिचे असलेले महत्त्वाचे स्थान या सगळय़ाबद्दल तिच्याशी बोला. तुमचे मन मोकळे करा. आतापर्यंत जे काही सांगितले नाही ते सांगा. मला माझ्या देवीला गमावल्यानंतर जे उमगले ते तुमच्यासाठी एक उदाहरण बनू दे. लोकांशी बोलणे हा ज्याचा व्यवसाय आहे, त्याने आपल्या पत्नीशी बोलण्याची संधी गमावली ही किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. मित्रांनो, पत्नी ही आपल्यासाठी जगते, आपल्या मुलांना जन्म देते, अडीअडचणींमध्ये खांद्याला खांदा लावून उभी राहते, आयुष्यभर सगळे नातेसंबंध सांभाळते. तिला कळू द्या की, तुम्ही तिच्यावर अफाट प्रेम करता. तिचे समर्पण समजून घेता. मी जे दुःख अनुभवत आहे ते इतर कोणीही अनुभवू नये. माझा हा अनुभव किमान काही कुटुंबांना मदत करेल या आशेने मी हे लिहिले आहे. तेव्हा कृपया आपल्या पत्नीशी बोला. तिच्याशी हितगुज साधा!
(लेखक राज्यसभा सदस्य आहेत) (लेखक ज्येष्ठ पत्रकार–विश्लेषक आहेत)