
>> तरंग वैद्य
देशाचा स्वातंत्र्यासाठीचा लढा 1857 पासून सुरू झाला आणि नव्वद वर्षांनी आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला तो सोनेरी दिवस दिसला. स्वातंत्र्य लढय़ाच्या इतिहासातील अनेक घटनांबाबत मतभिन्नता आहे अन् वेगळे दृष्टिकोनही आहेत. स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास दर्शवणारी ही वेब सीरिज इतिहासाची आवड असलेल्यांनी नक्कीच बघावी अशी आहे.
इतिहास… शालेय शिक्षणात आपल्याला इतिहास विषय होता. पूर्वापार आपण भारताचा इतिहास वाचला. काही संदर्भ आपल्या आजोबा, पंजोबांकडून ऐकले. इतिहासाचे विषय घेऊन काही चित्रपट आले. पण वेळमर्यादा असल्यामुळे ते काही स्वरूपात गुंडाळले गेले. आता वेब सीरिजच्या माध्यमातून अशा अनेक मालिका आल्या आणि येत आहेत. इथे वेळमर्यादा नसल्यामुळे माहिती सखोल पद्धतीने दिली जाते. अशीच एक वेब सीरिज 15 नोव्हेंबर 2024ला सोनी लिव्ह या ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर आली असून नाव ऐकूनच बघावी अशी वाटणारी आहे. या वेब सीरिजचे नाव आहे ‘फ्रीडम आट मिडनाईट’. डॉमिनिक लॅपिएर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या याच नावाच्या पुस्तकावर बेतलेली सात भागांची ही मालिका लॉर्ड माउंटबेटन यांच्या भारतात आल्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचे संदर्भ दाखवणारी आहे. डॉमिनिक लॅपिएर यांना त्यांच्या कर्तृत्वासाठी भारत शासनाद्वारे वर्ष 2008मध्ये पद्मभूषण देऊन पुरस्कृत केले गेले.
स्वातंत्र्याच्या मागणीपुढे झुकून इंग्रज देश सोडून जायचे ठरवतात आणि त्यादृष्टीने त्यांची हालचाल सुरू होते. देशातील राजकारणी, त्यांचे मत लक्षात घेऊन एक सर्वसंमत असा ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’चा खाका तयार करण्याचा लंडनवरून आदेश आलेला असून याची जबाबदारी लॉर्ड माउंटबेटन यांना दिली जाते आणि ते भारतात येतात.
देशात त्या काळात अनेक लहानमोठे पक्ष होते, पण प्रभावी पक्ष काँग्रेस आणि मुस्लिम लीग होते. त्यामुळे या मालिकेत नेहरू, गांधी, पटेल, मौलाना अब्दुल कलाम हे काँग्रेसी आणि मुस्लिम लीगचे सर्वेसर्वा मोहम्मद अली जीना यांच्यासोबत माउंटबेटनच्या भेटी, चर्चा दाखवत मालिका पुढे जाते. काँग्रेसचे नेते एकत्र असले तरी त्यांच्यातही वैचारिक आणि व्यवहारिक मतभेद होते. स्वतंत्र भारत का विभाजित स्वतंत्र भारत…? या प्रश्नाचे एक उत्तर त्यांच्याकडे नव्हते. दुसरीकडे जीना स्वतंत्र पाकिस्तानसाठी अडून बसले होते. जीना हे काँग्रेससाठी असा काटा होता जो निघतही नव्हता आणि त्रासही देत होता. या मालिकेत असे दाखवले आहे की इंग्रजही विभाजित भारताच्या बाजूने नव्हते, पण शेवटी देशाच्या राजकारण्यांचे एकमत न झाल्यामुळे त्यांनी फाळणीचा निर्णय घेतला. इथे मतभिन्नता असू शकते.
मालिका विषयाला धरून संथगतीने पुढे जाते याचा अर्थ कंटाळवाणी होते असा नाही. उलट काही संदर्भ आपल्याला नव्याने कळतात. अर्थात आपण ऐकलेला इतिहास आणि या मालिकेत मांडलेला इतिहास वेगळा आहे. आपण ऐकलेल्या इतिहासामुळे काही व्यक्तींना फाळणीचे दोषी मानत आलो आहोत. इथे मात्र वेळ आणि परिस्थिती कारणीभूत दाखवली आहे. जीनांचा पाकिस्तानसाठीचा अट्टहास आणि तो मिळवण्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाण्याचा त्यांचा निर्णय त्यांना या मालिकेचा खलनायक ठरवतो. जीनांचे अनुयायी रस्त्यावर उतरून दंगे करतात, कत्तल करतात आणि ते थांबत नाहीत. त्यामुळे काँग्रेस ‘बोट कापून बाजूला करून शरीर वाचवूया’ या भूमिकेत येते आणि पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानचा मार्ग मोकळा होतो, असे या मालिकेत दाखवले आहे.
अभिनयाबद्दल बोलायचे तर सिद्धांत गुप्ता (जवाहरलाल नेहरू), राजेंद्र चावला (सरदार वल्लभभाई पटेल), राजेश कुमार (लियाकत खान), के.सी. शंकर (मेनन) हे खंदे आणि नावाजलेले अभिनेते आहेत. सरोजिनी नायडू हे त्या काळात राजकारणातील भारदस्त व्यक्तिमत्त्व; पण इथे फक्त भारदस्त शरीर असलेली अभिनेत्री घेऊन तिला करण्यासाठी काहीच नाहीये. राजेंद्र चावलांनी साकारलेले सरदार पटेल आपल्याला पटतात. सिद्धांत गुप्ता नेहरू निभावण्यात किंचित कमी पडला आहे असे वाटते. आपण चित्रांमधून बघितलेल्या नेहरूंसमोर हे नेहरू शरीरयष्टीनेही कमजोर वाटतात. चिराग व्होरा गांधी म्हणून ठीक, पण खऱया अर्थाने मालिका आपल्या अभिनय आणि देहबोलीतून सांभाळत पुढे नेली आहे ती जीना म्हणजेच अरीफ झकेरिया या अनुभवी आणि गुणी अभिनेत्याने. माउंटबेटन झालेल्या ल्युक मॅकगिबनेही उत्तम अभिनय केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा 1857 पासून सुरू झाला आणि नव्वद वर्षांनी आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला तो सोनेरी दिवस दिसला. या मालिकेत देश सोडून जायच्या आधी देश चालवण्याची, देश सांभाळण्याची मोठी जबाबदारी अशा लोकांकडे सोपवावी जे देशात कलह किंवा गृहयुद्ध होऊ देणार नाहीत हा इंग्रजांचा मुख्य उद्देश होता आणि त्यासाठी ते प्रयत्नशील होते हे ठळकपणे दाखवण्यात आले आहे. वर लिहिल्याप्रमाणे यात मतभिन्नता असू शकते, पण एक वेगळा दृष्टिकोन आपल्या समोर येतो हे निश्चित.
साधारण पंचेचाळीस मिनिटांचे सात भाग असलेल्या या मालिकेत तो काळ, तेव्हाचे राहणीमान छान दाखवले आहे. तसेच माउंटबेटनचे राहते घर म्हणजेच ‘व्हॉईसरॉय हाऊस’ची भव्यता नजरेत भरते. त्यासाठी कला दिग्दर्शक आणि छायाचित्रकार प्रशंसेला पात्र आहेत. इतिहासाची आवड असलेल्यांसाठी ही वेब सीरिज नक्कीच बघण्यासारखी आहे. त्यामुळे चुकवू नका.
– [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)