
>> स्वप्नील साळसकर
शिक्षण पूर्ण झाले की, सिंधुदुर्गातील तरुण नोकरीसाठी शहराकडे धाव घेतो. मात्र गावात राहून रोजगार निर्मिती करता येते हे खवणे भगतवाडी येथील विज्ञान शाखेत शिकणाऱया रोहन परब याला उमगले. त्याने पर्यटन व्यवसाय करण्याचे धाडस दाखवून कांदळवन नौका सफर सुरू केली. त्याची माहिती हळूहळू महाराष्ट्रासह आता देशभरात पसरू लागली आहे.
शाश्वत पर्यटन विकासातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वयंरोजगार निर्माण केला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला खवणे समुद्रकिनारा कांदळवन सफारीमुळे महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या शर्यतीत उतरला आहे. येथील रोहन परब या तरुणाने इतरांना सोबत घेत पर्यटन फुलवताना स्वतच व्यवसायाचे यशस्वी पाऊल टाकले. एका बाजूला निळाशार समुद्रकिनारा, तर दुसरीकडे खाडीतील प्रवास पर्यटकांना मनसोक्त आनंद देत आहे.
शिक्षण पूर्ण झाले की, सिंधुदुर्गातील तरुण नोकरीच्या निमित्ताने शहराकडे धाव घेतो. मात्र गावात राहून रोजगार निर्मिती करता येते. या संधीचे सोने करत खवणे भगतवाडी येथील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकत असताना रोहन परब याने पर्यटन व्यवसाय करण्यासाठी धाडस केले. मागील वर्षे सुरू केलेली ही कांदळवन नौका सफरची माहिती हळूहळू महाराष्ट्रासह देशभरात पसरली. यामुळे पर्यटकांचा ओढाही दिवसेंदिवस वाढू लागला. जवळपास अर्धा ते पाऊण तास कांदळवन फिरत असताना लाईफ जॅकेटची सुरक्षितता, बंदर विभागाच्या अधिकृत परवानग्या घेऊन हा व्यवसाय केला जात आहे.
वर्षभरात सहा महिने सुकती, तर सहा महिने भरती असते. साधारण ऑक्टोबर महिन्यापासून समुद्र आणि खाडीचा संगम होत पाणी सर्व दूर पसरते. या पाण्याची खोली मध्यभागी साधारण सात फूट, तर किनारी तीन फूटच असल्यामुळे कांदळवनाची ही निसर्गसफारी पर्यटकांसह बच्चे कंपनीसाठी सुरक्षित ठरते. एका बाजूने गोडय़ा पाण्याचा ओहोळ खाडीला मिळत असल्यामुळे
अॅडव्हेंचर राईडदरम्यान फिश स्पा करण्याचा आनंद पर्यटकांना मिळतो. याच भागात पूर्वी शेती केली जायची. माड बागायती होती. कालौघात खाडीचे पात्र विस्तारले आणि शेती पडीक राहिल्यामुळे अलीकडच्या वर्षात मोठय़ा प्रमाणात कांदळवन तयार झाले. या नैसर्गिक ठेव्याची जपणूकही तेवढय़ाच निगुतीने केली जात आहे. खाडीपात्रात पडलेला पालापाचोळा असो वा पर्यटकांकडून टाकलेला कचरा, तरुणांकडून याची साफसफाई करत दर आठवडय़ाला त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. कांदळवनाची कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जात असल्यामुळे परिसर निसर्गसंपन्न राहण्यात मदत होत आहे.
रोहन परब आणि येथील तरुणांनी खाडीतील नौका सफर घडवण्यासाठी लागणाऱया फायबर बोटी खास उडपीवरून मागविल्या आहेत. साधारण वीस ते पंचवीस हजार किमतीची एक बोट अशा जवळपास 10 बोटी रोहन याने पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या एका बोटीमध्ये आसन क्षमता अडीचशे ते तीनशे किलोची असून दोन ते दोन पर्यटक अगदी आरामात सुरक्षितरीत्या बसू शकतात. वेंगुर्ले तालुक्यापासून साधारण 20 किमी, तर कुडाळ तालुक्यातून पिंगुळी, पाट, म्हापणमार्गे खवणे असे 25 किमी अंतर कापून खाडीतील कांदळवन सफारीपर्यंत पोहोचता येईल.
राइड्सची मज्जा
परदेशात गेल्याचा अनुभव देणाऱया विविध राइड्स आनंददायी ठरत आहेत. ग्राससर्कल म्हणजे निळ्याशार शांत पाण्यामध्ये उगवलेल्या हिरव्या गोलाकार गवताला स्पर्श करत फेरी मारायची. एडवेंचर राईडमध्ये लांबलचक ओहोळामधून दोन्ही बाजूचा हिरवागार निसर्ग, पशुपक्षी न्याहाळणाचा आनंद, कांदळवनातील गुहा फिरण्याची मजा औरच आहे. ओहोळातील माशांचा ‘फिश स्पा’ पूर्णत मोफत. याशिवाय हॉर्नबिल, घार, रेड पॅरोट, वुडपेकर यासह दुर्मिळ पक्षी, पाणमांजर आणि इतर प्राणी पाहण्याची संधी यानिमित्ताने पर्यटकांना पाहायला मिळत आहेत.