
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
तमाम कृषिवलांचे कुलदैवत व मराठी मुलखातील लोकदैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या डोंगरावर माघ महिन्यातील पौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या पाच रविवारी चालत जाऊन दर्शन घेऊन गुलाल-खोबरे उधळण्याची परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू आहे. यंदा माघ शुद्ध 15, बुधवार दिनांक 12 फेब्रुवारीला पौर्णिमा झाल्यानंतर रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जोतिबाच्या खेटय़ांना प्रारंभ झाला आहे. 16 व 23 फेब्रुवारी, तसेच 2, 9 व 16 मार्च रोजी हजारोंच्या संख्येने जोतिबाचे भक्त पायी डोंगरावर येतात, `जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर दुमदुमतो. पाचव्या खेटय़ानंतर शेतकरी आपल्या कुटुंबासह येऊन देवाला पुरणपोळीचा नैवेद्य करतात. इथल्या गुरवांचे आदरातिथ्य वाखाणण्याजोगे आहे. ते निरपेक्षपणे भक्तांची सेवा करतात हे या जोतिबाच्या डोंगरावरचे वैशिष्टय़ आहे!
`दवणा’ ही वनस्पती जोतिबाला, तसेच काळभैरव व यमाईदेवीला प्रिय असून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कुशिरे, पुशिरे या गावातील शेतकरी दवणा पिकवतात. त्याला एक प्रकारचा मनमोहक असा सुगंध येतो. इतरत्र कुठेही न पिकणाऱया दवणा वनस्पतीबद्दल इथल्या शेतकऱयांना खूप आदर आहे. जोतिबाच्या भक्तांना दवणा माफक दरात उपलब्ध करून इथला शेतकरी वर्ग एक प्रकारे देवाप्रति भक्तांसाठी सेवाभाव जपतो आहे.
प्रतिवर्षी माघ महिन्यात पाच रविवारी दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनाला जाण्याची अनेक बहुजन शेतकरी घराण्याची परंपरा आहे. या वेळी जोतिबा डोंगरावर (वाडी रत्नागिरी) प्रचंड गर्दी होते. जोतिबाला गुलाल, खोबरे, दवणा वाहायचा व मंदिराच्या ओटय़ावर कापूर लावून दर्शन घेण्याची परंपरा आहे, यालाच `जोतिबाचे खेटे’ म्हणतात. या खेटय़ांचे वैशिष्टय़ म्हणजे काही घराण्यांतील कुलाचार म्हणून पायी चालत जाऊन हे खेटे पूर्ण केले जातात. याबाबत अधिक माहिती घेताना एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे, पूर्वीच्या काळी श्री केदारनाथ (जोतिबा) आपली दख्खनची मोहीम संपवून हिमालयाच्या दिशेने परत निघाले हे अंबामातेला कळताच ती करवीरातून अनवाणी पळत वाडी रत्नागिरीच्या या डोंगरावर आली व केदारनाथला तिने विनंती करून इथेच वास्तव्य करण्यास सांगितले. श्री केदारनाथांनी अंबामातेच्या विनंतीला मान देऊन इथेच कायमचे वास्तव्य केले. तेव्हापासून करवीरनगरीतून जोतिबा डोंगरावर पायी चालत जाऊन खेटे घालण्याची प्रथा चालत आली आहे. ती आजतागायत सुरू आहे. माघ महिन्यात सलग पाच रविवारी कोल्हापूरसह आजूबाजूच्या पंपोशीतील असंख्य भक्त कुशिरे (ता. करवीर) मार्गे पायी गायमुखमार्गे दक्षिण दरवाजातून जोतिबाच्या दर्शनाला मंदिरात जातात. डोंगराच्या पायथ्याशी पुष्करणी तीर्थ तलाव म्हणजेच गायमुख तलावाच्या काठावर थोडा विसावा घेऊन चालत डोंगरावर जाण्यासाठी रीघ लागलेली असते. कोल्हापुरातील `सहजसेवा ट्रस्ट’ व `मेहता चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने या तलावाच्या काठावर मोफत अन्नछत्र चालविले जाते. दररोज हजारो भाविक या मोफत अन्नछत्राचा लाभ घेतात. पूर्वी हा गायमुख परिसर ओसाड होता. सहजसेवा ट्रस्ट व इतर सेवाभावी संस्थांनी या परिसरात वृक्षारोपणाचा उपाम राबविला. भाविक पाण्याची बाटली भरून आणून या वृक्षाच्या संगोपनासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे हा परिसर वनराईने सुशोभित झाला आहे. पूर्वी चालत खेटय़ाला जाताना सर्वप्रथम कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत आंघोळ करून शुचिर्भूत होऊन चालत जोतिबा डोंगरावर जाण्याची प्रथा होती. मात्र अलीकडे धावत्या काळात सर्वांना ते शक्य होईलच असे नाही. कर्नाटकातील बेळगाव, पंढरपूर, लातूर, बार्शी या भागांतूनही जोतिबाच्या दर्शनासाठी पायी चालत येणारे भाविक आहेत. ते भाविक पंचगंगा नदी काठावर येऊन विसावा घेतात व पंचगंगेत स्नान करून मगच जोतिबाच्या खेटय़ाला सुरुवात करतात. हे भाविक वडणगेमार्गे निगवे (दुमाला) या गावात असणाऱया हिंमत बहादूर चव्हाण (सरकार) यांच्या वाडय़ाच्या प्रांगणात असणाऱया जोतिबाच्या पादुकांचे दर्शन घेतात आणि मगच कुशिरेमार्गे डोंगर चढतात. कोल्हापूर परिसरात आजही या जोतिबाच्या पाच खेटय़ांना जोतिबाभक्तांच्या दृष्टीने फारच महत्त्व आहे.
या माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबाचे भक्त पायी अथवा वाहनाने प्रवास करत जोतिबा डोंगरावर येतात. देवाला गुलाल, खोबरे, दवणा वाहतात व प्रदक्षिणा घेताना काळभैरवाच्या मंदिरासमोर जोतिबाच्या गुरव मंडळींकडून नारळ फोडून घेतात. तो फोडलेला नारळ प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. पाचव्या रविवारी म्हणजेच शेवटच्या खेटय़ाला जोतिबाला नैवेद्य करण्याची प्रथा आहे. या वेळी गुरवाच्या घरात तांदूळ, तुरडाळ, हरभरा डाळ, गूळ असा `शिधा’ दिला जातो. जोतिबाच्या गुरव समाजातील महिला पुरणपोळी, भात, आमटी, भाजीचा नैवेद्य करतात व प्रत्येकाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. तो नैवेद्य भाविक आपल्या परिवारासह गुरवाच्या घरात बसून ग्रहण करतात. या पाचव्या रविवारी म्हणजेच शेवटच्या खेटय़ाला नैवेद्य दिल्यानंतरच पाच खेटय़ाची यात्रा पूर्ण होते. काही भक्त पाच खेटे न घालता पहिला व शेवटचा पाचवा खेटा घालतात. मात्र घराण्याचा कुलाचार म्हणून कमी-अधिक प्रमाणात जोतिबाला नैवेद्य करून खेटय़ाची समाप्ती करतात. हे खेटे पूर्ण झाले की, जोतिबाच्या भक्तांना वेध लागतात ते जोतिबाच्या भव्यदिव्य चैत्री यात्रेचे.
`जोतिबाच्या नावानं चांगभलं’, `काळभैरवाच्या नावानं चांगभलं’ या चांगभलंच्या गजरात जोतिबाच्या डोंगरावर चालत जाणारे भाविक आणि जोतिबाच्या खेटय़ाचे अप्रूप आजही करवीरवासीयांच्या जनजीवनात एक आगळेवेगळे वैशिष्टय़पूर्ण स्थान टिकवून आहे.
(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)