प्रासंगिक – आता मुळावर घाव घाला!

>> सुनील कुवरे

पृथ्वीवरचा स्वर्ग, नंदनवन म्हणून ओळख असलेले जम्मू-कश्मीर दहशतवाद्यांच्या गोळीबाराने थरारले आणि ही भूमी पर्यटकांच्या रक्ताने लाल झाली. भारताचे मिनी स्वित्झर्लंड समजले जाणाऱ्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये दोन विदेशी पर्यटकांसह 26 जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. हा भ्याड हल्ला आहे. प्रसारमाध्यमांनी दाखवलेली दृश्ये मन विचलित आणि काळीज पिळवटून टाकणारी होती. दहशतवाद्यांना धर्म नसतो, पण या हल्ल्यात धर्मांतता दिसून आली. हे निव्वळ धर्मद्वेषातून व हिंदुस्थान द्वेषातून हे केले आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली. आता इशारे नकोत, कृती हवी. अशी देशवासीयांची मागणी आहे. राजकारणाशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या या पर्यटकांवर गोळीबार करून आम्ही दहशतवादी आहोत, हे दाखवून दिले. पाच वर्षांपूर्वी 370 वे कलम रद्द केल्यानंतर गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. कश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले. कश्मीरमध्ये जनजीवन वेगाने सुरळीत झाले. तेथे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. कश्मीरमधील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. मार्च महिन्यात झालेल्या बर्फवृष्टीनंतर हजारोंच्या संख्येने पर्यटक जम्मू-कश्मीरला जात असतात. त्यामुळे येथील पर्यटनाच्या व्यवसायाला मोठी चालना मिळते. पर्यटन हा कश्मीरमधील उपजीविकेचा मुख्य व्यवसाय आहे. अशा प्रकारची घटना घडते तेव्हा केवळ भारतीय पातळीवर नाही तर जागतिक पातळीवरसुद्धा कश्मीरला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होतो. तसेच कश्मीरच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो.

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले नवीन नाहीत. यापूर्वी अमरनाथ यात्रेकरू, सैन्य, सुरक्षा दले आणि पोलिसांना लक्ष्य केले जात होते. आता ऐन पर्यटनाच्या काळात पर्यटकांना लक्ष्य केले. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. टीआरएफ ही पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची शाखा आहे. या दहशतवादी हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे लपून राहिले नाही, त्यातून संशयाची सुई पाकिस्तानाकडे वळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने हात वर करून आमचा या हल्ल्याशी काही संबंध नाही असे जाहीर केले. परंतु विशेष म्हणजे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स हे भारतात आले असताना कश्मीरात काही आलबेल नाही. हा संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न या हल्ल्यामागे दिसतो, पण अमेरिकेसह जगातील सर्वच प्रमुखांनी या हल्ल्याचा निषेध केल्याने त्याला काहीच अर्थ राहत नाही. या घटनेत सुरक्षा यंत्रणेतील गलथन पण कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. केंद्र सरकारनेसुद्धा यंत्रणेत त्रुटी राहिल्या हे मान्य केले आहे. सुरक्षा यंत्रणा चोख असती तर वेळीच दहशतवाद्यांचा डाव लक्षात येऊन तो उधळून लावला गेला असता.

पुलवामा आणि बालाकोट हल्ल्यानंतर आता बदला घेण्याची वेळ आली आहे. त्यावेळी जशास तसे उत्तर हिंदुस्थानने दिले, तसेच उत्तर देण्याची वेळ आली आहे. संपूर्ण विरोधी पक्ष आणि देशवासीय सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, पण सत्ताधारी पक्षाने राजकारण करू नये. कारण कश्मीरमधील सध्याची परिस्थिती बिकट असून विद्यमान मोदी सरकारसमोर हे मोठे आव्हान आहे. कश्मीरमध्ये 370 वे कलम हटविल्यानंतरसुद्धा अशांतता आहे. एखादी मोठी घटना घडल्यावर आपण चार दिवस पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडतो आणि पुन्हा शांत बसतो. आता केंद्र सरकारने पाकिस्तानची राजनैतिक कोडी करणारे निर्णय घेतले. एकीकडे केंद्र सरकारने देशातील नक्षलवाद नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून ठोस पावले उचलली आहेत, तशीच पावले आता कश्मीरमधील दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी उचलावीत. तसेच हिंदुस्थानने युनोसह आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वत्र पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी कठोर पावले उचलायला हवीत. कारण पाकिस्तानच्या मुळावरच घाव घालण्याची वेळ आली आहे.