प्रासंगिक – गुरू पूजन म्हणजे…

>> स्मिता यशवंत चव्हाण, संचालिका, श्रमिक विद्यालय

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा
गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

या ओळीतूनच आपण गुरूंबद्दल आदर व्यक्त करत असतो, पण अजूनही आपण या ‘गुरू’ शब्दाची व्युत्पत्ती जाणलीच नाही. ती व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे ः-

गिरती अज्ञानम् इति म्हणजे अज्ञान दूर करतो तो
गुणत्वी धर्मन इति म्हणजे धर्माचा आदर करतो तो
गिर्यते इति म्हणजे ज्याचे स्तवन केले जाते तो

निर्जीव वस्तू फेकण्यासाठी तिला सजीवांची गरज असते, त्याचप्रमाणे कोणते ज्ञान मिळवायचे असेल तर ते ज्ञान देणारा गुरू (मार्गदर्शक) हा लागतोच. (उदा. आता जरी संगणक युग आले तरी संगणक चालवण्याचे ज्ञान देण्यासाठी आपल्याला गुरू तो हवाच.) असे हे गुरू आपल्याला जीवनाच्या मार्गावर पदोपदी भेटतच असतात. म्हणूनच आपण गुरूंचा आदर, गुरूबद्दल श्रद्धा, भक्तिभाव दाखवण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतो. हा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात –

गुरू पूजन म्हणजे ध्येय पूजन
गुरू पूजन म्हणजे सत्याचे पूजन
गुरू पूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन
गुरू पूजन म्हणजे अनुभवाचे पूजन

ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा सागर आणि शांतीचा हिमालय असे गुण गुरूंच्या ठायी असतात. भारतीय शिक्षण पद्धतीत गुरूला असाधारण महत्त्व आहे. असे हे शतकानुशतके चालत आलेले गुरु-शिष्याचे अतूट नाते याद्वारे स्पष्ट होत जाते. आज मात्र गुरुपूजा गुरूवादात परिवर्तित झालेली आहे. मानव अंधश्रद्धा, अज्ञान यांच्या अंधारात आदळत, आपटत आहे. अशा या अंधारात भरकटत असणाऱया समाजाला ज्ञानाचा, संस्कृती आणि परंपरेचा मार्ग दाखवण्याची तेजस्वी भूमिका पार पाडण्याचे महान कार्य करीत आहेत श्रमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद ! शाळेचे संस्थापक कै. यशवंतरावजी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संस्कारांचे महत्त्व पटावे, त्यांच्या मनात गुरूविषयी आदरभाव, प्रेम निर्माण व्हावे, गुरु-शिष्याचे दुरापास्त होत चाललेले नाते अधिक दृढ व्हावे यासाठी सन 1983 पासून सुरू केलेला हा गुरू शिष्यपरंपरेचा भव्य सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा ! आजतागायत या सोहळय़ाची परंपरा सुरू आहे. या दिवशी समाजातील इतर क्षेत्रांत नावाजलेल्या समाजकार्य किंवा शैक्षणिक कार्य केलेल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आमच्या संस्थेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो. असा हा नेत्रदीपक सोहळा दरवर्षी निर्विघ्नपणे व आनंदाने पार पडत असतो.