लेख – म्हाडाच्या जुन्या इमारती, लिफ्टशिवाय जगणार कसे?

>> श्वेता (अर्चना) सावंत

‘म्हाडा’ने 25 वर्षांपूर्वी मुंबईत बांधलेल्या व त्यापैकी काही आताही उत्तम स्थितीत असलेल्या पाच मजली इमारतींना आजपर्यंत ‘म्हाडा’ने लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. आज वयोवृद्ध व्यक्तींना, गंभीर आजारी रुग्णांना अरुंद दहा जिने चढून-उतरून जाताना किंवा व्हीलचेअरवरून नेताना खूप त्रास सहन करावा लागतो. ‘म्हाडा’ने आपले पूर्वीचे धोरण बदलून माणुसकीच्या दृष्टीने, चांगल्या स्थितीत असलेल्या इमारतींना लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिल्यास रहिवाशांना नक्कीच दिलासा मिळेल.

मुंबईत असलेल्या ‘म्हाडा’च्या शेकडो इमारतींपैकी काही 25 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या वेळी इमारतींच्या मजल्यांची संख्या पाचच्या वर नसावी व त्यांना लिफ्टची सुविधाही नसावी असा काहीसा म्हणे ‘म्हाडा’चा नियम होता. तेव्हा इमारतीच्या एका बाजूला खालून वरपर्यंत साधारण 6 बाय 4 फूट चौरसाकृती पोकळ जागा लिफ्टसाठी सोडलेली असली तरी त्या जागेत कधीच लिफ्ट बांधण्यात आली नाही. आजही ती जागा त्या इमारतींमध्ये तशीच आहे. त्यानंतर दहा-बारा वर्षांनी बांधलेल्या ‘म्हाडा’च्या इमारतींच्या मजल्यांची मर्यादा सात व त्याहून अधिक वाढवण्यात आली. त्या इमारतींना लिफ्टची सुविधाही सक्तीने (कम्पल्सरी) करण्यात आली व त्या प्रकारच्या लिफ्टची सोय असलेल्या अनेक इमारती आजपर्यंत म्हाडाने मुंबईत बांधल्या, मात्र म्हाडाच्या 25 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींना ही सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही.

म्हाडाच्या राजीव गांधी अनुदान प्रकल्पातून त्यावेळी बांधण्यात आलेल्या अनेक इमारती आज चांगल्या स्थितीत आहेत. त्या प्रकल्पाच्या राखीव फंडातून दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा फंडही ‘म्हाडा’मार्फत दिला जातो. तसेच आमदार फंड, खासदार फंड यातूनही या इमारतींच्या आतून बाहेरून प्लॅस्टरिंगसाठी, डागडुजीसाठी, मजबुतीकरणासाठी, वॉटरप्रूफिंगसाठी खर्च करण्यात येत असतो. मात्र या इमारतींना लिफ्टची सोय नसल्यामुळे वयोवृद्धांना, गंभीर आजारी व्यक्तींना चौथ्या-पाचव्या मजल्यावरून जिने चढून उतरून जाताना-येताना खूप त्रास सहन करावा लागतो. दरदिवशी बाजारहाट करण्यासाठी, डॉक्टरांकडे उपचारांसाठी जाण्यासाठी, कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असेल तर जिन्यातून चढ-उतर करणे शक्य होत नसल्यामुळे जाणे-येणे टाळावे लागते. अलीकडे सांधेदुखीचा त्रास सर्व वयोगटातील स्त्र्ाया आणि वृद्ध व्यक्तींना होतच असतो. हृदयरुग्ण, गर्भवती स्त्र्ाया, डायलेसिससाठी आठवडय़ातून किमान दोन वेळा रुग्णालय किंवा डायलेसिस सेंटरमध्ये जाणारे रुग्ण, दिव्यांग तसेच अचानक पॅरॅलिसिस किंवा हार्ट अटॅक आलेले रुग्ण यांना तातडीने उपचारासाठी इस्पितळात नेण्यासाठी खुर्ची किंवा व्हीलचेअरमध्ये बसवून तिसऱया-चौथ्या-पाचव्या मजल्यावरून खाली ऍम्ब्युलन्स किंवा टॅक्सीपर्यंत उचलून नेताना शेजाऱयांची काय अवस्था होते हे प्रत्यक्ष तो अनुभव आल्याशिवाय कुणाला कळणार नाही. त्यात अरुंद जिन्यावरून असे चढणे-उतरणे किती तापदायक असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे शक्यतो अगदी अत्यावश्यक असेल (नोकरदार, विद्यार्थ्यांना जावेच लागते.) तरच अशा इमारतींमधील माणसे बाहेर पडतात.

बाजारहाटासाठी आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा बाहेर पडून घाऊक बाजारहाट करणे भाग पडते. ते अवजड सामान घेऊन आल्यावर जिने चढणे हा एक त्रासदायक प्रकार असतो. इमारतीला लिफ्ट नसल्यामुळे नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळीही येण्याचे टाळतात. आजारी रुग्णाला तपासण्यासाठी डॉक्टरही व्हिजीट देण्याचे नाकारतात. एकूण अशा इमारतींवर बहिष्कार टाकण्याची वृत्ती आता बोकाळत चालली आहे. पहिल्या, दुसऱया मजल्यावर राहणाऱया रहिवाशांना जिने चढणे-उतरणे एकवेळ शक्य होते, पण चौथ्या-पाचव्या मजल्यावर राहणाऱया रहिवाशांचे जे हाल होतात याची कल्पना गेल्या पंचवीस वर्षांत ‘म्हाडा’ला यायला हवी होती, पण ते त्या वेळचे त्यांचे नियम आणि कायदे यांच्याकडे बोट दाखवत बसले. कैद्यांना तुरुंगात डांबतात तशी अशा इमारतींमधील रहिवाशांची अवस्था झाली आहे.

म्हणून ‘म्हाडा’ने आपले पूर्वीचे धोरण बदलून 25 वर्षांपूर्वीच्या ‘म्हाडा’च्या ज्या इमारती चांगल्या स्थितीत आहेत त्यांना आता तरी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिल्यास पाच-दहा वर्षे तरी रहिवाशांची मोठय़ा त्रासातून सुटका होईल. आमदार, खासदार वा म्हाडाच्या कोणत्याही फंडातून लिफ्टच्या खर्चाची सोय होऊ शकते. मुंबईतल्या काही इमारतींमध्ये दोन किंवा तीन माणसे राहू शकतील अशा छोटय़ा लिफ्टची सोयही तेथील रहिवाशांनी केली आहे. मात्र जिथे लिफ्ट नाही पण त्याची गरज आहे अशा रहिवाशांची परवानगीसाठी अडवणूक न करता त्यांना सर्व ना हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) ‘म्हाडा’कडून व संबंधित यंत्रणांकडून कशी मिळतील यासाठी माणुसकीच्या भावनेने सर्व यंत्रणांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व राज्य सरकार यांनी लिफ्टची समस्या धसास लावण्यासाठी सहकार्य दिल्यास अशा इमारतींमधील रहिवासी त्यांना मनापासून दुवा देतील.

(लेखिका म्हाडा सोसायटीतील कार्यकारिणी सदस्य आहेत.)