>> शहाजी शिंदे
सायबर गुन्हेगारीच्या विश्वातील आधुनिक ठकसेन नित्यनवे मार्ग अवलंबत आहेत. सध्या डिजिटल हाऊस अरेस्ट या घातक प्रकाराने अनेकांना भयभीत करून मोठय़ा रकमेचा गंडाही घातला आहे. एका ज्येष्ठ डॉक्टरला डिजिटल हाऊस अरेस्ट करण्यात आले आणि त्यांची 45 लाखांची फसवणूक झाली. इंदूरच्या एका जोडप्याला 53 तासांपर्यंत हाऊस अरेस्ट करण्यात आले आणि लाखो रुपये उकळले. वाराणसीत तीन दिवस डिजिटल हाऊस अरेस्टच्या माध्यमातून एकाचे 28.75 लाख रुपये हडपले. दुसरीकडे ब्राऊजर एक्स्टेशनच्या डाऊनलोडिंगच्या माध्यमातूनही सायबर गुन्हे घडवून आणले जात आहेत.
संशोधकाच्या एका पथकाने अलीकडेच जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक तयार केला. यात सायबर गुह्यांच्या बाबतीत भारत दहाव्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. या निर्देशांकात शंभर देश असून त्यानुसार सायबर गुह्याच्या बाबतीत रशिया आघाडीच्या स्थानावर आहे. त्यानंतर युक्रेन, चीन, अमेरिका, नायजेरिया, रोमानिया आणि उत्तर कोरियाचा नंबर लागतो. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतात 30 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक झाली आहे आणि गेल्या दशकात भारतीय बँकांत फसवणुकीचे 65017 गुन्हे दाखल झाले आहेत. हे आकडे झोप उडविणारे आहेत. भारतात सायबर गुह्यांची व्याप्ती वाढली असून त्याचे वेगवेगळे स्वरूपही दिसत आहे. हॅकर्स, सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी दररोज नवनवीन फंडे वापरत आहेत आणि गुन्हा तडीस नेत आहेत. आताची फसवणुकीची नवीन पद्धत ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’ आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. उदा. 11 मे रोजी एका ज्येष्ठ डॉक्टरला डिजिटल हाऊस अरेस्ट करण्यात आले आणि त्यांची 45 लाखांची फसवणूक झाली. 15 एप्रिलला इंदूरच्या एक जोडप्याला 53 तासांपर्यंत हाऊस अरेस्ट करण्यात आले आणि लाखो रुपये उकळले. सहा जुलै रोजी वाराणसीत तीन दिवस डिजिटल हाऊस अरेस्टच्या माध्यमातून निहार पुरोहितांचे 28.75 लाख रुपये हडपले.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी दक्षता हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे कॉल किंवा मेसेज येतात तेव्हा विचारपूर्वक विचार करा आणि त्याची तक्रार करा. अशी सायबर फसवणूक आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सरकारने अलीकडे ‘संचार साथी’ वेबसाइटवर चक्षू पोर्टल सुरू केले आहे. याशिवाय तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला तक्रार करू शकता.
अलीकडच्या काळात कॉल फॉरवार्ंडगच्या माध्यमातून सायबर गुन्हे करणाऱ्यांच्या घटनांत उल्लेखनीय वाढ झाली आहे. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना कॉल फॉरवर्डिंगची सुविधा देतात आणि त्यानुसार कॉल किंवा एसएमएस फॉरवर्ड केला जातो. या सुविधेचा वापर मीटिंग किंवा आवश्यक कामात बिझी असताना केला जातो. या आधारावर एकही कॉल मिस होऊ नये, अशी अपेक्षा असते, पण हॅकर या सुविधेचा गैरफायदा उचलतात. या माध्यमातून स्कॅमर कॉल केला जातो आणि समोरील व्यक्तीला टेलिकॉम प्रोव्हायडर कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले जाते. आपल्या नेटवर्कमध्ये इश्यू असल्याचे खोटे सांगितले जाते. ही समस्या दूर करण्यासाठी स्टार 401 हॅशटॅग नंबर डायल करा, अशी सूचना करतात. ग्राहकही फसव्या कॉलला बळी पडतात. हा नंबर डायल केल्यानंतर ग्राहकांना अनोळखी नंबरवर कॉल करण्यास सांगितले जाते. याप्रमाणे ग्राहकाने कॉल करताच त्याचे सर्व कॉल आणि मेसेज हे स्पॅमरकडे पोचतात आणि सायबर गुन्हा घडवून आणला जातो. गुगल सर्चवर सातत्याने लोकांकडून अनेक प्रश्नांचे उत्तर शोधण्यात येते. युजरची हीच मानसिकता ओळखून ठकसेन गुगल पे, फोन पे, पेटीएमच्या नावाखाली म्हणून आपला नंबर इंटरनेटवर शेअर करतात. त्यामुळे काही मंडळी या फसव्या नंबरला बळी पडतात आणि अडकतात.
आता तर ब्राऊजर एक्स्टेन्शच्या डाऊनलोडिंगच्या माध्यमातूनही सायबर गुन्हे घडवून आणले जात आहेत. ही फसवणूक उपकरणात व्हायरस सोडून करण्यात येत आहे. सार्वजनिक चार्जर पोर्टच्या माध्यमातून मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये व्हायरस येतो. क्रोम, मोझिला आदी ब्राऊजरवर केलेले ऑनलाइन व्यवहार ब्राऊजरच्या सर्व्हरमध्ये सेव्ह होतात. अर्थात ते सेटिंगमध्ये जाऊन डिलिट करण्याची आवश्यकता असते. मात्र काही जण पंटाळा करतात. त्याचा फायदा सायबर गुन्हेगार उचलतात. फिशिंगच्या माध्यमातून एखादी मोठी किंवा प्रसिद्ध कंपनी किंवा युजरच्या कंपनीचे खोटे संकेतस्थळ तयार केले जाते. त्याचे स्वरूप अगदी खऱया संकेतस्थळाप्रमाणे भासू लागते. यावर महागडय़ा वस्तू मोफत देण्याचे आमिष दाखविले जाते. शिवाय मोबाईलचे प्रस्थ वाढल्याने हॅकर्स मेसेज किंवा व्हॉटस्अॅपच्या माध्यमातूनही व्हायरसयुक्त मेसेज पाठवतात. हॅकर्सने सोडलेले मालवेअर संगणक, मोबाईल, टॅबच्या इन्स्टॉल सॉफ्टवेअरचे नुकसान करण्याबरोबरच युजरची आर्थिक माहिती, जसे डेबिट किंवा व्रेडिट कार्डचे विवरण, पासवर्ड, ओटीपी, मोबाईल नंबर, पत्ता, बँक खाते क्रमांक, जन्म तारीख चोरतात. याचा थांगपत्ता युजरला लागत नाही. त्याच्या ई-मेल खात्यावर बनावट मेलदेखील पाठविला जातो आणि त्या माध्यमातून फसवणूक करण्याबरोबरच संवेदनशील माहितीदेखील समाजकंटक लोकांपर्यंत पोचवली जाते. या मदतीने सामाजिक प्रतिष्ठेलादेखील धक्का लावला जातो.
आजकाल सायबर गुन्हेगार फोन कॉल्स किंवा मेसेज करत कर्ज घेतलेले नसतानाही लोकांना कर्जदार असल्याचे सांगत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करत आहेत. अशा प्रकारची खंडणी वसुलीची रक्कम ही साधारणपणे दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत राहू शकते. जेणेकरून आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेले लोक पोलिसांकडे जाणार नाहीत. कर्ज वसुलीचे एजंट लोकांना धमकी देतात. तुम्ही आमच्याकडून कर्ज घेतले असून दोन-तीन दिवसांत पैसे दिले नाही तर आपले आक्षेपार्ह पह्टो सोशल मीडियात व्हायरल केले जातील, असे सांगितले जाते. आपल्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना ते फोटो पाठविले जातील, असे म्हणत त्याचा पुरावा म्हणून ते मॉर्फ्ड फोटो आणि व्हिडीओ युजरला पाठवतात. एकुणातच मोबाईल अॅपच्या माध्यमातून कर्ज घेणे हे सावकारांपेक्षा अधिक धोकादायक राहू शकते.
अनेकदा कर्ज वसूल करणारे एजंट केवळ पैसेच उकळत नाहीत, तर युजरची बदनामी करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. शेवटी खबरदारी हाच योग्य उपाय आहे. ब्राऊजिंग करताना संशयास्पद पॉपअपपासून सावध राहिलात, संकेतस्थळ किंवा मोबाईल किंवा सार्वजनिक लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर कार्डची माहिती शेअर केली नाहीत, अनोळखी नंबर किवा मेलने आलेल्या अटॅचमेंटला तत्काळ डिलिट केलेत आणि ऑनलाइन लॉटरी, कॅसिनो, गेमिंग, शॉपिंग किंवा फ्री डाऊनलोड असणाऱया मेसेजकडे दुर्लक्ष केलेत तर फिशिंग मेल किंवा मेसेज किंवा व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून फॉरवर्ड होणाऱया संशयास्पद हायपर लिंकच्या जाळ्यात अडकणार नाहीत. सततच्या वाढत चाललेल्या या प्रकरणात सजगपणा हाच बचाव करू शकतो. आमिषाला बळी पडू नका. कारण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे. मानसशास्त्रीय दबावाला घाबरू नका. धमकी आल्यास पोलिसांची मदत घ्या. या जोरावरच सायबर गुन्हेगारांपासून वाचू शकतो.
(लेखक संगणक तज्ञ आहेत.)