खाऊगल्ली – श्रीगणेशाचा वेगळा नैवेद्य

>> संजीव साबडे

गणपती बाप्पाला फक्त मोदकच लागतात वा ठरलेले प्रकारचे नैवेद्य म्हणून दाखवायचे असे काही नाही. सर्व गोड पदार्थ गणेशोत्सवात नैवेद्य आणि खिरापत वा प्रसाद म्हणून चालतात. फक्त दूध फोडून केलेले पदार्थ कुठेही नैवेद्य म्हणून ठेवत नाहीत.

श्रीगणरायाचे आगमन या आठवडय़ाच्या अखेरीस होत आहे. त्याची तयारी, आनंद आणि जल्लोष सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे श्री गणेशाची मूर्ती काहींच्या घरी वा मंडपात स्थानापन्न होईल आणि मग श्री गणेशाला रोज काय नैवेद्य दाखवायचा याची चर्चा सुरू होईल. पहिल्या दिवशी मोदक ठरलेले. काही ठिकाणी उकडीचे, तळणीचे वा विकत आणलेले माव्याचे मोदक. काहीजण आधीच सांगतात की, अमुक दिवशी आमच्याकडून नैवेद्य. मग उरलेल्या दिवसांचा विचार. पेढे येतातच. मग खीर, श्रीखंड, बासुंदी, बुंदीचे लाडू, मोतीचुराचे लाडू, नारळीभात, पुरणपोळी, हलवा अशा गोड पदार्थांची चर्चा होते. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर हे पदार्थ जातात आपल्याच पोटात. त्यामुळे बाप्पांच्या निमित्ताने हे गोडधोड पदार्थ बनतात वा आणले जातात. गणपतीला मोदक आवडतात हे आपणच ठरवलं. मग कथा जोडली. एकदा भगवान शंकर झोपले होते आणि मला उठवू नये, असं त्यांनी गणपतीला सांगितलं होतं. त्याच वेळी शंकराला भेटण्यास परशुराम आले. गणपतीने त्यांना अडवलं. त्यामुळे दोघांत युद्ध झालं. त्यात गणपतीचा एक दात पडला. त्यामुळे या एकदंताला खाता येईल असा मऊ व आवडणारा गोड पदार्थ देण्यात आला. तो पदार्थ म्हणजे मोदक.

श्री गणेशाला म्हणे 21 मोदक लागतात. पण रोज फक्त 21 मोदक? त्याऐवजी नैवेद्य बदलत जातो. पूर्वी लोकांकडे फार पैसे नसल्याने नैवेद्य म्हणून केळीचं शिकरणही चालायचं. कधी कधी गूळ आणि शेंगदाणे किंवा रव्याचे वा पिठाचे लाडू असायचे नैवेद्यात. काही वेळा गणपतीला पेरू आवडतो म्हणून एखादा पेरूच नैवेद्य म्हणून ठेवला जाई. पुढे खिशात पैसे आले आणि गणरायाच्या नावाने मोदक, बासुंदी, श्रीखंड, बर्फी, लाडू याद्वारे स्वतचे आणि मुलांचे लाड सुरू झाले. महाराष्ट्रात पेढे व मोदक पूर्वापार, पण अन्य राज्यांत ही मिठाई लोकप्रिय नव्हती वा बनवत नसत. त्यामुळे तिथे गणेशाचा नैवेद्यही बदलला. उत्तर हिंदुस्थानात नैवेद्याला ‘भोग चढाना’ म्हणतात. आता हिंदुस्थानातील सर्व मुख्य शहरांत सार्वजनिक वा घरगुती गणेशोत्सव असतो. तिथे ‘हाथ लिये गुड लड्डू’प्रमाणे गूळ लाडू यांचा भोग चढवला जातो.

दिल्ली व उत्तर हिंदुस्थानात सुका मेवा वा त्याची मिठाई, गजक, तिळाचे लाडू, चुरमा लाडू किंवा आग्य्राचा प्रसिद्ध केसरी रंगाचा पेठा नैवेद्य असतो. तिथे दुधाची मिठाई किंवा मसाला दूध हाही असतो आणि बरेच जण जिलबीचा भोग गणपती बाप्पाला चढवतात. त्यामुळे मुंबईतील उत्तर हिंदुस्थानीही हाच नैवेद्य दाखवतात आणि मुंबईत तो सहज मिळतो. पंजाबमध्ये गूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला गुड पारे, आटा पिन्नी म्हणजे गव्हाचे लाडू, बेसन बर्फी हे पदार्थ नैवेद्य म्हणून असतात. मध्य प्रदेशात माव्याची जिलबी, चारोळीची बर्फी, मावा बाटी यांचा भोग चढवतात. मुंबईत चारोळीची बर्फी व मावा बाटी अपवादानेच मिळते. गुजरातमध्ये काजू कतली, मोहनथाळ, वेगवेगळे मोदक, गुलाबजाम, घारी या मिठाया नैवेद्यमध्ये असतात. बंगालमध्ये गणरायाला रसमलाई, गुलाबजाम, राजभोग आणि बर्फी यांचा भोग चढवतात.

ओडिशामध्ये मालपोआ, गोड भात व खीर, सागर हे पदार्थ नैवेद्यात असतात. आपल्याकडे गोड भात, नारळीभात व खीर यांचा नैवेद्य असतोच. मालपोआ मात्र नसतो. तामीळनाडूमध्ये नैवेद्य म्हणून तांदळाचं पीठ, खवलेला नारळ आणि गूळ यापासून कोळईकट्टई नावाचा जो प्रकार बनवला जातो तो आपल्या उकडीच्या मोदकासारखाच असतो. आकार मात्र मोदकासारखा नव्हे, तर गोल असतो. तामीळनाडूच्या कर्नाटकला लागून असलेल्या भागात म्हैसूर पाक लोकप्रिय आहे. तेथील म्हैसूर पाक अजिबात कडक नसतो. बर्फीसारख्या अतिशय मऊ म्हैसूर पाकला लवंगेचाही स्वाद असतो. तसाच दुसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे जिलबी. तंजावर, कोईम्बतूर इथे तेनाली जिलबी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिथे नैवेद्यात स्थानिक, प्रसिद्ध व लोकप्रिय जिलबीही असते.

कर्नाटक, आंध्र प्रदेश (आणि आता तेलंगणाही) महाराष्ट्राला लागून असलेली राज्ये आहेत. भाषा वेगळ्या असल्या तरी तेथील खाद्यसंस्कृती व काही सण बरेच महाराष्ट्रासारखेच आहेत. कर्नाटकच्या बेळगाव, विजापूर, दावणगिरी आणि बागलकोटपासून बंगळुरू व तुमकूरपर्यंत गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसतो. आंध्र प्रदेशात गणेश चतुर्थीला गणेश चवथी म्हणतात. तिथे बेल्लम कुडुमुलू आणि बेल्लम उंडरुलू हे गोड प्रकार हमखास केले जातात. कुडूमुलू हा रवा, गूळ आणि चणा डाळ यापासून बनवतात. रव्याची उकड करतात, ती करतानाच चणा डाळ घालतात आणि उकड ताटात पसरून त्यात गूळ घालून त्याला आकार देतात. त्याचा आकार लाडुसारखाच असतो. बेल्लम उंडरुलू बनवण्यासाठी तांदळाचं पीठ, खवलेला नारळ आणि गूळ लागतो. म्हणजे उकडीच्या मोदकाला लागतात तेच प्रकार. मात्र यांचा आकार मोदकासारखा नव्हे तर लाडू वा इडलीसारखा असतो. मात्र यात उकड असतेच. कर्नाटकात उकडीच्या मोदकासारखा, पण आकार आपल्या दिंडासारखा असलेला कडुबू नैवेद्यात असतो. त्याला करंजीचा आकारही देऊन कधी उकडतात, कधी तळतात. म्हणजे पातोळ्या किंवा ओल्या नारळाची तळलेली करंजी. त्याला कराजगाई वा कराजकाई म्हणतात. माटुंगा, चेंबूर व सायनमधील मोजक्या दाक्षिणात्य दुकानात हे पदार्थ मिळतात.

केरळमध्ये नैवेद्यासाठी तांदूळ, गूळ, नारळाचे काप यापासून उनियप्पम बनवतात. उनिअप्पम मुंबईत सहज मिळतो. काही भाजी बाजारांतल्या केरळी लोकांच्या छोटय़ा दुकानांमही मिळतो. म्हणजे गणपती बाप्पाला फक्त मोदकच लागतात वा ठरलेले प्रकारच नैवेद्य म्हणून दाखवायचे, असं काही नाही. सर्व गोड पदार्थ गणेशोत्सवात नैवेद्य आणि खिरापत वा प्रसाद म्हणून चालतात. फक्त दूध फोडून केलेले पदार्थ कुठेही नैवेद्य म्हणून ठेवत नाहीत. दुधाच्या इतर मिठाया मात्र चालतात.

[email protected]