मोनेगिरी- तांबडा वाळिंबे

>>संजय मोने
त्याची ओळख झाल्यापासून मी त्याला ‘तांबडा वाळिंबे’ याच नावाने जाणतोय. त्याला ‘तांबडा’ हे नाव कसं पडलं याचा इतिहास अगदी देवगिरीच्या यादव साम्राज्याचा ऱहास कसा झाला इतका रंजक नसला तरी मजेशीर आहे. तांबडाचं घर परंपरेने संपूर्ण शाकाहारी. त्याच्या या शाकाहारवादाची मित्रमैत्रिणींकडून होणारी चेष्टा त्याला नवे नाव देऊन गेली हे मात्र खरे!

या माणसाचं नाव नेमकं काय ते मला माहीत नाही, त्याची ओळख झाल्यापासून मी त्याला ‘तांबडा वाळिंबे’ याच नावाने जाणतोय. हा तांबडा मूळचा कोल्हापूरचा रहिवासी (तो त्या शहराचा उच्चार ‘कोलापूर’ असा करतो. तसे मूळ नाव आणि उच्चारी नाव यात कायम फरक असतोच आणि तो उच्चारी फरक मुख्यत तिथल्या मूळ रहिवाशांकडून केला जातो. उदा. गुहागरचा ‘ग्वाहगर’, सिंधुदुर्गचा ‘सिंदुर्ग’ किंवा अहमदाबादचा ‘अमवाबाद’). त्याला ‘तांबडा’ हे नाव कसं पडलं याचा इतिहास अगदी देवगिरीच्या यादव साम्राज्याचा ऱहास कसा झाला इतका रंजक नसला तरी मजेशीर आहे. तांबडाचं घर परंपरेने संपूर्ण शाकाहारी. अंडेसुद्धा त्याच्या घरात निषिद्ध, पण हा सगळ्यात वेगळा आणि त्याला कारण त्याला बालपणापासून लाभलेली मांसाहारी मित्रांची संगत. सगळे एकजात मराठा मित्र, त्यांच्यात मांसाहार न करणं म्हणजे घराण्याचं नाव बुडवल्यासारखं पाप. शाळेत असताना तांबडा घरून डबा घेऊन शाळेत जायचा. रीतसर पोळी-भाजीचा डबा, भाज्याही ठरलेल्या, साध्यासिध्या. वांग्याची भाजी, तीही गोड, गूळ-चिंच घालून केलेली, मंद, कमी तिखट वगैरे. शाळेत असेपर्यंत त्याच्या जेवणाचा कुठे बभ्रा झाला नाही. कारण शाळेत पाच-सहा तास जायला लागायचे. शाळा सकाळी असायची. दुपारी अकरा वाजता मधली सुट्टी… अर्ध्या तासाची. त्यात खाणं खाऊन मस्ती करायची प्रथा होती. त्यामुळे अत्यंत घाईघाईने डबा संपवायला लागायचा.

…पण महाविद्यालयात गेल्यावर सगळं बदललं. जास्त वेळ, जास्त विषय, जास्त तास. मस्ती करायचा काळ संपला होता. शिवाय डबा घेऊन जायला संकोच वाटायचा. वेष बदलला होता. म्हणजे गणवेश नाही, मनाजोगते कपडे परिधान करायला मिळायचे. शिवाय महाविद्यालयात मुलं आणि मुली होत्या. म्हणजे त्या तशा शाळेतही होत्या, पण ‘वर्गभगिनी’ होत्या सगळ्या. आता ते उपनाव हद्दपार झालं होतं. त्याची जागा आता ‘मैत्रिणी’ या उपनामाने घेतली होती. आता मधेमधे तास नसायचे. त्यामुळे फावला वेळ मिळायचा, त्यात गप्पा व्हायच्या. इतर अनेक विषयांबरोबर खाणे-पिणे (पिणे म्हणजे ‘ते’ नव्हे, कारण पहिलंच वर्ष होतं.) हाही विषय असायचा. बाकी सगळे घरी बनवले जाणारे चिकन, मटण, कोलंबी, खेकडे, कलेजी या सगळ्या पदार्थांवर बोलायचे. तांबडा वाळिंबे एकदा त्या गप्पांत सामील झाला आणि स्वतच्या घरच्या जेवणाबद्दल बोलला.

आंबाडीची कण्या घालून केलेली भाजी, टोमाटो-बटाटा रस्सा, वाटाण्याची उसळ यांचं रसभरीत वर्णन त्याने केलं (रसभरीत अशासाठी की, या सगळ्या भाज्या रस्सेदार होत्या). त्याचं वर्णन त्याच्या मित्रांनी आणि नव्या नव्या झालेल्या मैत्रिणींनी अर्ध्यावर थांबवून त्याची चेष्टा करायला सुरुवात केली. मित्रांचं एवढं काही नाही, पण नव्या, ताज्या मैत्रिणी चेष्टा करताहेत हे त्याच्या जिव्हारी लागलं, पण करणार काय? त्या टोळक्यात काही जैन मित्रही होते, पण त्यांना कोणी काहीच बोलत नसायचे. कारण त्यांच्या केसेस इतरांच्या मते हाताबाहेर गेल्या होत्या. त्या मैत्रिणींपैकी एक प्रिया नावाची होती. ती तांबडा वाळिंबेला आवडायची. तीही त्याच्या जेवणाचं वर्णन ऐकून फिस्सकन हसली.

“काय आहे त्यात हसण्यासारखं? आम्ही घरी खातो ते अन्न नाही काय?’’ त्याने रागाने चिडून विचारलं. आवडत असली म्हणून काय झालं? त्याच्या घरी आई आणि काकू स्वयंपाक करायच्या. त्या अन्नाला नावं ठेवणं हा त्या दोघींचा अपमान होता. असलेली आई आणि काकू कदाचित होणाऱया प्रेयसीपेक्षा त्याला महत्त्वाच्या वाटल्या.
“तसं नाही, पण तू सांगितलंस ते सगळं आम्हाला श्रावण महिन्यात नाईलाज म्हणून का होईना, पण खावं लागतं, पण आम्ही खातो ते तू कधीच खाऊ शकणार नाहीस. तो तुझा रस्साबिस्सा तुला कितीही चांगला वाटला तरी आमच्या तांबडय़ा आणि पांढऱया रश्शाची. त्याची तुलनाच होऊ शकत नाही.’’ तांबडय़ा वाळिंबेच्या मनात असलेल्या प्रिया देशमुख नावाच्या मैत्रिणीने घाव घातला. तरीही तांबडा हलला नाही. आई आणि काकूचा मायापाश त्याला तोडता येत नव्हता.
“हे बघ प्रिया! गंमत अशी आहे की, वर्षातल्या एका महिन्यासाठी तुला तुझा मांसाहारी आहार बंद करावा लागतो. मला तसं कधीच करावं लागत नाही. मग आता सांग, तुमचा सगळ्यांचा आहार श्रेष्ठ की माझा?’’ प्रिया हातातून गेलीच आहे, तर मग जाता जाता वार करावा आणि आपली आवड शहीद करावी या निर्वाणीच्या क्षणावर तांबडा वाळिंबे आला होता.
“यार, तुम्ही कशाला उगाच भांडण करता? जेने जेऊ खाऊ होय तेने तेवू…’’
नागेश वसा नावाचा त्यांचा मित्र वाद मिटवायला म्हणून सामोपचाराची भाषा बोलायला लागला.
“तू गप रे नाग्या! तू कांदा, लसूण, बटाटा आणि इतर पदार्थ खातोस?’’ तांबडा आता अंतर्बाह्य पेटून उठला होता.
“आमची वातच अलग छे! जिमिनीच्या आत उगवणारं आम्ही खात नाही. पाप लागे छे!’’ वसाने सांगितलं
“हो का? जमिनीच्या आतलं नाही चालत? मग पाणी कसं पिता? की पावसाळ्यात अख्ख्या वर्षाचा साठा तोंडात करून ठेवता? च्यायला! एकदा हे आणि दुसऱयांदा ते असा कसा आहार तुमचा सगळ्यांचा? आम्ही बघा! वर्षभर तेच आणि तेच खातो!’’ तांबडा आता निर्वाणीच्या स्वरात म्हणाला.
“हे बघ! खुल्ला सांगते, तू मला आवडतोस, जबरा आवडतोस. लग्न करशील का माझ्याशी? असं विचारलंस तर मी होकार देईन, पण लग्नानंतर मी तुझ्याकडे येऊन भातभाजी खाणार नाही.’’ प्रियाने तांबडाला सरळ प्रस्ताव दिला.
“आयला! अजून काय पाहिजे तुला? सगळे जिच्यावर मरतात, साला आपल्यातलेसुद्धा काही, ती तुला सांगते आहे. अरे, हो म्हण! काय आहे, प्राण्यांना जीव असतो तसाच वनस्पतींनाही असतो. तेव्हा हत्याबित्या सोड, अंडे खायला सुरुवात कर. मग हळूहळू चिकन, मग मटण, मग मासे…सगळं होऊन जाईल. वाळिंबे! आता मागे हटू नकोस!’’ सगळ्या मित्रांनी गलका केला.
“ठीक आहे, आपण पैज लावू या! प्रिया, तू सांगशील तो मांसाहारी पदार्थ मी खाणार आणि मी सांगेन तो शाकाहारी पदार्थ तू खायचास. तू जिंकलीस तर मी आयुष्यभर मांसाहार करणार आणि मी जिंकलो तर तू शाकाहारी.’’
वाळिंबेचं वाक्य पूर्ण होण्याआधी सगळ्या टोळक्याच्या आवाजात पैज लागली.

वाळिंबे तांबडा रस्सा पिणार आणि प्रिया अळूची पातळ भाजी पिणार असं ठरलं. एका मित्राच्या घरी पैजेचा समारंभ ठरला. सगळे जमले. दोघांसमोर वाटय़ा ठेवण्यात आल्या. टाळ्यांच्या गजरात पैज सुरू झाली. सुमारे अर्ध्या तासानंतर प्रियाने अळूच्या भाजीची वाटी खाली ठेवली. तांबडा वाळिंबे तांबडा रस्सा पितच राहिला आणि पैज जिंकला. त्या दिवसापासून त्याला ‘तांबडा वाळिंबे’ असं सगळे म्हणायला लागले.

आता प्रिया आणि वाळिंबे लग्न करून संसारात स्थिरस्थावर झाले आहेत. मुलं परदेशात शिकत आहेत. नवरा-बायकोत वाद सुरू असतात. रोजच्या रोज आणि ते कशावरून, तर घरात स्वयंपाक काय करायचा यावरून. प्रियाला शाकाहारी हवं असतं आणि वाळिंबे म्हणतो, इतर काहीही असू दे, ताटात तांबडा रस्सा पाहिजेच.

[email protected]