>> संदीप वाकचौरे
विद्यार्थी हा उद्याच्या भविष्याचा आधार मानला जातो. कार्यकुशल, गुणवान आणि बुद्धिवान विद्यार्थ्यांची पिढी ही राष्ट्राची संपत्ती असते. ही पिढी घडविण्याचे काम वर्षानुवर्षे शिक्षक, गुरुजन करत असतात आणि आपले योगदान देत असतात. आज बदलत्या काळात शिक्षक, आईवडील यांच्या बरोबरीने मोबाईल नावाचा नवा वाटाड्या मुलांच्या आयुष्यात आला आहे. डिजिटलायझेशनच्या या युगात नर्सरीला शाळेत प्रवेश घेतल्यापासून मुलांना यूटय़ूबसारख्या माध्यमातून नवनवीन शिक्षण दिले जात आहे, पण त्यातून ज्ञान संपन्नता, आकलन क्षमता, विषयांची समज, शिकण्याची प्रक्रिया यांवर सकारात्मक परिणाम होत आहेत का?
सध्या जगभरात शिक्षण प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर वेगाने बदल घडत आहेत. कालपरवापर्यंत शिक्षणाचा विचार केला जात असताना राज्य, राष्ट्रापुरता विचार केला जात होता. आता त्या सीमा गळून पडल्या आहेत. शिक्षणाचे स्वरूप आता जागतिक बनते आहे. शिक्षणासाठी विद्यार्थी एका देशातून दुसऱ्या देशात जात आहेत. कधीकाळी शिक्षणप्राप्तीचे स्रोत अत्यंत मर्यादित स्वरूपाचे होते. आरंभी केवळ मुखोद्गत असणारे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात होते. गेल्या काही शतकांत शिक्षण प्रक्रियेसाठी पुस्तके केंद्रस्थानी आली. त्या माध्यमातून माहितीची देवाणघेणाव करत शिक्षण सुरू झाले. जगातील विविध विषयांची संशोधने पुस्तकांच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवणे घडू लागले. पुस्तकांची भाषा केंद्रस्थानी आली आणि त्यामुळे माहितीची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण करणाऱया भाषेला ज्ञानाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले.
पुस्तकांचा अभ्यास म्हणजे ज्ञानाची प्रवासवाट. पुस्तकांचे वाचन म्हणजे अभ्यास आणि तेच शिक्षण असे स्वरूप प्राप्त झाले. आता जगभरात ज्ञानाचे, माहितीचे स्रोत बदलत चालले आहे. इंटरनेट म्हणजेच आंतरजालामुळे विद्यार्थ्यांना हवी ती माहिती क्षणात उपलब्ध होऊ लागली आहे. माहितीचे अनेक स्रोत पडताळून विद्यार्थी त्या माध्यमातून आपली शिक्षणाची वाट चालू पाहत आहेत. एकंदरीत काय, तर आज शिक्षण जणू माहिती तंत्रज्ञानाशीच नाते सांगू लागले आहेत.
कालपरवापर्यंत ग्रंथालय, पुस्तके, तज्ञांशी चर्चा, विविध स्वरूपाच्या व्याख्यानांभोवती दिसणारा विद्यार्थी आता नव्या ज्ञानस्रोतांशी जोडला जाऊ लागला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने ज्ञान, माहिती जगभरात सहजतेने पोहोचवणे सहजसुलभ झाले आहे. सध्या घराघरांत भ्रमणध्वनी, आंतरजाल आणि त्या माध्यमातून सहजतेने पृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होईल अशा प्रकारचे तंत्रज्ञान हाती आले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण प्रक्रियेतही होऊ लागला आहे. अर्थात जगात नवे काही आले की, त्याचा स्वीकार करणे अपरिहार्यच असते. नव्या तंत्रज्ञानामुळे लाखो पानांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा ज्ञानाचा खजिना सहजतेने उपलब्ध होऊ लागला आहे. जगभरातील पुस्तके सहजतेने मिळू लागली आहेत. आता माहिती संकलनाचे आव्हान नाही, तर त्या माहितीचे विश्लेषण, चिकित्सकतेने जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुळात ही साधने वापरणे हे वर्तमानात आव्हानात्मक नाहीच; विद्यार्थी सहजतेने ती वापरत आहेत, पण या तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान मिळवणे, अभ्यासासाठी होण्याऐवजी परीक्षेत कॉपी करण्यासाठी किंवा वर्गातील गृहपाठ, प्रात्यक्षिक कार्यासाठी तयार उत्तरे मिळविण्यासाठी अधिक होऊ लागला आहे. अगदी इंजिनीअरिंगचे विद्यार्थीदेखील आज एआयच्या माध्यमातून प्रोजेक्ट सादर करत आहेत. अभ्यास करण्याऐवजी चॅटजीपीटीच्या माध्यमातून तयार उत्तरे शोधून ती नोंदविण्यात विद्यार्थी आघाडी घेत आहेत. ही बाब धोक्याची आणि चिंतेची आहे.
मुळात विद्यार्थी हा ज्ञानपरायण असायला हवा आणि ज्ञान हे सेवापरायण असायला हवे असे म्हटले जाते. ज्ञानासाठी साधनेची वाट हवी. पूर्वी ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थी कितीतरी मोठय़ा प्रमाणात संघर्ष करत होते. तासन्तास ग्रंथालयात बैठक मारणे, तज्ञांशी चर्चा करणे, विविध स्रोतांमधून ज्ञानापर्यंत पोहोचणे घडत होते. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे वाचन, चिंतन, मनन घडत होते. शिक्षणातून विद्यार्थी घडविण्याची ती वाट होती. आज नवतंत्रज्ञानाचा उपयोग करत तयार उत्तरेच मिळू लागल्याने वाचणे,अभ्यास करणे, शोधणे, चिंतन-मनन करणे या शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या पायऱ्या थेट वगळल्या जात आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर, आकलन क्षमतेवर, ज्ञान संपादनाच्या उपजत नैसर्गिक गुण वैशिष्टय़ावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे.
राज्य सरकारच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून कॅटची परीक्षा घेतली जात आहे. त्या प्रश्नपत्रिका सरकार शाळांपर्यंत पोहोचवते आहे. मात्र त्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विविध समाज माध्यमांतून प्रसारित होत आहेत. अधिक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या प्रश्नांची तयार उत्तरे मिळवून देण्याची व्यवस्था आंतरजालाच्या मदतीने सहज उपलब्ध आहे. यातून विद्यार्थी मार्क मिळवतील, पण त्या शिक्षणातून परिवर्तनाची वाट कशी चालणार ? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, 2005 मध्ये प्रोफेसर यशपाल यांनी म्हटले होते की, आज उपलब्ध असणाऱया माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग शिक्षणात करायचा असेल तर सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांपेक्षा अधिक गुणवत्तेच्या शिक्षकांची गरज असणार आहे.
मुळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हाती असणारे हे दुहेरी शस्त्र आहे. या शस्त्राच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपुढे नेमके काय वाढून ठेवत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. शिक्षणात कस लावणारी प्रक्रिया नवतंत्रज्ञानाने सुलभ करून दिल्यामुळे अभ्यासाची वृत्ती कमी होत आहे. जगातील संशोधन हे सांगत आहे की, अतिरिक्त प्रमाणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमधील तार्किक क्षमता घटते आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाच्या वापराने मार्प मिळतील मात्र, बौध्दिक विकासाचा आलेख उंचावेल का, हे सांगणे कठीण आहे. तंत्रज्ञानाचे फायदे लाख असले तरी त्यामुळे माणसाचे अवलंबित्व वाढते, ही वस्तुस्थिती आहे. मोबाईल पह्न येण्यापूर्वी असंख्य लोकांना 30-40 जणांचे फोन नंबर तोंडपाठ असायचे. आज असे किती जण आपल्याला दिसतात? तंत्रज्ञानावरचे हे अवलंबित्व किती धोकादायक ठरू शकते, हे मध्यंतरी मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10 प्रकरणावरून जगाने पाहिले आहे. अशा स्थितीत एआय, अॅलेक्सा, चॅटजीपीटी यांचा अधिकाधिक वापर करण्यात तरबेज असणाऱ्या मुलाविषयी अभिमान बाळगायचा की पाठय़पुस्तकांच्या आधारे इंटरनेटवरील माहितीच्या आधारे स्वयंअध्ययन करून स्वतःच्या बौद्धिक क्षमतेने उत्तरे देणारा विद्यार्थी सरस मानायचा, याचा विचार पालकांनी करायला हवा.
एक मूलभूत गोष्ट कधीही विसरता कामा नये की, शिक्षण म्हणजे केवळ माहिती नाही, तर विचारांची दृष्टी देणे आहे. शिक्षणातून मूल्यांची पेरणी जशी आवश्यक आहे त्याप्रमाणे अलीकडच्या कालखंडात माहिती तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने नवमूल्य, तंत्रज्ञानाशी संबंधित शिष्टाचारांचा विचारही रुजवावा लागणार आहे. यासाठी शिक्षकांनादेखील ही साधने वापरणे आणि त्यासंबंधीच्या अध्यापनशास्त्राचा विचार करावा लागणार आहे. स्क्रीन टाईम आणि अध्ययन या संशोधनाचाही विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञान वापराबाबत समुपदेशन करण्याची गरज आहे. विद्यार्थी म्हणून निरंतर अध्ययनाची साधना आणि समग्र विकासाची वाट कधीच हरवता कामा नये हाच आजच्या विद्यार्थी दिनानिमित्तचा आपला संकल्प असायला हवा.
(लेखक ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आहेत.)