सृजन संवाद – कथा वेदवतीची

>> डॉ. समिरा गुजर जोशी

श्री राम अयोध्येला परतून रामराज्याची सुरुवात होईपर्यंतचा कथाभाग वाल्मीकींनी कुश-लवांना शिकवला होता. कुश – लवांनी प्रभू रामचंद्रांसमोर रामायण ऐकवले ते राज्याभिषेकाच्या घटनेपर्यंत. त्यानंतरच्या घटना उत्तरकांडात येतात. मूळ ग्रंथाला पुरवणी जोडावी तसे हे युद्धकांडानंतर येणारे उत्तरकांड आहे. त्यात राज्याभिषेकाच्या नंतर म्हणजेच उत्तरकाळात घडलेल्या घटना येतात हे तर खरेच आहे, पण त्याचबरोबर काही प्रश्नांची उत्तरे देणाऱया कथाही येतात. लोककथा वाटाव्यात अशा या कथा आहेत असेही म्हणता येईल. अशा कथांपैकी एक कथा आहे वेदवतीची. रावणाने केवळ सीतेचा नव्हे, तर अनेक स्त्रियांचा तेजोभंग केला होता हे आपण याआधी पाहिले होते. त्या असंख्य स्त्रियांपैकी एक आहे वेदवती.

रामायणामध्ये बहुतेक ठिकाणी रावणाचा उल्लेख `दशग्रीव’ याच नावाने करण्यात आला आहे, पण तो सर्व लोकांना छळत असल्यामुळे लोकांमध्ये रडारड निर्माण करणारा ठरला. म्हणून `रडारड घडवून आणणारा’ या अर्थाने त्याचे `रावण’ हे नाव प्रसिद्ध झाले असे उत्तरकांडात सांगितले आहे. रावणाचे दहशतीचे आणि अन्याय करण्याचे सत्र सुरू होते. त्याच्या वाटेत जे कोणी येतील त्यांच्यावर तो स्वतची सत्ता स्थापित करू पाहत होता. त्याची निरंकुश सत्ता माणुसकी, दया यांच्यापासून खूप लांब होती. अशात तो `कुशध्वज’ नावाच्या ऋषींच्या आश्रमात पोहोचला. कुशध्वज हे ब्रह्मर्षी होते. त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले होते. त्यांच्या आश्रमाची व्यवस्था त्यांची कन्या वेदवती सांभाळत होती.

शबरीसुद्धा आश्रमाची व्यवस्था सांभाळत होती हे आपण पाहिले आहे. त्या काळामध्ये महिला याही बाबतीत सािढय होत्या, शिकत होत्या हे यावरून लक्षात येते. रावण जेव्हा आश्रमात पोहोचला तेव्हा वेदवतीचे रूप पाहून तो तिच्यावर भाळला. ती व्रतस्थ आहे हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. इतके सुंदर रूप मिळाले असताना शारीरिक कष्ट देणारे हे आश्रमातले जीवन तिने का स्वीकारले? असा त्याला प्रश्न पडला. ती कोण आहे? कोणाची कन्या आहे? विवाहित आहे का? याची त्याने चौकशी सुरू केली. त्याचा अतिथी सत्कार करत असताना नम्रपणे वेदवतीने त्याला स्वतचा परिचय सांगितला. त्याच्या हेतूविषयी तिला शंका आली नाही. तिने सांगितले की, अनेकांनी मागणी घालूनही माझ्या वडिलांनी, कुशध्वज ऋषींनी माझा विवाह करून दिला नाही. कारण केवळ भगवान विष्णूच आपले जावई व्हावेत अशी त्यांची इच्छा होती, पण एका असुराने माझ्याशी विवाह करण्याच्या हेतूने माझ्या पित्याला रात्रीच्या वेळी झोपेत ठार मारले. माझ्या आईने या दुःखापोटी पित्याबरोबरच अग्निप्रवेश केला.

माझ्या वडिलांची इच्छा मी पूर्ण करावी असे मला वाटते. नारायणो मम पति (नारायण हाच माझा पती) असे मानून मी या आश्रमात व्रतस्थ जीवन जगत आहे. अशी ही माझी जीवन कहाणी आहे. हे ऐकल्यावर रावण तिला मनवू लागला. माझी बायको झालीस तर तुझे आयुष्य कसे ऐषोआरामात जाईल हे सांगू लागला. ती ऐकत नाही असे पाहून त्याने तिचे केस पकडले. तिने प्रतिकार केला त्याचे फार प्रभावी वर्णन करण्यात आले आहे. तिने केस जोरात झटकले. तिच्या हाताला जणू तलवारीचे रूप प्राप्त झाले होते. रागाने ती पेटून उठली. ती रावणाला म्हणाली, ”नीच राक्षसा, तू स्पर्श करून अपवित्र केलेले हे शरीर घेऊन मी जगू इच्छित नाही. मी अग्निप्रवेश करून माझे आयुष्य तुझ्या देखत संपवत आहे. एका स्त्राrला तुझ्यासारख्या पापी पुरुषाला संपवणे शक्य नाही असे तुला वाटते ना? मग आता तू माझी ताकद पहा. मी जर आयुष्यात खरेच काही पुण्य केले असेल तर एका धर्मात्म्याच्या घरी मी अयोनिज जन्म घेईन आणि तुझ्या नाशाचे कारण बनेन.”
म्हणून सीता जनकाला सापडली. तिचा जन्म अयोनिज आहे. सीता म्हणजेच वेदवती होय. रावणासारख्या दुराचारी व्यक्तीला शासन व्हावे हाच सीतेच्या जन्मामागचा उद्देश होता.

वेदवतीच्या या गोष्टीने मौखिक परंपरेत तर अनेक वळणे घेतली. खरी सीता वेदवतीने अग्नीमध्ये लपवली आणि रावणाकडे छाया सीता पाठवली. नंतर जी अग्निपरीक्षा झाली त्या वेळी वेदवतीने खरी सीता रामाला परत दिली अशीही कथा आढळते. पण स्त्रीने अन्यायाला प्रतिकार करताना अग्निशिखा बनावे हे शिकवणारी ही वेदवतीची कहाणी वैशिष्टय़पूर्ण आहे हे नक्की.

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)