
>> साधना गोरे [email protected]
तुम्ही घरात, कार्यालयात किंवा एखाद्या बागेत, सभागृहात असा; त्या वास्तूला दार हे असतंच. फार तर कार्यालयाला, बागेला घरासारखं दार नसेल, पण ये-जा करायला फाटक तर असतंच. तर दार या गोष्टीशी आपला असा येता-जाता नित्य संबंध येतो. अगदी रानातल्या गवत-काडाच्या खोपटाला एक वेळ लाकडी दार नसेल, पण आत-बाहेर करायला एक बाजू मोकळी असते आणि ते त्याचं दारच असतं. असं खोपट बंद करता येत नाही एवढंच.
शब्दकोशात ‘दार’ शब्दाचा अर्थ ‘प्रवेशाकरिता उघडझापाच्या दोन फळ्या’ असा दिला आहे. मात्र सध्या एकाच फळीच्या दाराची पद्धत रूढ झालेली आहे. ‘दार’ शब्दाचं मूळ शोधताना आपण संस्कृतमधील ‘द्वारम्’ आणि ‘द्वार’ या दोन शब्दांपाशी जाऊन पोहोचतो. फारसी भाषेचं प्राचीन रूप असलेल्या अवेस्ता भाषेतही ‘द्वारम’ (Dvaram) असा शब्द आहे. ग्रीकमध्ये ‘देरा’ (Dera), तर लॅटिनमध्ये Forum असा शब्द आहे. इंग्लिश ‘डोर’ (Door) शब्दही याच साखळीतला आहे.
संस्कृत ‘द्वारम्’ आणि ‘द्वार’ हे दोन शब्द इतर भाषांमध्ये गेले तेव्हा त्यांच्या रूपांत विलक्षण बदल झालेला दिसतो. पैकी ‘द्वारम्’ शब्द पालीमध्ये ‘दारम्’, प्राकृतमध्ये ‘दुवार’ किंवा ‘दुआर’, बंगालीमध्ये ‘दुयार’, आसामीमध्ये ‘दुवार’, उडिया, हिंदी व पंजाबीमध्ये ‘दुआर’ असा बदलत गेला.
संस्कृत ‘द्वार’ शब्द प्राकृत व कश्मिरीमध्ये ‘दार’ झाला हे समजण्यासारखं आहे, पण हिंदी, पंजाबी, गुजराती व मराठी या भाषांमध्ये तो ‘बार’, ‘बारे’ असा बदलला; तर सिंधीमध्ये तो ‘बारी’ झाला. या सगळ्याच भाषांमध्ये हल्ली ‘बार’ शब्द वापरात नाही हा भाग वेगळा. या भाषांमध्ये फारसीच्या प्रभावाने ‘दरवाजा’ शब्द वापरण्याकडे कल आहे. कृ. पां. कुलकर्णी ‘व्युत्पत्तिकोशा’त म्हणतात, ‘‘काही भाषांत ‘द’ का व्हावे व काही भाषांत ‘ब’ का व्हावे याच्या मुळाची कारणे शोधनीय आहेत.’’ महाराष्ट्रात आजही काही भागांमध्ये खिडकीला ‘बारी’ म्हणतात. तसंच ‘खिंड’, ‘बारे’ हे शब्द भोक, दार या अर्थी वापरात होते.
दाराचा प्रवेश, मार्ग हा अर्थ लक्षात घेतला तर त्यावरून मराठीत काही शब्दप्रयोग रूढ झाले आहेत. एखाद्याचा वंश नष्ट होण्याची इच्छा व्यक्त करताना ‘तुझं दार लागलं’ / ‘दार लिंपलं’ हा शब्दप्रयोग शापवजा अपशब्द म्हणून वापरला जातो. मनुष्याची जननेंद्रिये ही नवा जीव जन्माला घालणारे द्वार आहे, अशी कल्पना यामागे आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गुजरात राज्यात द्वारका नगरी आहे. हे नावही समुद्रमार्गे भारतात प्रवेश करण्यावरून ठेवलं गेलं आहे. नवी वाट दिसणं, संधी सापडणं या अर्थी ‘दार उघडणं’, तर उपाय / नातं संपणं या अर्थी ‘दार बंद होणं’ असेही शब्दप्रयोग केले जातात. लेखाच्या शीर्षकातील ‘दार उघड बया दार’ हे संत एकनाथांचं सुप्रसिद्ध भारूड. त्यात एकनाथ तत्कालीन राजकीय अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर देवीला सगुणाचं दार उघडण्याचं आवाहन करतात.
हल्ली पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक, तुषार या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची बचत केली जाते, पण पारंपरिक पद्धतीत वाफे किंवा वाकुरी मोडून पाणी दिलं जातं. त्यात एक वाफा पाण्याने भरला की, बांधावरची माती सारून पाणी येण्याचा मार्ग म्हणजे दार बंद केलं जातं. मग दुसऱया वाफ्याचं दार मोडून म्हणजे उघडून पाणी आत सोडलं जातं. त्यामुळे एखादा मनुष्य पिकाला पाणी द्यायला गेला की, ‘दारं धरायला गेला’ असंही म्हटलं जातं.
लग्न सोहळ्यानंतर नवरा-नवरीच्या गृहप्रवेशाचा एक गमतीशीर प्रसंग आजही काही भागांत हौसेने साजरा केला जातो. त्यालाही ‘दार धरणं’ म्हणतात. नवरानवरी दाराशी येतात तेव्हा नवरदेवाच्या बहिणी दोन्ही बाजूंनी दार अडवून उभ्या राहतात. बहिणी भावाकडे काहीबाही मागण्या करू लागतात. अर्थात, त्या सगळ्या गमतीच्या मागण्या असतात. शेवटी बहीण भावाला विचारते, ‘‘तुला मुलगी झाल्यावर माझ्या मुलाला देणार का?’’ भाऊ म्हणतो, ‘‘थांब, बायकोला विचारून सांगतो.’’ मग नवरदेव नवरीला विचारतो, ‘‘आक्का पोरगी मागतेय, कसं करू या?’’ नुकत्याच डोक्यावर अक्षदा पडलेली नववधू या प्रश्नानं लाजलाजून ‘‘देऊ या की…’’ म्हणते. या उत्तरासरशी नवरीला माप ओलांडण्याची परवानगी मिळते.
तसं तर दार हे घर सुरक्षित ठेवणारं एवढंसं साधन, पण केवढी संस्कृती कवेत घेतं!