लेख – देवदत्त देणगी आणि प्रतिभा

>> रूपा देवधर, [email protected]

आपल्या हास्यचित्रांतून माणसांना आनंद देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आज 100व्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यानिमित्ताने त्यांच्या कन्या ग्राफिक डिझायनर रूपा देवधर यांनी उलगडलेले फडणीस यांचे व्यक्तिमत्त्व…

आमचं चार जणांचे कुटुंब. आई, बाबा, माझी मोठी बहीण लीना आणि मी. बाबा म्हटलं की, एक प्रसन्न, हसरं व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येतं. त्याला साजेसे आमचे बाबा आहेत. ते सतत त्यांच्या व्यंगचित्रांच्या कामात बिझी असायचे म्हणून आम्हाला धाक किंवा कलाकार म्हणून त्यांचा सगळ्यांनी मूड सांभाळायचा, काय वाटेल असं त्यांचं काही नसायचं. ते अगदी साधे व्यक्तिमत्त्व. आजपर्यंत मी त्यांना कधी रागावलेलं पाहिलं नाही. घरातलं वातावरण एकदम खेळकर आणि आनंदी असायचं. माझी आई लेखिका शकुंतला फडणीस. घरात उत्तम साहित्य, चित्र, संगीत, चित्रपट, नाटक या सगळ्याची सगळ्यांना आवड होती. त्यावर गप्पा होत असत. कोणतंही टेन्शन नसे, मोकळं वातावरण. रात्री उशिरापर्यंत अंगणामध्ये आमच्या गप्पा व्हायच्या. कोणत्याही गोष्टीवर आईबाबांशी मनमोकळा संवाद होतं असे. घरातले वातावरण हे संस्कारी असल्यामुळे आई आणि बाबा यांना काय आवडेल, काय आवडणार नाही हे आपोआप कळत होतं.

यामध्ये आईची भूमिका खूप महत्त्वाची होती. तिने संसार अगदी दक्षतेने केला. तोही स्वतःचे उत्तम लेखन आणि बालसाहित्य जोपासत. तिची 35 पेक्षा जास्त पुस्तपं आहेत, बरेच पुरस्कार तिला मिळाले आहेत. घरात येणाऱया अतिथींचे आईने मनापासून केलं. बाबांचे स्वास्थ्य आईने बघितलं. बाबांचे जेवण कमी असले तरी ते वेळच्या वेळी कसं ताजं, चांगलं, गरमागरम देता येईल याकडे आईने लक्ष दिलं. बाबांचा दिनक्रमही अगदी नेटका. आहार, विहार अगदी नेमस्त. जेवण थोडं आणि वेळेवर, रोज ध्यान, प्राणायाम, ओंकार. आजही 99 व्या वर्षी चालायला जाणे सुरू आहे.

उत्तम व्यंगचित्रकार तर ते आहेतच, पण त्याचबरोबर उत्तम इंजिनीअरही आहेत. अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाची त्यांना माहिती आहे. दुरुस्त्या ते चटकन करतात आणि प्रश्न सोडवतात. केंटिंगबरोबरच प्रिंटिंगची त्यांना माहिती होती. ब्लॉक मेकिंगच्या अचूक सूचना ते देत असत. अनेक नवीन गोष्टी त्यांनी तयार केल्या आहेत, त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रदर्शनासाठी लागणारे स्क्रीन युनिट म्हणजे केंटिंग दिसण्यासाठी लागणारे युनिट. पूर्वी त्यांनी अनेक गावांमध्ये ‘हसरी गॅलरी’ हे प्रदर्शन भरविले. तेव्हा गावांमध्ये कोल्हापूर, जळगाव… अगदी बाहेर दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, पण छोटय़ा गावात चित्र डिस्प्ले करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे त्यांनी हे युनिट स्वतः तयार केलं. त्याचबरोबर चित्र काढण्यासाठी लागणारा ब्रश त्यांनी तयार केला, लांबून मोठय़ा हॉलमध्ये रसिकांना चित्र नीट दिसलं पाहिजे यासाठी जाड ब्रश त्यांनी डिझाईन केला, ज्याच्यामध्ये रंग राहील असा. नुसतं स्केच पेन किंवा मार्कर याच्या साहाय्याने केलेले चित्र लांबच्या लोकांना दिसत नाही हे ओळखून त्यांनी स्वतः ब्रश विकसित केला. आजही तो ब्रश वर्किंगमध्ये आहे.

त्यांच्या सर्व चित्रांचे त्यांनी डिजिटल स्कॅनिंग केलेले आहे. 1958 पासूनच्या सगळ्या स्केचबुक, चित्र, मुखपृष्ठ कामाचे स्पॅनिंग यात केलेलं आहे. आज ते स्वतःही कॉम्प्युटर वापरतात. तसेच चित्रावर आधारित काही चित्रकारांनी ऑनिमेशन केलेलं आहे. या सगळ्या तंत्रज्ञानाचं ते मनापासून स्वागत करतात. तंत्रज्ञानाबरोबरच नवीन विचाराचेही ते स्वागत करतात. मनाने आणि विचाराने ते आधुनिक आहेत. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांत दिसते. आज जगात काय चाललं आहे, याची त्यांना जाण आहे. जगातल्या घडामोडींचे भान त्यांना आहे. समाज कसा बदलत चालला आहे, नवीन विचारांचे स्वागत आहे.

त्यांचे जसं व्यक्तिमत्त्व आहे तशीच त्यांची चित्रं आहेत. उत्साही, सकारात्मक, कोणालाही न बोचकारणारी. त्यांचं शहाणं आणि समंजस व्यक्तिमत्त्व आहे. दुसऱयाला त्रास होणार नाही याची काळजी घेतात. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, कोणत्याही गोष्टीतलं मर्म वेचता येणं ही त्यांची शक्तिस्थानं आहेत. त्यांचं एक चित्र आहे, गुलाबाच्या फांदीवरून चालणारा माणूस आहे, त्याला काटा टोचला आहे, पायातून रक्त येतंय, पण त्याचं लक्ष गुलाबाकडे आहे. हे त्यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. आयुष्यातल्या अडचणींकडे नको, चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. बाबांची व्यंगचित्रकला ही देवदत्त देणगी आहे आणि ती त्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि प्रतिभेने फुलवली आहे. शांत, साधे राहणीमान, सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्यांना 99 व्या वर्षीही एकही औषधाची गोळी नाही.

– शब्दांकन – मेधा पालकर