उद्योगविश्व- सुबद्ध नियोजन, वाढीव उत्पन्न

>> अश्विन बापट

कोकमाची उत्पादनं, जांभूळ उत्पादनं मागणीत, काजूची झाडंही दमदार; बांबूची शेतीही जोरात. कुडाळच्या करंदीकर कुटुंबाने जोपासली ही अनोखी वाट. त्यांच्या या वाटचालीबद्दल.

जांभूळपोळी, जांभूळ ज्यूस, जांभूळ बी पावडर, याशिवाय बांबूची दोन हजार झाडं, कोकमाची उत्पादनं, काजूची झाडं इतका सारा व्याप सांभाळून कुडाळचं करंदीकर कुटुंब 30 वर्षांपासून नियमित कालावधीनंतर आपल्या व्यवसायात काही ना काही भर टाकण्याचाच प्रयत्न करत आहेत. या त्यांच्या वाटचालीबद्दल करंदीकर कुटुंबातील तरुण शिलेदार सुयोगकडून जाणून घेतलं. सुयोग म्हणाला, आमच्या या व्यवसायाची सुरुवात 1996 मध्ये झाली तेव्हा आमच्याकडे जांभळाची साधारण 20 ते 25 झाडं होती. सुरुवातीला फक्त झाडावरची जांभळं काढून विकणं इतकंच व्यवसायाचं स्वरूप होतं, पण लहरी हवामान, पावसाचं कमी-जास्त प्रमाण यामुळे काही वेळा आर्थिक गणित आव्हानात्मक होऊ लागलं. तरीही जोखीम पत्करून आम्ही दुसऱया लोकांची झाडं विकत घेऊ लागलो. आम्ही कुडाळच्या निरुखे गावचे. नंतर आम्ही कुडाळ, वेंगुर्ला, मालवण… तिन्ही तालुक्यांमधली,  गावांमधली झाडं घेऊन व्यवसायात पुढे पाऊल टाकलं. सध्या आमच्याकडे 25 गावांमधील जांभळाची झाडं व्यवसायासाठी उपलब्ध आहेत. मग मी जांभळासंदर्भातलं फळ प्रक्रियेचं विशेष ट्रेनिंग माणगावला जाऊन घेतलं. तिथून सुरुवात झाली जांभूळपोळी, जांभूळ ज्यूस आणि जांभूळ पावडर यांची. आंबापोळी, फणसपोळीसारखी जांभूळपोळी खूप मागणीत आहे. मधुमेहावर जांभूळ गुणकारी असल्याने याला मागणीही प्रचंड आहे. सध्या तिन्ही तालुके मिळून अंदाजे पाच हजार झाडं आमच्याकडे आहेत. मुंबई, पुणे, वाशीमध्ये आमची उत्पादनं पोहोचत असतात. आमच्या तीन हजार स्क्वे.फूट जागेत जांभूळ प्रोसेसिंग सुरू असतं. 20 कर्मचारी पगारी कायमस्वरूपी आहेत, तर सीझननुसार 40 कामगार वाढवावे लागतात.

वार्षिक उत्पादनाचा विचार केल्यास जांभूळपोळी 500 ते 600 किलो, जांभूळ ज्यूस अंदाजे 2 हजार लिटर आणि जांभूळ पावडर 500 ते 600 किलो इतकं उत्पादन आम्ही घेत असतो.

सकाळी साडेसात ते 4 आणि दुपारी 4 ते 11 अशा दोन शिफ्टमध्ये सीझनच्या वेळी काम चालतं. जांभळाची उत्पादनं ही ठिकठिकाणी पोहोचत असली तरी ते नाशिवंत फळ आहे. त्यामुळे आर्थिक गणित आणखी नीट बसवण्यासाठी आम्ही गेल्या तीन-चार वर्षांपासून बांबूच्या शेतीवर लक्ष द्यायला सुरुवात केलीय. बांबूच्या शेतीचा फायदा असा आहे की, काही पिकं विशिष्ट कालावधीत शेतातून काढली नाहीत तर ती खराब होण्याची भीती असते. तो धोका बांबू शेतीला नाही. तसंच बांबूच्या शेतीवर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा पाऊसच न पडणे अशा कोणत्याही स्थितीचा परिणाम होत नाही. फक्त वानरांचा उपद्रव टाळणं, त्यांच्यापासून या शेतीचा बचाव करणं हेच आमच्यासमोर आव्हान आहे. आमचे बांबू उत्पादन मुंबई, गुजरात, कर्नाटक अशा ठिकठिकाणी जात असतात.

माझे काका अनिरुद्ध करंदीकर निरनिराळ्या ठिकाणची झाडांची खरेदी करून त्यांचं नियोजन करतात. पुढे ती झाडं विकत घेतली की, ती फळं काढून ते सर्व उत्पादन प्रोसेसिंगसाठी आपल्या युनिटमध्ये घेऊन येणं ही जबाबदारी मी सांभाळतो, तर माझे वडील रामदास करंदीकर पुढचं बॉक्स पॅकिंग, मार्केटिंग अशी जबाबदारी सांभाळत असतात, असंही सुयोगने व्यवसाय नियोजनाबद्दल सांगितलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर सीनियर न्यूज अँकर आहेत.)