साहित्य-सोहळा – भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात विद्रोहाचा एल्गार!

>> पंजाबराव मोरे

19 वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन मराठवाडय़ाची सांस्कृतिक राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी सामान्यांच्या असामान्य गर्दीत पार पडले. दिल्लीच्या मखमलीवर झालेले अ. भा. मराठी साहित्य संमेलन टीकेचे धनी झाले असतानाच मराठवाडय़ाच्या मातीत तिन्ही दिवस हाऊसफुल्ल गर्दीत पार पडलेले विद्रोही साहित्य संमेलन मात्र गलिच्छ राजकारणाचा बळी ठरलेल्या गोरगरीब आदिवासी आणि सामान्यांच्या विविध समस्यांवर तळमळीने भाष्य करताना दिसले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रतिसंमेलन म्हणून खंबीरपणे आव्हान देणारे 19 वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन मराठवाडय़ाची सांस्कृतिक राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी सामान्यांच्या असामान्य गर्दीत पार पडले. तीन दिवस कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता देशभरातून स्वखर्चाने, तन-मन-धनाने उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या भूमिपुत्रांनी मुलाखती, नाटय़प्रयोग, कथा, कविता, चर्चासत्रे आणि परिसंवादांच्या माध्यमातून मनातील खदखद व्यक्त करत जणूकाही देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात विद्रोहाचा एल्गारच पुकारल्याची अनुभूती आली.

गलिच्छ राजकारणामुळे देशातील सामान्य नागरिकांच्या हक्क आणि अधिकारांवर लादली जाणारी बंधने, आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन अधिकारांचा प्रश्न, रोजगार आरक्षण आणि विकास, जातनिहाय जातगणना, माध्यमांची गळचेपी की शरणागती, ग्रंथालय चळवळ, नवे शैक्षणिक धोरण, ईव्हीएमच्या माध्यमातून मतदारांची गळचेपी, स्रियांवरील कौटुंबिक अत्याचार, मानवी संस्कृतीसमोरील कृत्रिम मेंदूचे आव्हान, ग्रामीण तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आणि न्यायालये खरंच न्याय देतात का? आदी सामान्यांच्या समस्यांवर त्या-त्या क्षेत्रातील सामान्य माणसांची मते आणि त्या समस्या सोडवण्यासाठी काय उपाय करता येतील यावर तळागाळातील नागरिकांची मते जाणून घेणारी ‘चर्चासत्रे’ हा उपक्रम तर वादातीतच.

ग्रामीण भागातील तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न, येणाऱया पिढय़ांना गुंतागुंतीच्या खाईत लोटणारे नवीन शैक्षणिक धोरण, राजकारण्यांची बटिक बनलेली न्याय व्यवस्था, राज्यघटनेची केली जाणारी हेळसांड, नीतिमूल्ये गहाण ठेवून राजकारण्यांची हुजरेगिरी करणारी माध्यमे, शेतकऱयांना देशोधडीला लावून उद्योजकांची मुनिमकी करणारी सरकारे आणि ईव्हीएमच्या खोक्यांतून सामान्यांच्या मतांचा मांडलेला बाजार… या सामान्यांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांवर पोटतिडकीने भाष्य करणाऱया विद्रोही साहित्य संमेलनाने आजवरच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडले.

दरवर्षी राजाश्रय लाभलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या शहरातच विद्रोही साहित्य संमेलन भरवले जाते. मागील वर्षीही अमळनेरच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात साहित्य रसिकांची वानवा असताना विद्रोही साहित्य संमेलनाचा सभामंडप ओसंडून वाहत असल्याच्या बातम्यांनी महामंडळ हैराण झाले होते.

यंदा मराठी सारस्वतांच्या नाकावर टिच्चून दिल्लीतील संघ व भाजपच्या नेत्यांनी संमेलन हायजॅक केले. पंतप्रधान आणि त्यांच्यानंतर बोलावलेल्या मान्यवरांनीच दिल्ली दरबारात साहित्य महामंडळाची मान घाली घातली. कुणीही यावे आणि टिकली मारून जावे अशी अवस्था झाल्याने दिल्लीच्या मखमलीवर झालेले अ. भा. मराठी साहित्य संमेलन टीकेचे धनी झाले असतानाच मराठवाडय़ाच्या मातीत तिन्ही दिवस हाऊसफुल्ल गर्दीत पार पडलेले विद्रोही साहित्य संमेलन मात्र गलिच्छ राजकारणाचा बळी ठरलेल्या सामान्यांच्या विविध समस्यांवर तळमळीने भाष्य करताना दिसले.

या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशाच्या सरकारच्या नीतिमत्तेचे आणि चुकीच्या धोरणांचे वाभाडेच काढले. लवचिक झालेली न्याय व्यवस्था, राजकारणात शिरलेल्या गुंडगिरीवर आणि सत्ता मिळवणे व टिकवण्यासाठी देशात सुरू असलेल्या लोकप्रतिनिधींच्या पळवापळवीवर त्यांनी आसूड ओढले. देशाचे पंतप्रधान अदानी-अंबानीची मुनिमकी करत असल्याचा आरोप करून सामान्यांच्या विद्रोहाचा एल्गार रस्त्यावर उतरत असल्याचे संकेत दिले. पत्रकार निरंजन टकले यांनी सरकारच्या लोकविरोधी धोरणांवर आसूड ओढले. या सर्व कार्यक्रमांना रसिकांनी गर्दी केली होती.

मराठवाडय़ातील राजधानीच्या शहरात शुद्ध पाण्याची गंगा आणणाऱया मलिक अंबर यांचे नाव या साहित्य संमेलन परिसराला देऊन आयोजकांनी विकासाच्या दृष्टिकोनाचा गौरवच केला आहे. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने संमेलन सुरू झाले. नाटकाला साहित्यरसिक आणि नाटय़प्रेमींनी गर्दी केली होती. दुसऱया दिवशी ‘भारतीय विषमतेविरोधात धर्मप्रवाहांची भूमिका व आजचे वास्तव, बोलीभाषा, प्रमाणभाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण, युटय़ूब, फेसबुक आदी सोशल मीडिया अन्यायाविरुद्ध लढण्याचे साधन…’ अशा समाजाभिमुख विषयांवरील परिसंवाद, सडेतोड कवितांच्या माध्यमातून बहुजनांच्या मनातली अन्यायाविरोधातील खदखद अधोरेखित करणारी कविसंमेलने आणि दिवसभर बालमंचच्या रंगमंचावर सादर झालेल्या चिमुकल्यांच्या वैचारिक व सांस्कृतिक सादरीकरणाने विद्रोही साहित्य संमेलन आता खऱया अर्थाने भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात एल्गार करू लागले एवढे मात्र नक्की.

[email protected]