>> प्रा. विजया पंडित
चांद्रयान मोहीम सुरू असतानाच इस्रोकडून ‘आदित्य एल-1’ ही सूर्याच्या अभ्यासासाठीची मोहीम सुरू करण्यात आली होती. सप्टेंबर 2023 मध्ये ‘आदित्य एल-1’चे यशस्वी प्रक्षेपण झाले आणि चार महिन्यांनी पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतर पार करत ते यान एल-1 पॉइंटवर पोहोचले. अलीकडेच सूर्याच्या अभ्यासासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून ‘ईएसए ‘प्रोबा-3 मिशन यान’ ‘पीएसएलव्ही-सी 95’च्या मदतीने यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आले. प्रोबा-3 मिशन हे एक युरोपीय अभियान आहे. या मोहिमांमुळे सूर्याबाबतची अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे.
आपल्या ब्रह्मांडाची निर्मिती असंख्य ताऱयांपासून बनलेली आहे. वैज्ञानिक ब्रह्मांडाच्या भविष्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपण सौरमालेत आहोत त्या सूर्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. सूर्यापासून जितकी ऊर्जा आणि तापमान निर्माण होते, त्याचा अभ्यास पृथ्वीवरून केला जाऊ शकत नाही. त्यामुळे जगभरातील अंतराळ संशोधन संस्था सूर्याजवळ जितके जाता येईल तितके जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेतून पृथ्वीवर मनुष्यजीवन विकसित झाले आहे. विज्ञानाचा खोलवर अभ्यास केल्यास सूर्य हा प्रत्यक्षात एका डायनामोप्रमाणे काम करतो. ज्याप्रमाणे डायनामोत यांत्रिक ऊर्जा ही विजेत रूपांरित होते, त्याप्रमाणे सूर्याच्या पृष्ठभागावरील ऊर्जा दुसऱया रूपात स्थानांतरित होत असते. पण कोटय़वधी किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि जवळ येणाऱया सर्व गोष्टींना वितळवून त्यांना भस्मसात करणाऱया या अतुलनीय क्षमतेमुळे सूर्याची अनेक रहस्ये आजही उलगडलेली नाहीत. नासा आणि युरोपीयन अंतराळ संशोधन संस्था यांनी सूर्याचा अभ्यास करून शोध लावले आहेत. ‘आदित्य एल-1’च्या माध्यमातून इस्रोचादेखील सूर्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे.
चांद्रयान मोहिमेप्रमाणेच ‘आदित्य एल-1’ मिशनने इस्रोला अनेक प्रकारची माहिती मिळणे अपेक्षित आहे. या यशाने अवकाश क्षेत्रात भारताचे स्थान अधिक मजबूत राहू शकते. एकार्थाने चंद्राबरोबरच सूर्याच्या अंगणातही ‘इस्रो’ने झेप घेतली असून भविष्याची नवी पायाभरणी केली आहे, असे म्हणावे लागेल. ‘आदित्य एल-1’ हे लँग्रेज पॉइंट (एल-1) नावाच्या एका विशिष्ट बिंदू किंवा स्थानावर आहे. तेथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शक्ती संतुलित होते. या स्थानावर न्यूट्रल पॉइंट विकसित होऊ शकतो आणि तेथे अवकाश यानाला इंधनाची कमी गरज भासेल. फ्रान्सचे गणितज्ञ जोसेफ लुईस लँग्रेज यांचे नाव त्या पॉइंटला देण्यात आले आहे. जोसेफ लुईन लँग्रेज यांनी या बिंदूचा शोध 18 व्या शतकात लावला. हे ठिकाण पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे आणि सूर्य आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर. अशा वेळी थोडे पुढे जात ‘आदित्य एल-1’ सूर्याबाबत बरीच माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.
सौर वारे (सोलर विंड), सूर्यामुळे होणारे विद्युत चुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) विचलन आणि सौर हालचालीमुळे पृथ्वीवरच्या हवामानावर म्हणजेच हवामान बदलावर होणाऱया परिणामांचे योग्य आकलन करणे व मोजमाप करण्याची जबाबदारी ‘आदित्य एल-1’ वर असून ती आव्हानात्मक आहे. ‘आदित्य एल-1’च्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल फील्ड डिटेटरच्या मदतीने सूर्याच्या पृष्ठभागावर म्हणजेच फोटोस्फेयर व क्रोमोस्फेयरला जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच त्यांची पृथ्वीवरील ऊर्जा संचार तसेच अवकाशातील घडामोडीत काय भूमिका असते, हेदेखील समजू शकेल. सौरज्वाला विखुरण्याचा, जवळून अनुभवण्याचा प्रयत्नदेखील ‘आदित्य एल-1’ च्या सात पेलोडच्या माध्यमातून केला जाईल. सूर्याबाबत अनेक रहस्य आहेत अणि त्यांना ‘आदित्य एल-1’ च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न होईल. कोरोनल मास इजेशन, सोलर फ्लेयर आणि त्याच्या वैशिष्टय़ांबाबत जाणून घेण्यासाठी पुढील पाच वर्षे सक्रिय राहणाऱया ‘आदित्य एल-1’ कडून सूर्याची इत्यंभूत माहिती मिळवण्याची ‘इस्रो’ला अपेक्षा आहे. या कामात ‘ईएसएचे प्रोबा- 3’ देखील महत्त्वाचा सहकारी म्हणून भूमिका बजावेल.
प्रोबा-3 लादेखील आधुनिक रूपातून सौरज्वालांचा सखोल अभ्यास करण्यासाठी तयार केले आहे. या अभियानानुसार ईएसएने दोन उपग्रह कोरोनाग्राफ आणि आयूल्टरला कृत्रिम रूपातून शेकडो वेळा पूर्ण सूर्यग्रहण करण्यासाठी पाठविले. यातून शास्त्रज्ञ सूर्याच्या बाहेरील वातावरण म्हणजेच कोरोनाचा रहस्यभेद करण्याचा प्रयत्न करतील. पूर्ण सूर्यग्रहणाच्या काळात सूर्याची चहूबाजूंनी दिसणारी तेजस्वी कडा हा वास्तविक पंकणाकृती म्हणजे कोरोना आहे आणि ते सामान्य अवस्थेत दिसत नाही. आतापर्यंत नैसर्गिक रूपातून पाहण्याचा योगायोग हा खूपच कमी राहिला आहे आणि तो वर्षातून एकदाच होतो. पूर्ण सूर्यग्रहणाची अवस्था ही काही क्षणांची असते आणि तो एखाद्या हिऱयाप्रमाणे चमकणारा कोरोनारूपी गुच्छ दिसतो. काही क्षणासाठी असणाऱया या अवस्थेतून सखोल माहिती गोळा करणे कठीण आहे. तरीही ते काम करण्याचा प्रयत्न प्रोबा-3 च्या माध्यमातून केला जात आहे.
प्रत्यक्षात पृथ्वीपासून एका निश्चित कक्षात स्थापित केल्यानंतर प्रोबा-3 चे हे दोन्ही उपग्रह कोरोनाग्राफ आणि आयूल्टर हे एकमेकांपासून दीडशे मीटर अंतरावरून उड्डाण घेत राहतील. याप्रमाणे हे दोन्ही उपग्रह येत्या दोन वर्षांत शेकडो वेळा अशा स्थितीत असतील आणि यानुसार ते परस्परांपासून 492 फुटांच्या अंतरावर जातील, असे नियोजन केले आहे. या हालचालीमुळे एका उपग्रहावर असलेली तबकडी दुसऱया उपग्रहावर असलेल्या टेलिस्कोपला आपल्या सावलीत घेईल. सावली पडल्यानंतर तेथे योग्यरित्या कृत्रिम सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होईल आणि त्यापैकी प्रत्येक सूर्यग्रहण हे सहा तासांचे असेल. अशा वेळी शास्त्रज्ञ आणि उपकरण हे व्यापक प्रमाणात माहिती गोळा करत कोरोनाची चांगल्या रीतीने चाचपणी करण्यात यश मिळवू शकतात.
सूर्याच्या कोरोनात खगोलशास्त्रज्ञांची रुची असण्यामागे काही कारणे आहेत. अभ्यासानुसार नैसर्गिक ग्रहणाच्या काळात चंद्रामुळे सूर्याचा प्रकाश कमकुवत पडतो. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा अनेक पटीने अधिक उष्ण असणारा कोरोना हा अधिक तापमान असतानाही कमी प्रकाश देतो व हे एक प्रकारचे गूढच आहे आणि ते उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय सूर्यावर होणाऱया स्पह्टातून बाहेर पडणाऱया सौरज्वाला म्हणजेच कोरोनल मास इजेशनला (सीएमई) समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या स्पह्टात म्हणजे ‘सीएमई’च्या काळात कोरोनातून असंख्य प्रमाणात प्लाझ्मा आणि चुंबकीय विखुरलेल्या लहरी सूर्याच्या पृष्टभागावरून बाहेर पडतात व त्यामुळे त्याचा परिणाम पृथ्वीवर होतो. प्रामुख्याने दळणवळण, माध्यम, दळणवळण उपग्रह आणि पॉवरग्रीड यंत्रणात या विखुरलेपणामुळे अडथळे येतात. अशा वेळी कोरोना आणि त्यामुळे होणाऱया स्फोटांच्या मालिकांचे रहस्य जाणून घेतले तर सौरज्वालांपासून बचाव करण्याच्या प्रभावी मार्गाचा शोध घेतला जाऊ शकतो.